esakal | पालकत्व निभावताना  :  प्रेमाचा ‘बूस्टर पॅक...’ 
sakal

बोलून बातमी शोधा

parents

आपण अॅपसाठी नाहीतर अॅप आपल्यासाठी तयार झाले आहेत. कोणी कोणावर स्वार व्हायचे हे मात्र, आपणच ठरविले पाहिजे की नाही. मुळात समृद्ध (prosperous) आयुष्य हवंय म्हणजे त्यासाठी केवळ भरपूर पैसा हवा, भौतिक गोष्टींची रेलचेल हवी हा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो.

पालकत्व निभावताना  :  प्रेमाचा ‘बूस्टर पॅक...’ 

sakal_logo
By
आशिष तागडे

‘बाबा, महिन्याला २५ जीबी डेटा आताच्या काळात पुरतो का?’ अनन्याच्या या प्रश्‍नाने सुयश चांगलाच दचकला. कारण महिन्याला २ जीबी डेटा वापरण्यापासून त्याची इंटरनेट वापराची सुरुवात झाली होती. त्यामुळे दिवसाला १ जीबी डेटा म्हणजे त्याच्यासाठी चंगळच होती. अनन्याने बारावी झाल्यानंतरच यापुढील काळात मला हायस्पीड आणि भरपूर डेटा असलेला इंटरनेट प्लॅन घेण्याबाबत बाबाला आधीच सांगितले होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुयशने मात्र वर्षभर त्याकडे काणाडोळा केला होता. आता मात्र अनन्या हट्टालाच पेटली होती. त्यामुळे त्याने इंटरनेटचा नवीन प्लॅन घेतला होता. पूर्वकल्पना न देता प्लॅन निवडल्याने वैतागलेल्या अनन्याने बाबा ऑफिसमधून आल्या आल्या बॉम्ब टाकला होता. तो तितकाच शांतपणे झेलत वातावरण हलकेफुलके करण्यासाठी सुयश म्हणाला, ‘‘अगं, इतक्या डेटाने काय अंघोळ करायची आहे का? आमच्यावेळी...’’ त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत अनन्या म्हणाली, ‘‘बाबा, तुमचा काळ आणि काटकसरीचा पाठ प्लीज मला आता सांगू नकोस.’’ तरीही सुयशने किल्ला लढवायचे ठरविले असल्याने शांतपणे सांगितले, ‘‘खरंच इतका डेटा लागतो का, याचा विचार कर.’’ बाबाची शांतपणाची मात्रा जरा लागू पडली. थोडं शांत होत अनन्या म्हणाली, ‘‘बाबा, माझं तुझ्यासारखं नाही. तू मोबाईलमध्ये व्हॉटस्अॅप सोडले तर कोणते अॅप वापरतोस. मला व्हॉटस्अॅपसह इन्टा, फेसबुक आदींसह किमान ६ ते ७ अॅप वापरावे लागतात आणि दरम्यानच्या काळात वेब सिरीज, नवीन चित्रपट आहेच ना. दोन आठवड्यांपूर्वी तुझ्यासाठी ‘शकुंतलादेवी’ चित्रपट डाऊनलोड केला होता. तो का असाच झाला का?’’ आपल्या उत्तराने बाबा निरुत्तर झाला असे अनन्याला वाटत असतानाच सुयश म्हणाला, ‘‘तुझे बरोबर आहे. मात्र त्यावरही उपाय आहे. तू आठ दिवस उपवास कर.’’ त्यावर उसळून अनन्या म्हणाली, ‘‘बाबा, आता माझे खाणेही तू काढणार का?’’ तिला शांत करत म्हणाला, ‘‘अगं वेडे, उपवास केवळ अन्नाचाच करतात असे नाही. तू अॅपचा कर. म्हणजे एक दिवस व्हॉटस्अॅप, एक दिवस तुमचे काय ते इन्टा, एक दिवस फेसबुक असे ठरवून वापरायचे नाही. आपण अॅपसाठी नाहीतर अॅप आपल्यासाठी तयार झाले आहेत. कोणी कोणावर स्वार व्हायचे हे मात्र, आपणच ठरविले पाहिजे की नाही. मुळात समृद्ध (prosperous) आयुष्य हवंय म्हणजे त्यासाठी केवळ भरपूर पैसा हवा, भौतिक गोष्टींची रेलचेल हवी हा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो. खऱ्या अर्थानं समृद्ध आयुष्यासाठी सहा गोष्टी असणं गरजेचं आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

१. शारीरिक स्वास्थ्य 
२. मानसिक स्वास्थ्य 
३. माणसांशी इतकंच नव्हे तर निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी (आकाश, झाडं, पशुपक्षी इ. एकूण सर्वच चराचर) छानसं नातं. 
४. पुरेसा पैसा (लालसा कुठे सुरू होते हे कळणं महत्त्वाचं) 
५. कुठल्याही क्षणी आनंदी राहण्याची कला आणि 
६. समाधानी वृत्ती. 

पहिल्या पाच गोष्टी साधल्या, की समाधानी वृत्ती येते. या सहा गोष्टी असल्या की काही लागत नाही. आणि तुला डेटा अगदीच नाही पुरला तर महिनाअखेरीस बूस्टर पॅकची सोय आहेच ना.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाबाचं बोलणं अनन्या ऐकतच राहिली. बोलणं संपताच अनन्या त्याच्या गळ्याच पडत म्हणाली, ‘‘बाबा, बूस्टर पॅकची गरजच भासणार नाही...’’