मेमॉयर्स : पारदर्शी नातं

Divya-Pugavkar
Divya-Pugavkar

माझं आणि माझी आई नीता सुभाष पुगावकर हिचं नातं अगदी जिवलग मैत्रिणींप्रमाणंच आहे. आम्ही खूप जास्त घट्ट मैत्रिणी आहोत. मी कोणतीच गोष्ट आईपासून लपवून ठेवत नाही. तिला पाहिलं, की आपसूकच माझ्या तोंडून एक-एक गोष्ट बाहेर पडायला लागते आणि हेच माझ्या आईच्या बाबतीतही आहे. माझी आईदेखील कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवत नाही. आम्हा दोघींची एकमेकींना साथसोबत आहे. माझी आई गृहिणी आहे. तिला क्रिएटिव्ह गोष्टी करायला फार आवडतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तिची कलात्मकता अगदी स्वयंपाकापासून घरातल्या सजावटीच्या वस्तू बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत डोकावत असते. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला फार आवडतात. माझा स्वभाव आईच्या पूर्णपणे वेगळा आहे. माझी कोणतीही गोष्ट आईला खटकली, तर ती तिथल्या तिथे बोलून मोकळी होते. मी मात्र पूर्णपणे वेगळी आहे. मी लगेच रिअॅक्ट होत नाही. आईचं नेहमी मला सांगणं असतं, की खटकणारी गोष्ट लगेच बोलून दाखवावी. मनात ठेवू नये. तिच्यातला एक गुण कोणता जर मी घेतला असेल तर तो आहे पेशन्स.

अभिनय क्षेत्रात यायचा मी विचार केला, तेव्हा सुरुवातीला तिचा नकार होता; मात्र माझी आवड आणि चिकाटी पाहून तिने मला खंबीर पाठिंबा दिला. माझ्या प्रत्येक ऑडिशनला आणि चित्रीकरणाला ती नेहमी माझ्यासोबत असते. 

मालिका क्षेत्रात माझी सुरुवात झाली ती ‘स्टार प्रवाह’च्याच ‘दुहेरी’ या मालिकेपासून. त्यानंतर ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘विठुमाउली’ या मालिकांमध्येही मी भूमिका साकारली. त्यानंतर मला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत मुख्य भूमिकेसाठी विचारणा झाली. माऊ ही व्यक्तिरेखा मी या मालिकेत साकारते आहे. ही भूमिका माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे. माऊला बोलता येत नाही. त्यामुळे ती हावभावांच्या माध्यमातून संवाद साधते. या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांच्या खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देईन. विशेष गोष्ट म्हणजे, मालिकेत शर्वाणी पिल्लई माझ्या आईच्या भूमिकेत आहे. ती माझ्या खऱ्या आईप्रमाणेच सेटवर माझी काळजी घेते. सेटवरच्या पहिल्या दिवसापासूनच आम्हा दोघींचं खूप छान बाँडिंग जमलं आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com