काळाची पाऊले...! 

आशिष तागडे 
Saturday, 24 October 2020

आता ऑनलाइन शिक्षणानं मुलं मोबाईलवेडी झाली आहेत, हे मान्य. मात्र, काळाबरोबर आपणही बदलायला पाहिजे. नवी पिढी आणि तंत्रज्ञान याला दोष देऊन कसा चालेल? आता तू शिकत असताना कॉम्युटरचं खूळ आलं होतं.

‘‘अगं आई, काय सांगू, चिनू अजिबातच ऐकत नाही. मोबाईल सतत हातात. सारखं कोणाशी ना कोणाशी चॅटिंग सुरू असतं, अगदी वैताग आला आहे. आता दसऱ्याला मला नवीन फोन घेऊन दे म्हणून मागे लागली. आता कुठं चौथीत गेली आहे, मोबाईल घ्यायचं हे काय वय आहे का?’’ अनघानं एका दमात आईजवळ मनातील खदखद व्यक्त केली. आई शहरातील एका शाळेतून मुख्याध्यापक म्हणून नुकतीच निवृत्त झाल्यामुळे ती काहीतरी मार्ग दाखवेल म्हणून अनघानं आईला फोन केला होता. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘अगं हो. शांत हो...शांतपणे विचार कर. आणि त्रागा करून काही उपयोग आहे का, याचा आधी विचार कर. आता ऑनलाइन शिक्षणानं मुलं मोबाईलवेडी झाली आहेत, हे मान्य. मात्र, काळाबरोबर आपणही बदलायला पाहिजे. नवी पिढी आणि तंत्रज्ञान याला दोष देऊन कसा चालेल? आता तू शिकत असताना कॉम्युटरचं खूळ आलं होतं. तूही आपल्या घरातही कॉम्युटर पाहिजे म्हणून हट्ट धरला होतास. तुझ्या हट्टाखातर आणि आपल्या कुटुंबाची गरज म्हणजे तुला त्यातच शिक्षण घ्यायचं निश्चित झाल्यावर आपण कॉम्युटर घेतला. तूही सुरुवातीला त्यावर तासन् तास बसायचीस. आम्ही त्यावेळी बदलतं तंत्रज्ञान स्वीकारलंच ना! त्यामुळे तू कॉम्युटर इंजिनिअर झालीस ना. तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का, तुम्हाला सर्व काही ‘टू मिनिट्स’मध्ये आणि आयतं लागतं. चिनूचा विचार कर, तिच्या हातात मोबाईल येण्यापूर्वी ती चांगली चित्र काढायची. त्यावेळी तुझी तक्रार होती, ती अभ्यास करत नाही, नुसतीच चित्र काढते. आता मोबाईल खेळते म्हणून तक्रार करत आहे. तू चूक आहेस असं मला नाही म्हणायचं. परंतु परिस्थिती लक्षात घे. शाळेनं परवानगी दिल्यानं लगाम घालणं अवघड झालं आहे.’’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘आई, तू म्हणतीस ते बरोबर आहे. मात्र, आत्ताच तिसरी-चौथीत त्यांचे व्हॉटसॲप ग्रुप तयार झाले आहेत. व्हिडिओ कॉल सुरू झाले आहेत. त्यांचं बालपण हरवू नये असं वाटतं. सतत काहीतरी एंगेजमेंट हवी असते. मी काय करू? बोअर होत आहे, ही भुणभुण सुरू असते.’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘अगं सोपं आहे, तिला तू गेल्याच वर्षी चांगली सायकल घेऊन दिली आहेस. सकाळी पार्किंगमध्ये मोकळ्या हवेत सायकल चालवायला सांग, पळायला सांग. तूही तिच्याबरोबर चालण्याचा व्यायाम कर. आणि घरात भाजी किंवा किराणा आणला तर तो तिच्याकडून निवडून, भरून घे. तिचाही वेळ जाईल आणि तुलाही मदत होईल. तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. फक्त त्यातली नकारात्मक बाजू तिच्या कलानं समजून सांग. गंमत म्हणजे तुम्हा आताच्या पालकांकडे मुलांनी काय करू नये याची भली मोठी यादी असते, त्याऐवजी मुलांनी काय करावं, याची यादी तयार ठेव. येणारा काळ ऑनलाइनचाच असेल, त्याची तयारी ठेवा म्हणजे झालं. त्याचा तुलाही त्रास कमी होईल. तुला वेळेत काम्युटर दिला नसता तर तू इंजिनिअर झाली असती का, हे लक्षात ठेव म्हणजे झालं.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish tagde writes article about kids online education

Tags
टॉपिकस
Topic Tags: