मेमॉयर्स : आईच्या स्वप्नपूर्तीतच आनंद

ऋतुजा जुन्नरकर, अभिनेत्री
Sunday, 5 April 2020

माझ्या आयुष्यातील अगदी जवळची, आवडती व्यक्ती आणि माझी पहिली खास मैत्रीण म्हणजे माझी आई. माझ्या नृत्याची सुरुवात आईमुळेच झाली. आई नोकरी करते, तेथे एका समारंभात मी आयुष्यातील पहिले नृत्य सादर केले आणि माझे ते नृत्य आईने बसवले होते. तेव्हा माझ्यातील नृत्याची आवड पाहून आईने ठरविले की, मी नृत्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे.

माझ्या आयुष्यातील अगदी जवळची, आवडती व्यक्ती आणि माझी पहिली खास मैत्रीण म्हणजे माझी आई. माझ्या नृत्याची सुरुवात आईमुळेच झाली. आई नोकरी करते, तेथे एका समारंभात मी आयुष्यातील पहिले नृत्य सादर केले आणि माझे ते नृत्य आईने बसवले होते. तेव्हा माझ्यातील नृत्याची आवड पाहून आईने ठरविले की, मी नृत्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. मी चौथीत असल्यापासूनच शास्त्रीय नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली. नोकरी, घर आणि माझा डान्स हे करताना आईची तारेवरची कसरत होत असे. पण, अशी एकही डान्स स्पर्धा नाही, जेथे आई माझ्याबरोबर आली नाही. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी अभ्यासात तितकीच हुशार होते. त्यामुळे इंजिनिअर होण्याचा निर्णय घेतला. ‘तू शिक्षण नक्कीच पूर्ण कर, परंतु, आयुष्यात नृत्याला कधीच दूर करू नको,’ असे आई म्हणाली. मात्र तिने माझ्यावर कोणताच निर्णय लादला नाही, योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर मी फर्ग्युसन महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली.

त्याचबरोबर दुसरीकडे माझे नृत्याचे प्रशिक्षण सुरू होते. मात्र, मला नोकरी करण्यात रस नव्हता. काय करावे, हे मला कळत नव्हते. तेव्हा आई मला म्हणाली, ‘तू नृत्याला तुझे करिअर बनवायला पाहिजे. नृत्य तुला आयुष्यात नेहमी आनंदी ठेवेल.’ त्यावर विचार करून मी भरत नाट्यममध्ये मास्टर करायचे ठरविले. ही पदवी संपादन करून मी कॉलेजमध्ये पहिली आले, तेव्हा माझ्या आईचे अश्रू सर्व काही बोलून गेले. 

माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले. बरेच प्रसंग असे आले, ज्यामुळे मी हताश झाले. पण, त्यावेळी आईने मला सांगितले की, आयुष्यात कधीच हरायचे नाही. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. तिचा हा विश्‍वास असल्यामुळेच मी आज आयुष्यात खंबीरपणे उभी आहे. 

इतकेच नाही, तर दहा वर्षांची असताना आईने मला योगासनाचे क्लासेस लावले. आजही आम्ही एकत्र योगासने आणि ध्यानधारणा करतो. मी कायम ताजे अन्न खावे, याकडे तिचे लक्ष असते. ती माझ्या डाएटची खूप काळजी घेते. माझ्या कुटुंबात कोणीही नृत्य क्षेत्रात नाही. तरीही आईमुळे मी नृत्यात करिअर करू शकले. विविध टीव्ही वाहिन्यांमुळे जगाला माझे नृत्य दाखविले. मी आत्तापर्यंत ‘ढोलकीच्या तालावर’, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’, ‘एंटरटेन्मेंट के लिये कुछ भी करेगे’, ‘हाय फीवर’, ‘डान्स का नया सेवर’ या शोमध्ये सहभागी झाले. सध्या मी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये सहभागी आहे. या सर्व गोष्टी आईमुळेच होत आहेत. कारण, माझी आईच माझा आदर्श आहे. तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करणे, यात माझा खरा आनंद आहे.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rutuja junnarkar on mother joy