वुमनहूड : देशाचे खरे ‘सिंह’

Radhika Deshpande
Radhika Deshpande

शुक्रवारी सहज म्हणून ‘श’ या अक्षरावरून ‘टंग ट्विस्टर’ शोधलं आणि म्हणून पाहिलं. वाचिक अभिनयाचा सराव म्हणून. ‘शहाण्या शहामृगाने शहारत शहारत शिडीखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेपूट शेकले,’ असं ते वाक्य होतं. मग मी काही आणखी शब्द सुचत आहेत का ते पाहिलं, तर तीन सापडले. शेतकरी, शिक्षक, शिल्पकार. त्यांच्याकडे निरखून पाहिलं, तर हे अक्षररूपी शब्द माझ्याशी बोलू लागले. त्या वेळेला मी ट्रॅफिक सिग्नलवर होते. बाजूची गाडी सुरक्षाकर्मीची होती. त्याच्या गाडीत ‘सत्यमेव जयते’चं प्रतीक होतं. ज्यात चार सिंह गर्जना करत उभे आहेत असं दिसतं. बस- त्यावरूनच सुचलेला आजचा लेख आहे. माझ्या मते भारताचा येणारा काळ हा चार सिंहांवर अवलंबून असणार आहे. शेतकरी, शिक्षक, शिल्पकार आणि रक्षक.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही प्रश्न माझ्यासमोर येतात आणि विचारावेसे वाटतात. भारताची अर्ध्याहून अधिक जमीन शेतजमीन आहे तर अजून आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत आधुनिक शेतकाम, सोयी, सुविधा का नाहीत? आजही शेतकऱ्याला आत्महत्या का करावी लागते? हवं तितकं नियोजन का होत नाही? सगळं अनुकूल पर्यावरण, रचना यावर ढकलून कसं चालेल? अन्नदाता सुखी नसेल, तर त्यानी उगवलेल्या धान्यातून आपण कसे सुखी होणार? 

शिक्षक, मग तो कुठलाही विषय असो, जो विद्यादान करतो तो सर्वांत श्रेष्ठ दानी. विषय शिकवणारा शिक्षक असो वा जीवन जगायचं कसं हे सांगणारे गुरुजी असो- त्यांचं स्थान देवासमान मानलं आहे. अशा हाडामांसाच्या शिक्षकांना आज अनेक ठिकाणी महिनोन्‌महिने पगार मिळत नाही, उशिरा मिळतात. शिवाय पगारसुद्धा इतर स्किल्ड जॉब्जच्या तुलनेत कमीच आहे असं मला वाटतं. विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडे पाहण्याचा आजचा दृष्टिकोन हा ‘गरज, सिस्टिममध्ये अडकलेला, कामाच्या भारानं शीणलेला आणि यत्किंचित उत्साहाने शिकवायला गेलाच तर निव्वळ कर्तव्य निभावणारा’ असा झाला आहे. शिक्षकांची काळजी घेणं, त्यांना योग्य मान-सन्मान देणं ही काळाची गरज आहे. शिक्षकांना त्यांचं स्थान मिळालं, तर भारत गुरू-शिष्य परंपरेचं उत्कृष्ट उदाहरण ठरेल.

मी ‘शिल्पकार’ म्हणते- तेव्हा कलाकारी करणाऱ्या, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, कलेशी संबंधित सर्वांनाच त्यात मी मोजते. मी कॉलेजमध्ये असताना सर्वांनाच डॉक्टर, इंजिनिअर व्हायचं असायचं- कारण त्यांना जास्त हुशारी लागते असं मानतात. अजूनही फारसं काही बदललेलं नाही. आमची फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्री फारशी पुढारलेली नाही. बॅकस्टेज आर्टिस्ट आणि ऑनस्टेज आर्टिस्ट यात फरक करतात. खेडेगावातल्या कलाकारानं काढलेलं चित्र परदेशातून विकायला आलं, तर भरपूर पैसे देणारे आणि रस्त्यावर विकणाऱ्या कलाकाराला भिक्षेकऱ्यासारखी वागणूक देणारे लोक मी पाहिले आहेत. हे बदलायला हवं. ताजमहाल असो, वा खजुराहो- सगळ्यांनी इथल्याच कलाकारांच्या खाणीतून जन्म घेतलेला आहे. त्यांना योग्य मान-सन्मान मिळायला हवा. कलाकारांनीसुद्धा जबाबदारी ओळखली पाहिजे. 

रक्षक, मग गल्लीतला गुरखा असो, चौकातले ट्रॅफिक पोलिस असोत, नगरातले पोलिस असोत किंवा सीमेवर कडक पहारा देत असलेला भारतीय जवान असो. हे सगळे आपले प्राणरक्षक. त्यांच्यावर आक्षेप, अपशब्द बोलताना सांभाळून. आज ते कर्तव्यदक्ष आहेत, म्हणून आपण प्रत्येक दिवस सण म्हणून साजरा करू शकतो. त्यांच्याबद्दल पराकोटीचा आदर आपल्याला असायला हवा. त्यांनीही क्वचित समयी चुकीच्या मार्गानं जाऊन आपण देशाचं नुकसान आणि लोकांचा विश्वासघात तर करत नाही ना, हे तपासून पाहावं. या चार सिंहांची भारताला नितांत गरज आहे. त्या ‘टंग ट्विस्टर’मधल्या शहामृगासारखं स्वतःची शेपटी शेकत बसणाऱ्यांपैकी तुम्ही तर नक्कीच नसणार. एकदा ते ‘जिव्हापीडक भाषित’ वाक्य न अडखळता म्हणून पाहता येतं का ते बघा. प्रामाणिक प्रयत्न केलात तर नक्की जमेल. जमायला हवंच. सत्यमेव जयते. जय हिंद.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com