माझिया माहेरा : रम्य ते बालपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझिया माहेरा : रम्य ते बालपण

रेडिओवर ज्योत्स्ना भोळे यांचे ‘माझिया माहेरा’ गाणे सुरू झाले अन् ऐकून मन भारावून गेले.

माझिया माहेरा : रम्य ते बालपण

- ज्ञानदा चिटणीस, पुणे

रेडिओवर ज्योत्स्ना भोळे यांचे ‘माझिया माहेरा’ गाणे सुरू झाले अन् ऐकून मन भारावून गेले. ज्योत्स्नाबाईंनी अत्यंत सुरेल आवाजात, भावुक होऊन गायलेले हे गाणे ऐकताना लग्न होऊन सासरी गेलेल्या प्रत्येक स्त्रीला आपले माहेर डोळ्या समोर आल्यावाचून राहणार नाही. मीही भूतकाळात गेले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने उद्योगपती बाबासाहेब डहाणूकर यांनी नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरपासून साधारण ४ किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र शुगर मिल्स कारखाना सुरू केला. तेथील वसाहतीला नाव दिले, ‘टिळकनगर.’ तेच माझे माहेर! गावाला धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी नसली, तरी हेतूपूर्वक कारखान्यातील कामगार, अधिकारी, त्यांचे कुटुंबीय यांच्या हिताचा विचार करून वसवलेली टुमदार वसाहत हेच वैशिष्ट्य होते.

माझे वडील रंगनाथ प्रधान तेथील जनरल ऑफिसमध्ये नोकरीला होते. आई शांता गृहिणी होती. आज दोघेही हयात नसले, तरी त्यांनी आम्हा ५ भावंडावर केलेले चांगले संस्कार, शाळेमध्ये शिक्षकांनी दिलेले ज्ञान हेच भावी आयुष्यात उपयोगी पडले. माहेरच्या आठवणी कायम मनावर ठसलेल्या आहेत. आज तो भूतकाळ असला तरी त्या वेळच्या रम्य वर्तमान काळाने आम्हाला खूप काही चांगले शिकवले होते. माझे दोन्ही काकाही तेथेच नोकरीला होते. त्यांनाही प्रत्येकी ५ मुले. म्हणजे आम्ही एकूण १५ भावंडे; पण आजतागायत आम्ही कधीही एकमेकांशी भांडलो नाहीत. अजूनही २/३ महिन्यांनी एकत्र जमतो. गप्पा-गाणी, जेवण यामध्ये रमतो.

डहाणूकर यांनी टिळकनगरच्या लोकांसाठी सर्व सोयी उपलब्ध केलेल्या होत्या. मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, मोठ्या लोकांना जिमखाना, वाचनालय, बॅडमिंटन, टेनिस कोर्ट, शाळेसाठी क्रीडांगण, दवाखाना, पोस्ट ऑफिस, को-ऑपरेटिव्ह स्टोअर्स, दुधाची डेअरी, पतपेढी, टिळक पार्क, महिला मंडळ, प्रवासासाठी टांगा, बैलगाडी, जीप गाडी, माफक दरात भाजीपाला, फळे, सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षितता इत्यादी अनेक सुविधा होत्या. धूमधडाक्यात, मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा गणेशोत्सव हे तर खास वैशिष्टय होते. माझे शालेय शिक्षण डहाणूकर विद्यालयात झाले. शाळेत सायन्सची प्रयोगशाळा होती, मोठ्या हॉलमध्ये तारांगण होते. जवळपासच्या प्रसिद्ध ठिकाणी सहलीला जात होतो. वस्तीजवळ महादेवाचे, मारुतीचे मंदिर, त्यांच्या यात्रा हा एक वेगळाच आनंद मिळायचा.

मनोरंजनासाठी जिमखान्याच्या मोकळ्या जागेत, सिनेमा दाखवण्याची सोय पण होती. कारखान्याचा परिसर मोठा होता. सर्वत्र उसाचे मळे, शेती, त्यांचे छोटे भाग पाडले होते. प्रत्येकाला वाडी म्हणत. त्यांना नावे नेत्यांची होती. सुभाषवाडी, गांधीवाडी, नेहरूवाडी इत्यादी.

माझ्या दोन्ही काकांना स्वतंत्र घरे होती; पण आमचे सर्व धार्मिक सण एकत्र साजरे होत. रक्षाबंधन, भाऊबीज आम्ही ८ बहिणी आणि ७ भाऊ एकमेकांच्या घरी जाऊन साजरे करत होतो. दिवाळीच्या फराळाचे पदार्थदेखील आई, दोन्ही काकी मिळून बनवायच्या. बोनस मिळाल्यावर नवीन कपडे, फटाके आणायला श्रीरामपूरला जावे लागायचे. नागपंचमीला झाडांना झोके बांधून, गाणी म्हणत खूप आनंद लुटला. अशा माझ्या माहेराविषयी जेवढे सांगावे, तेवढे कमीच आहे. फक्त म्हणीन-

त्या गावी टिळकनगरा, चल रे मना पुनःपुन्हा

ती जुनी वसाहत, अजून असे शांत शांत

पार्कातील टिळक पुतळा, आहे अजून मूक उभा

अजून आहे त्या तिथेच, ते आमुचे घर तसेच

ती शाळा, कारखाना, आठवतो जिमखाना

ते शैशव, ते यौवन, ती नाती, त्या भेटी

त्या शपथा, ती रुसणी, भावतात क्षणा क्षणा

जपलेले गोड सुख, तिथे असे अजून मुक

जागविण्या रम्य स्मृती, घेऊन चल मना पुन्हा

Web Title: Dnyanada Chitnis Writes Majhia Mahera Childhood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Womens Cornerchildhood