जोडी पडद्यावरची : सूर तेच छेडिता, 'नाते' उमटले नवे!

स्वानंदी टिकेकर- रोहित राऊत
Saturday, 5 September 2020

सध्या सोनी मराठी वाहिनीवर ‘सिंगिंग स्टार’ हा रिॲलिटी शो लोकप्रिय होत आहे. यामध्ये अभिनेत्री स्वानंदी टिकेकर गायिका म्हणून आपल्यासमोर येत असून, तिचा मेंटॉर आहे रोहित राऊत हा गायक. स्वानंदी आणि रोहितची पहिली प्रत्यक्ष भेट झाली ती ‘सिंगिंग स्टार’च्या शूटिंगच्या वेळी. स्वानंदी म्हणते, ‘‘जेव्हा मला सांगण्यात आलं, की रोहित राऊत माझा मेंटॉर असेल, तेव्हा मी त्याला मेसेज केला होता आणि आमच्यात औपचारिक बोलणं झालं.

सध्या सोनी मराठी वाहिनीवर ‘सिंगिंग स्टार’ हा रिॲलिटी शो लोकप्रिय होत आहे. यामध्ये अभिनेत्री स्वानंदी टिकेकर गायिका म्हणून आपल्यासमोर येत असून, तिचा मेंटॉर आहे रोहित राऊत हा गायक. स्वानंदी आणि रोहितची पहिली प्रत्यक्ष भेट झाली ती ‘सिंगिंग स्टार’च्या शूटिंगच्या वेळी. स्वानंदी म्हणते, ‘‘जेव्हा मला सांगण्यात आलं, की रोहित राऊत माझा मेंटॉर असेल, तेव्हा मी त्याला मेसेज केला होता आणि आमच्यात औपचारिक बोलणं झालं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही व्हिडिओ कॉल करून गाण्याच्या तालमीविषयी चर्चा करू लागलो. आमच्यात मैत्री झाली आणि आम्ही शूटिंगला प्रत्यक्ष भेटलो, तेव्हा आम्ही याआधी कधी प्रत्यक्ष भेटलो नसल्याचं बिलकुल जाणवलं नव्हतं. आमची चांगली मैत्री झाली होती.’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोहित राऊत मेंटॉर या नात्यानं स्वानंदीविषयी म्हणाला, ‘‘गाणं येणारे, कळणारे आणि समजणारे असे तीन प्रकारचे लोक असतात. स्वानंदी ही गाणं कळणारी व्यक्ती आहे. तिला गायनाच्या कलेचा वारसा तिच्या आईकडून लाभला आहे.

स्वानंदीला उत्तम अभिनेत्री म्हणून आपण ओळखतो. ‘सिंगिंग स्टार’च्या निमित्तानं तिच्यातली गायिका आपल्यासमोर येत आहे. स्वानंदीला शिकवताना माझं काम सोपं आहे.  गाणं म्हणताना ती कुठं चुकत असल्याचं तिला लगेच कळतं आणि गाण्यातली चूक सुधारण्यासाठी मेहनत घ्यायला तयार असतेच.’’
स्वानंदीनं रोहितला याआधी अनेक गौरव सोहळ्यांत गाताना उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून पाहिलं होतं. ‘इंडियन आयडॉल’मधलं रोहितनं सादर केलेलं ‘दिल से’ हे तिला आवडलेलं गीत आहे, तर स्वानंदीची ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधली भूमिका रोहितलाआवडली होती. 

स्वानंदी म्हणते, ‘‘सिंगिंग स्टार’मध्ये सहभागी होताना रोहित मला मेंटॉर लाभला, हे माझं भाग्य आहे. त्यानं मला रियाजाच्या संदर्भात खूप उत्तम गोष्टी सांगितल्या. तो गाण्याच्या बाबतीत प्रचंड मेहनत घेणारा आहे. आपण शंभर टक्के उत्कृष्ट सादरीकरण करायचं, आपल्याला गाणी चांगली सादर करायची आहेत, हे आम्हा दोघांचं या कार्यक्रमात सहभागी होताना उद्दिष्ट आहे. स्टेजवर गाणं सादर करताना गाण्यातले हावभाव आणि त्यात पूर्णपणे तल्लीन होऊन ते सादर करणं याबाबतीत रोहितनं मेंटॉर या नात्यानं मला केलेलं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे.’’ स्वानंदीच्या स्वभावाबद्दल रोहित म्हणाला, ‘‘स्वानंदी खूप स्पष्टवक्ती आहे. तिचा सकारात्मक ऊर्जेवर खूप विश्वास आहे.’

लॉकडाऊनच्या काळात रोहितनं भरपूर खाद्यपदार्थ स्वतः करून पाहिले. विविध प्रकारचं संगीत ऐकलं आणि त्या विविध प्रकारच्या गाण्यातून आपल्याला स्वतः काय शिकता येईल, याचादेखील रोहितनं अभ्यास केला.

स्वानंदी लॉकडाउनच्या काळात गायनाचा रियाज करत होतीच. तसंच तिनं बागकाम, चित्रकला, जर्मन भाषा शिकणं आणि काही लेखन करणं या गोष्टींनादेखील वेळ दिला. ‘सिंगिंग स्टार’च्या निमित्तानं मेंटॉर रोहित आणि अभिनेत्री स्वानंदी यांच्याकडून अधिकाधिक उत्तम गाणी आपल्याला ऐकायला मिळतीलच.
(शब्दांकन - गणेश आचवल)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article swanandi tilekar and rohit raut