मेमॉयर्स : आईच देते धाडस अन् ताकद

शाश्‍वती पिंपळीकर, अभिनेत्री
Sunday, 7 June 2020

मुलं ‘ममाज बॉय’ असतात आणि मुली ‘डॅडीज गर्ल’ असं म्हणतात.  पण, माझ्या बाबतीत उलटं आहे. त्यामुळं आईबाबत कुठून बोलायला सुरवात करावी, हे खरंच सुचत नाही. पण, मी आज अभिनय क्षेत्रात काम करतेय, याचं खरं कारण माझी आईच आहे. ती स्वतः गायिका आहे. प्लेबॅक सिंगर होण्याचं तिचं स्वप्न होतं; पण काही कारणामुळं ते पूर्ण होऊ शकलं नाही.

मुलं ‘ममाज बॉय’ असतात आणि मुली ‘डॅडीज गर्ल’ असं म्हणतात.  पण, माझ्या बाबतीत उलटं आहे. त्यामुळं आईबाबत कुठून बोलायला सुरवात करावी, हे खरंच सुचत नाही. पण, मी आज अभिनय क्षेत्रात काम करतेय, याचं खरं कारण माझी आईच आहे. ती स्वतः गायिका आहे. प्लेबॅक सिंगर होण्याचं तिचं स्वप्न होतं; पण काही कारणामुळं ते पूर्ण होऊ शकलं नाही. कदाचित त्याचमुळं मी पहिल्यांदा अभिनय क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे, हे सांगितलं, तेव्हा तिनंच मला प्रोत्साहित केलं. त्यावेळी मी १३ वर्षांची होती. आम्ही मूळचे पुण्याचे असल्यानं आम्हा दोघींचाही मुंबईत जाऊन काम करावं लागत होतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावेळी माझा भाऊ दहावीत होता. हे त्याच महत्त्वाचं वर्ष. घरातील काम, त्याचा अन्‌ बाबांचा डबा आणि आमच्यासाठी खाऊ... असं सगळं करून आई आणि मी भल्या पहाटे बसनं मुंबईला जायला निघायचो. ऑडिशन आली की पळा मुंबईला. पुढं निवड झाली तर चित्रीकरण. असा आमचा मायलेकींचा पुणे-मुंबई प्रवास सुरू झाला. 

चित्रीकरणावेळी दिवसभर बसून राहणं, हे फार कंटाळवाणं काम असतं. पण, तो कंटाळा मला कधीच तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही. पण, या क्षेत्रात मी एकटीनं व मोठ्या धाडसानं सामोरं जाण्यासाठी ती मला तयार करत होती. तिनं हळूहळू, एखाद्यावेळी बसमध्ये बसवून मला मुंबईला पाठवायला सुरुवात केली आणि तिनं दिलेल्या हिमतीमुळं तसेच, बाबांनी माझ्यावर टाकलेल्या विश्‍वासामुळं मी अभिनय क्षेत्रामध्ये स्थिरसावर झाले.

सगळ्या आईंना आपल्या मुलांची खूप काळजी असते. पण, तरीही मी आईला सांगितलं की, आता मला एकटीला फ्लॅट भाड्यानं घेऊन मुंबईला राहायचं आहे. तेव्हा तिनं डोळे झाकून माझ्यावर विश्‍वास ठेवला आणि घरात इतर सर्वांना माझी बाजू समजावून सांगितली. मी घर घेतल्यावर माझा छोटासा संसार सेट करून देण्यासाठी आई पुन्हा मुंबईत आली. येताना आईबाबा माझ्यासाठी एक छोटसं गिफ्ट घेऊन आले. एकटी राहणार, तर छोटसं वाहनही हवंच, असं म्हणून माझ्या हातात कारची चावी दिली.

खरंतर ही कार आईची. तिच्यासाठी ती जीव की प्राण. ती कधीच कोणाला चालवायला देत नाही. माझ्या मोठ्या भावालाही देत नाही. पण, तिनं ती कार मला दिली. त्यामुळं आता आई प्रवासात चित्रीकरणासाठी माझ्यासोबत येत नसली, तरी तिची कार माझ्याबरोबर असल्यानं आई कायमच माझ्याबरोबर असते, असं मला जाणवतं. थोडक्‍यात सांगायचं झालं तर रोज या क्षेत्रातील माझं पाऊल आणखीन घट्ट रोवण्याचं धाडस आई देते. काळजी न करता तिच माझी ताकद होते. त्याचप्रमाणं रोज नवं धाडस करायला अन्‌ नवनवीन गोष्टी करायला तिच प्रोत्साहित करते.
शब्दांकन - अरुण सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article shashwati pimplikar On Mother