मेमॉयर्स : मनोधैर्य वाढवणारी आई

शीतल ढेकळे, अभिनेत्री
Saturday, 26 December 2020

सुख-दुःख आणि संकटकाळी आपली काळजी घेणारी असते ती केवळ आईच. जीवनात चढ-उतार येतच असतात. त्यामध्ये धीर देणारी जन्मदाती आई असल्यामुळे प्रगतीच्या दिशा आपोआपच दिसू लागल्या व मला यशस्वी जीवन जगण्याचा आधार मिळाला. अशा या माझ्या आईचं नाव आहे नलिनी ढेकळे. आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं, ही महत्त्वाकांक्षा ठेवणारी माझी आई नेहमीच चिंतन करत असते. घरात कोणाची साथ नसली, तरी आईची साथ वेळोवेळी मिळते, याचा अनुभव मी प्रत्येक कामात घेत आहे.

सुख-दुःख आणि संकटकाळी आपली काळजी घेणारी असते ती केवळ आईच. जीवनात चढ-उतार येतच असतात. त्यामध्ये धीर देणारी जन्मदाती आई असल्यामुळे प्रगतीच्या दिशा आपोआपच दिसू लागल्या व मला यशस्वी जीवन जगण्याचा आधार मिळाला. अशा या माझ्या आईचं नाव आहे नलिनी ढेकळे. आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं, ही महत्त्वाकांक्षा ठेवणारी माझी आई नेहमीच चिंतन करत असते. घरात कोणाची साथ नसली, तरी आईची साथ वेळोवेळी मिळते, याचा अनुभव मी प्रत्येक कामात घेत आहे. आईच्या प्रेरणेमुळेच मला चित्रपट, नाटक, मॉडेलिंग व जाहिरात क्षेत्रात पदार्पण करता आले. या क्षेत्रात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. अनेकांनी खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न केला. ही चिंता आईला समजली, तेव्हा तिने मला धीर आणि प्रोत्साहन देण्याचं काम केलं. तिच्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच मला अनेक आव्हानं आणि संघर्षाला तोंड देता आलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वक्तृत्व स्पर्धांत मी चौथीपासूनच भाग घ्यायला लागले. मराठवाड्यातील नांदेडमध्ये आमचं वास्तव्य होतं. तेव्हा तिथंच शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी पुणे इथं आल्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी प्रवेश निश्‍चित केला होता. मात्र, कालांतरानं अभिनय क्षेत्रात नशीब आजमावयाचं निश्‍चित केलं. त्या दृष्टीनं मार्गक्रमण केलं. ही वाट तेवढी सोपी नव्हती. मात्र, ध्येय आणि निष्ठा असल्यामुळे पक्का निर्धार केला. त्यासाठी वडिलांचं मोलाचं योगदान मिळालं. कारण, माझे वडील आत्माराम ढेकळे यांनी मुंबई वास्तव्यात अनेक नाटक व चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या होत्या. ते उत्कृष्ट निवेदकही आहेत. त्यांच्यामुळेच मी ही स्वकर्तृत्वावर या क्षेत्रात आपली प्रतिमा उज्वल करण्याचा ध्यास घेतला. 

मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करताना ‘ब्रदर’ या चित्रपटात मला पत्रकाराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘लॅक्‍मे’, ‘मिस मराठवाडा’, ‘फेस ऑफ पुणे’ असे विविध पुरस्कार मला मिळाले. तसेच २०१९चा ‘मिस पुणे’चा बहुमानही मिळाला. सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत ‘खिचिक’ चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली. ‘डॉक्‍टर-डॉक्‍टर’ चित्रपटातही भूमिका साकारली. एकंदरीत आपली मुलं कोणत्याही क्षेत्रात असली, तर त्यासाठी आई-वडिलांचा आशीर्वाद आणि पाठिंबा तितकाच महत्त्वाचा असतो. माझ्या आईचं शिक्षण जरी कमी असलं, तरी तिला माझ्या भवितव्याबद्दल आशा आणि अपेक्षा आहेत. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. कोणतंही यश एकदम मिळत नाही. त्यासाठी संघर्ष, परिश्रम आणि जिद्द यांची सांगड घालावी लागते. हे करत असतानाच आईची मोलाची साथ मिळत असल्याने मी नक्कीच या क्षेत्रात गरुडभरारी घेणार आहे. 
(शब्दांकन : अरुण सुर्वे) 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Shital Dhekale on Mummy