esakal | पालकत्व निभावताना : ‘रंग’ जबाबदारीचे 
sakal

बोलून बातमी शोधा

पालकत्व निभावताना  : ‘रंग’ जबाबदारीचे 

ऑफिसचे रोजचे प्रेझेंटेशन करण्यापेक्षा मुलीबरोबर चित्र रंगविण्यात मजा काही औरच असते, याची अनुभूती त्याला आली. बाप-लेकीचा हा कौतुक सोहळा बायको आणि आई अत्यानंदाने पाहत होत्या. 

पालकत्व निभावताना : ‘रंग’ जबाबदारीचे 

sakal_logo
By
आशिष तागडे

नितीन नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाला होता. नेमकी आज मीटिंग असल्याने लवकर जायचे होते. सवयीप्रमाणे झोपेतून उशिरा जागा झाला. जागा झाल्यावर पहिला राग बायकोवर निघाला. ‘तिला कशाला बोलतोस’ म्हणून आईने सुनबाईंची बाजू घेतल्याने त्याच्या संतापात आणखी भर पडली. आवरत असताना मुलगी रेवा आली आणि ‘बाबा, दोन दिवस झालंय ब्रश आणि रंग आणायला सांगून. मात्र, अजून आणून दिले नाहीत. आज आणले नाहीस, तर मी आजीला घेऊन बाहेर जाते आणि आणते’ असा लटका राग बाबाला भरला. खरंतर नितीन तिच्यावरही चिडला होता. मात्र, पोरीवर राग काढता आला नाही आणि आजीला घेऊन बाहेर जाते, हा तिचा दम एकदम फिट बसला होता. प्राप्त परिस्थितीत दोघींनी बाहेर जाणे योग्य नसल्याची जाणीव त्याला होती. बायकोने आणून दिलेला नाष्टा खात तो तिला म्हणाला, ‘हे बघ तू दोन दिवसांपूर्वी मला काम सांगितले आहेस, हे मला मान्य आहे, परंतु कामाच्या गडबडीत मी विसरून गेलो. आज नक्की आणतो.’ त्यावर रेवा म्हणाली, ‘बाबा, मी तुझ्यावर रागावलेली नाही, फक्त काम वेळेत केले नाही, याची जाणीव करून दिली आणि तुझ्याकडून ते होणार नसले तर पर्यायही दिला आहे. आता कोणता पर्याय निवडायचा हा तुझा प्रश्‍न आहे.’ पोरीने चांगलेच पेचात पकडल्याची जाणीव नितीनला झाली. एकतर काम वेळेत पूर्ण न करण्याचा संस्कार नकळत रेवावर करत आहोत काय, याची टोचणी त्याला लागली आणि आज आणून देतो म्हणावे तर वेळ होणार नाही, याची खात्री होती, म्हणजे खोटे बोलून वेळ मारून नेण्याची सोयही राहिली नव्हती. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नितीन चांगल्या शिस्तीत वाढलेला असल्याने आज काही झाले तरी रेवाची मागणी पूर्ण करायचीच, असा विचार करून त्याने ऑफिसला जाण्यासाठी कार काढली. कार चालवताना त्याला रेवाची गोड बातमी आईला सांगितली, त्यावेळचे आईचे बोल आठवले. आई म्हणाली होती, ‘नितीन आता जबाबदारी वाढली आहे. तू बाप होणार आहेस. अर्थात आदर्श बाप होण्याचे कुठे शिक्षण, प्रशिक्षण दिले जात नाही. अनुभव हेच प्रशिक्षण असते. आदर्श बापाची व्याख्या नाही किंवा ते प्रमेयासारखे सिद्धही करता येत नाही. परिस्थितीनुसार कमी-जास्त करावे लागते. आपला पाल्य चांगला वागावा असे तुला वाटत असेल तर तूसुद्धा त्याच्याशी तसेच वागले पाहिजे.’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑफिसला गेल्यावर कधी मीटिंग संपते, असे नितीनला झाले होते. त्याचे प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने पार पडले होते. मीटिंग संपताच सहकाऱ्याला सांगून तो ऑफिसमधून बाहेर पडला. थेट स्टेशनरीचे दुकान गाठून रेवाने सांगितलेले सर्व साहित्य तसेच तिला आवडते चॉकलेट घेतले आणि तडक घर गाठले. दार रेवानेच उघडले. बाबा लवकर घरी आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आणलेले साहित्य रेवाच्या हातात देत तो फ्रेश व्हायला गेला. दहाच मिनिटांत फ्रेश होऊन येत तो रेवाबरोबर चित्र काढण्यात दंग झाला. ऑफिसचे रोजचे प्रेझेंटेशन करण्यापेक्षा मुलीबरोबर चित्र रंगविण्यात मजा काही औरच असते, याची अनुभूती त्याला आली. बाप-लेकीचा हा कौतुक सोहळा बायको आणि आई अत्यानंदाने पाहत होत्या. 

loading image