‘तारे जमीं पर’ आणि प्रयोग! 

आशिष तागडे 
Saturday, 12 December 2020

आईच्या परवानगीनंतर कुणालने लगेच सोसायटीतील मित्र-मैत्रिणींना आपला प्लॅन सांगितला. तो ऐकून सर्वजण प्रचंड खूष झाले. आता सर्वांची टेरेसवर आकाशनिरीक्षणाची ऑफलाइन शाळा नक्कीच भरणार, याचे त्याला आईला कौतुक वाटले. 

अरे कुणाल आजच्या ‘सकाळ’मध्ये आलेली बातमी वाचली का, आईने सहज प्रश्न केला. कुणालने नेहमीप्रमाणे कोणती बातमी असे विचारत नकारघंटा लावली. मला वाटलेच, तू ती वाचली नसणार असे म्हणत आईने सांगितले, ‘अरे, पुढील दोन दिवसांत आपल्याला उल्का वर्षाव दिसणार आहे. मागच्या वर्षी आपण विज्ञान प्रदर्शनात गेलो होतो, तिथे तू उल्कावर्षाव म्हणजे काय हे विचारले होते.’ 

‘अरे हो, आठवले...मात्र ते ऑनलाइन दिसणार आहे का,’ असे कृणालने विचारताच आईने सरबत्तीच सुरू केली. तुम्ही आजची पिढी म्हणजे केवळ अभ्यासाचा विषय आणि मार्क मिळविण्यासाठी पुस्तकातून पाठ करता आणि कोठे ऑनलाइन काही दिसते का, यावर विचार करत असता. अरे काही गोष्टी ऑनलाइन तर काही उघड्या डोळ्यांनी बघायला, अनुभवायला शिकले पाहिजे. आईच्या या जराश्या रागावर सावरत कुणाल म्हणाला, ‘अगं, तसे नाही, रात्री कोण जागणार, आणि आपल्या घराच्या टेरेसवरून दिसणार आहे का? आपल्याला त्यासाठी कोठेतरी जावे लागेल.’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुणालचा उत्साह पाहून आई म्हणाली, ‘अरे नक्कीच जाऊयात. तू असा हुरूप दाखविल्यास बाबाही बाहेर न्यायला तयार होतील. आम्ही लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत गच्चीवर झोपायचो. अख्खा वाडा असायचा गच्चीवर झोपायला. तासभर गाण्याच्या भेंड्या झाल्या की आकाशनिरीक्षण करताना झोप कधी लागायची समजायचेही नाही. वाड्यात माई आज्जी होत्या. त्या गोष्ट सांगत असताना सप्तर्षी, ध्रुवतारा, शुक्राची चांदणी, तांबूस दिसणारा मंगळ दाखवायची. आम्हाला खूप आश्चर्य वाटायचे. तुम्हा मुलांना मात्र त्याचा आनंद घेता येत नाही. हरकत नाही. आता ही संधी आहे. त्याचा नक्कीच फायदा घेऊयात. यातून मेंदू आणि मन दोन्हीलाही फायदाच होईल.’ 

आईच्या या उत्साहाचे कुणालला खूप अप्रुप वाटले. सध्या शाळा ऑनलाइन सुरू आहे. त्यामुळे हातात वेळ आहे. तसाही मोबाइल, टीव्हीवरील तेच ते कार्यक्रम पाहून तो कंटाळला होता. त्याने जरा उत्साहाने आईला सांगितले, ‘आई, मी रोज ठरावीक वेळेला आकाशाकडे बघणार आणि काय दिसत आहे, याच्या नोंदी करणार. रात्रीचे आकाश किंवा आकाशातल्या ग्रहांच्या विविध हालचाली, नक्षत्रं दुर्बिणीतून पाहणार. त्याच बरोबर आपल्या घराच्या सोसायटीच्या परिसरातील एखादे मोठे झाड एका प्रयोगासाठी घेणार. दर महिन्याला, दर आठवड्याला त्यांचे जवळून निरीक्षण करणार. आणि हो शक्य असेल तर सोसायटीमधील रोहन, अंकिता, स्वरा, अनिकेत यांनाही बरोबर घेणार. आम्ही सर्वजण मिळून हा प्रयोग करतो.’ कुणालच्या या आश्वासक तोडग्याने त्याच्या आईला काय बोलावे हेच सुचेना. ती तातडीने त्याला म्हणाली, ‘यासाठी आवश्यक काय असेल ते सांग, आजच आपण ते आणू.’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आईच्या परवानगीनंतर कुणालने लगेच सोसायटीतील मित्र-मैत्रिणींना आपला प्लॅन सांगितला. तो ऐकून सर्वजण प्रचंड खूष झाले. आता सर्वांची टेरेसवर आकाशनिरीक्षणाची ऑफलाइन शाळा नक्कीच भरणार, याचे त्याला आईला कौतुक वाटले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashish tagde write article Astronomy

Tags
टॉपिकस
Topic Tags: