मेमॉयर्स : माझी अष्टपैलू आई!

Sai-Ranade
Sai-Ranade

आईबद्दल काय बोलू? खरंतर जेवढं बोलू, तेवढं कमीच आहे. आपण लहानपणी अगदी निबंधामध्ये लिहितो त्याप्रमाणं माझी आई माझी अगदी बेस्ट फ्रेंड आहे. मला लहानपणी शाळेत असताना फारशा मैत्रिणीही नव्हत्या, पण त्याची कमी मला कधीच जाणवली नाही, कारण घरी असताना किंवा शाळेतून घरी आल्यावर दिवसभरात काय काय झालं, कोण काय बोललं वगैरे सगळ्याच गोष्टी आईशी बोलायचे. आमच्या घरामध्ये वातावरण एकदम मोकळं, त्यामुळं मी आणि माझी मोठी बहीण सगळ्याच गोष्टी आईबरोबर शेअर करतो. माझी आई ‘हाऊस वाइफ’ आहे. त्यामुळे शाळेचा अभ्यास असो वा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, आई सगळीकडं स्वतः हजर असायची.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी भरतनाट्यमच्या क्लासला जायचे, तेव्हा क्लासला फक्त आणणं-पोचवणं नाही, तर मला भरतनाट्यममध्ये कितपत गती आहे, जमतंय का याची विचारपूस आई नित्यनेमानं करायची. माझी आई पक्की सुगरण आहे. आईच्या हातच्या पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या, दिवाळीचा सगळा फराळ, त्याशिवाय चिकन, फिश, मटनचे प्रकार मला खूप आवडतात. माझे आई-बाबा पुण्यात राहतात. मी पुण्याला येणार असल्याचं आईला कळताच तिचा मला फोन असतो,‘ तुझ्या आवडीचं काय करू जेवायला?’ माझी आई खरंतर अष्टपैलू आहे, असं म्हणायला हरकत नाही. ती उत्तम भरतकाम, शिवणकाम करते. लहानपणी माझे सगळेच कपडे आई शिवायची आणि तेही लेटेस्ट फॅशननुसार असायचे. आता डिझायनर ड्रेसचा जमाना आल्यापासून आईनं ॲडव्हान्स कोर्सदेखील केला आणि आणि अगदी आजच्या फॅशनचे ड्रेसेस आई शिवते.

माझ्या आईचं ‘स्नेहांकित’ नावाचं पाळणाघर होतं. त्यात विविध वयोगटातली १५ ते १७ मुलं यायची. आई आणि आईची मैत्रीण दोघी मिळून ते अगदी छान सांभाळत असत. मी कॉलेजमध्ये असताना माझ्याबरोबर कुठंही ऑडिशन असली, की आई यायची. नंतर मला या क्षेत्रात करिअर करायचं होतं, माझ्याबरोबर फोटोशूट, ऑडिशन किंवा एखाद्या मीटिंगसाठी आई हजर असायची. केवळ माझ्या करिअरसाठी आईनं पाळणाघर बंद केलं. ही गोष्ट माझ्या मनात बिंबवली गेली. 

मी १९ वर्षाची असताना ‘वहिनीसाहेब’ सिरीयल मिळाली. तेव्हापासून माझं पुणे-मुंबई जाणं-येणं सुरू झालं. त्यानंतर लगेचच दोन वर्षात माझं लग्न झाल्यामुळे आईकडून स्वयंपाकातल्या बऱ्याच गोष्टी शिकायच्या राहून गेल्या होत्या. आता लॉकडाउनमध्ये व्हिडिओ कॉलवर ‘आई स्पेशल’ बरेचसे पदार्थ तिनं मला शिकवले. आई माझी अगदी जवळची मैत्रीण आहे. आपले मित्र-मैत्रिणी हे समवयीन असतात, मात्र आईशी बोलताना मला ते कधीच जाणवलं नाही. 

माझी प्रत्येक मालिका, मग ती मराठी असो वा हिंदी, आई आठवणीनं पाहते. त्यातलं काय आवडलं, काय नाही, हे आवर्जून सांगते. अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी सगळ्यांनाच घरून सपोर्ट नसतो, मला मात्र माझ्या आई बाबांनी पहिल्यापासून खूप सपोर्ट केलाय.(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com