esakal | वुमनहूड : राधिकेचा राम
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika-Deshpande

आपल्या मुखातून शब्दही फुटत नसताना, म्हणजे आपण तान्हं बाळ असताना आपल्याला आपले आई-बाबा मंदिरात नेतात. ‘बाप्पा जय’ करायला शिकवतात. हा आपल्या संस्कृतीतला भाग असून, पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. लहानपणी मी माझ्या आजीबरोबर घराजवळील राम मंदिरात जायचे. शांत, शीतल, स्तब्ध रामाची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आत्ताही उभी राहिली.

वुमनहूड : राधिकेचा राम

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री

आपल्या मुखातून शब्दही फुटत नसताना, म्हणजे आपण तान्हं बाळ असताना आपल्याला आपले आई-बाबा मंदिरात नेतात. ‘बाप्पा जय’ करायला शिकवतात. हा आपल्या संस्कृतीतला भाग असून, पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. लहानपणी मी माझ्या आजीबरोबर घराजवळील राम मंदिरात जायचे. शांत, शीतल, स्तब्ध रामाची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आत्ताही उभी राहिली. ‘आजी, आज रामाची गोष्ट सांग,’ असा लहानपणी हट्ट धरला होता. मूर्ती आणि गोष्ट स्वरूपात प्रभू श्रीराम यांच्याशी माझी पहिली भेट. इथून पुढं प्रभू श्रीराम मला कळत गेले आणि आजही कळताहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाळेत जायला लागल्यावर ‘लॉर्ड रामा’ असा त्यांचा उल्लेख इंग्रजी पुस्तकात केलेला मला आवडला नव्हता. मग आलं दूरदर्शनवर दाखवलेलं रामायण. त्यातील चमत्कारिक व्हिज्युअल इफेक्ट बघून मज्जा यायची. संध्याकाळी घरामागच्या अंगणात झुल्यावर बसून आजी ‘कौसल्येचा राम बाई...’ गायची तेव्हा वाटायचं यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही. भाषाशुद्धीसाठी नाटकाचे शिक्षक म्हणून माझ्या बाबांनी रामरक्षा म्हणायला सांगितली. मी तेव्हा धावपटू होते. माझे गुरुजी भाऊ काणे यांनी आत्मसंरक्षणासाठी रामरक्षेचं महत्त्व मला समजावून सांगितलं. रामाचा मंत्र आणि तंत्र म्हणून जप करायला मी शिकले.

राम काल्पनिक आहे, त्याचे काही पुरावे नाहीत अशी उलटी शिकवण काही लोक देत असताना अयोध्येत मंदिराचे अवशेष सापडणं, समुद्रात असलेला सेतू सापडणं हे सारं सुखावणारं आहे. आजीनं मला सांगितलं होतं, ‘राहतो मनामनांत तो राम. रोमारोमात राम, कणाकणात राम, विटेवरी राम, शिलेवरी राम.’ आजीचं काही चुकीचं नाहीये. ५०० वर्षांपासून, म्हणजे साधारण ४० पिढ्यांपासून मनात सुप्त असलेल्या प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधण्याची इच्छा प्रबळ होती. 

ॐ या एका शब्दाचा जपाने शांती, तर राम हा मंत्र जपल्यानं सुख आणि समाधान मिळतं. मी अनेकदा स्वतःला प्रश्‍न केला, मी रामायणात एखादं पात्र असते तर कोण असते? मी खारुताई असते. प्रभू श्रीरामाचा मायेचा हात माझ्या पाठीवरून फिरला असता. त्याची चार बोटं माझ्यावर उमटली असती आणि मी धान्य झाले असते. एका आधुनिक जगातली व्यक्ती म्हणून राम हा अभ्यासाचा विषय असू शकतो. याहूनही अधिक माझ्या करता तो श्रद्धेचं स्थान आहे. 

आपण संकटात अडकलो किंवा कशाबद्दल हळहळ व्यक्त करावीशी वाटली तर आपल्या मुखातून अगं आई गं, अरे देवा, नाहीतर हे राम असंच येतं. विचार करण्यासारखी गोष्ट ना? आधी मूर्ती, गोष्टीस्वरूपात, अभ्यासाच्या पुस्तकात, हलते चित्र बनून टेलिव्हिजनच्या जादूई नगरीत, मग रामरक्षेच्या माध्यमातून, कधी रामाच्या नावावर राजकारण झालं, तर माझ्या लेखाच्या स्वरूपात राम मला भेटत राहतो. राम नाम विष्णू सहस्रनामाच्या तुलनीय आहे. राम नामात रमणारी मी राधिका आहे. इथं मला वेगळं असं काही मांडायचं नाही. मी माझ्या रामाला आज फक्त शब्दातून मांडलं आहे. आपलं मन एक मंदिर आहे आणि तो आपल्या मनात घर करून राहतो, पण त्याला त्याचं घर नको? त्याच्या जन्मस्थळी, म्हणजेच अयोध्येत त्याचं स्वतःचं घर पुनःश्च तयार होतंय आणि त्याची दारं भक्तांसाठी सदैव उघडी असतील. हनुमानाच्या शक्ती, युक्ती आणि भक्तीनं तिथली वीट अन् वीट चढवली जाणार आहे.  लेख पूर्णत्वाला आला असला, तरी रामाचं कार्य अखंड, अविरत सुरू राहील.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top