बैठ्या कामांमुळे जडलेल्या विकारांपासून मुक्तीसाठी 'भद्रासन आसन' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhadrasan

आज आपण महिलांसाठी लाभदायी असणारे भद्रासन पाहणार आहोत. भद्रासनाला बद्धकोनासन असेही म्हणतात. हे बैठकस्थितीमधील आसन आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, सतत दुचाकीवर प्रवास करण्यामुळे तसेच बैठ्या कामांमुळे अनेक प्रकारचे विकार जडतात. त्यातून मुक्ती हवी असल्यास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य किती गरजेचे आहे, हे आपण या मालिकेत पाहत आहोत.

बैठ्या कामांमुळे जडलेल्या विकारांपासून मुक्तीसाठी 'भद्रासन आसन'

आज आपण महिलांसाठी लाभदायी असणारे भद्रासन पाहणार आहोत. भद्रासनाला बद्धकोनासन असेही म्हणतात. हे बैठकस्थितीमधील आसन आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, सतत दुचाकीवर प्रवास करण्यामुळे तसेच बैठ्या कामांमुळे अनेक प्रकारचे विकार जडतात. त्यातून मुक्ती हवी असल्यास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य किती गरजेचे आहे, हे आपण या मालिकेत पाहत आहोत. आसनांमुळे तुमचे शारीरिक स्वास्थ्य टिकून राहते व मानसिक थकवाही जाणवत नाही. याच मालिकेतील आजचे भ्रदासन किंवा बद्धकोनासन महिलांची अनेक समस्यांपासून मुक्तता करण्यात उपयोगी ठरते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे करा आसन

 • प्रथम ताठ बसावे. दोन्ही पाय सरळ असावेत. 
 • त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावेत व पायाचे तळवे एकमेकांना जुळवावेत. 
 • पावले जास्तीत जास्त स्वतःकडे ओढून घ्यावीत. 
 • मांडी व पोटरी एकमेकांना जुळलेली असावी. 
 • दोन्ही मांड्या जमिनीला टेकलेल्या असाव्यात. (टेकत नसल्यास हळूहळू तसा प्रयत्न करावा. सरावाने त्या टेकतील.)
 • हाताची बोटे एकमेकांत गुंफून पावलांना पकडावे. या वेळी पाठीचा कणा ताठ ठेवावा. 
 • मान सरळ असावी, नजर स्थिर असावी किंवा डोळे बंद करावेत. श्‍वसन संथ सुरू असावे. 
 • जेवढा वेळ शक्य आहे, तेवढा वेळ स्थिर राहावे. आसन सावकाश सोडावे. 
 • मांडीवर खूप ताण आला असल्यास नंतर गोमुखासन करावे. 

आसनाचे फायदे

 • मांडीच्या आतील बाजूस छान ताण बसतो व त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. 
 • स्नायूंची लवचिकता वाढते. 
 • मांडीची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
 • युरिन इन्फेक्शन त्रासावर उपयुक्त आसन.
 • पाळीच्या समस्या, मुत्रविकाराचे त्रास यांवर उपयुक्त.

ही काळजी घ्या 

 • तीव्र गुडघेदुखी व सांधेदुखी असलेल्यांनी हे आसन करू नये. 
 • आसनस्थिती जमत नसलेल्यांनी भिंतीला टेकून बसावे व त्यानंतरच आसन करावे. यामुळे पाठीला आधार मिळेल व ती ताठ राहण्यासही मदत होईल. 
 • ज्यांची मांडी जमिनीला टेकत नसेल, त्यांनी मांडीखाली उशी घेऊन हे आसन करावे. 

सक्षमतेसाठी...

 • शारीरिक व मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी दररोज सूर्यनमस्कार करणेही आवश्यक आहे.
 • आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अतिविचार न करता सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा. 
 • लाफ्टर योग, फेस योग हे प्रकारही कधीतरी करावेत. त्यामुळे मन प्रसन्न राहण्यास मदत होते.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top