esakal | Coronavirus:मुलांमधील कोरोना टाळण्यासाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus-kids

सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरू असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय, तो मुलांमध्ये टाळायचा कसा हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे.

Coronavirus:मुलांमधील कोरोना टाळण्यासाठी...

sakal_logo
By
डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरू असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय, तो मुलांमध्ये टाळायचा कसा हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. कोरोनाच्या बाबतीत एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की, लहान मुलांना याचा धोका कमी आहे. लहान मुलांना कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो, पण लहान मुलांमध्ये याची लक्षणे ही सौम्य स्वरूपाची आहेत. ताप, कोरडा खोकला, काही प्रमाणात सर्दी एवढीच फ्लूसारखी लक्षणे कोरोनामध्येही लहान मुलांमध्ये दिसू शकतात. याची तीव्रता मोठ्या व्यक्तींएवढी नाही. अगदी तुरळक स्वरूपाचा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, तसेच सर्व वयोगटामध्ये लहान मुलांमध्ये हा मृत्यूदर कमी, म्हणजे ०.२ टक्के आहे. तोही कुपोषित, हृदय रोग, जन्मजात फुफ्फुसाचा आजार अशा लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुलांमधील कोरोना टाळण्यासाठी...
घरात किंवा आजूबाजूला कोरोनाचा रुग्ण असल्यास मुलांना कोरोनाच्या रुग्णापासून लांब ठेवावे. भविष्यात शाळा सुरू झाल्यावरही मुलाला खोकला व ताप असल्यास आठवडाभर शाळेत पाठवू नये. कोरोना टाळण्याचा सर्वोत्तम उपाय हात धुणे आहे. त्यासाठी साबण व पाण्याचा वापर करावा. लहान मुलांसाठी अल्कोहोलयुक्त हॅन्ड सॅनिटायझर वापरू नये. मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवावी. मुलांना जेवणाआधी व नंतर, शौचालयाचा वापर केल्यावर व बाहेरून खेळून आल्यावर हात धुण्यास सांगावे. त्यांना हात धुतल्यावर पुसण्यासाठी दुसरा छोटा नॅपकिन ठेवावा. या निमित्ताने या सवयी त्यांना लावाव्यात.

सध्या कोरोनासाठी लस उपलब्ध नाही, पण फ्लूची लस व इतर सर्व लसी द्याव्यात. फ्लूची लस कोरोनापासून संरक्षण करणार नसली, तरी आजारी पडल्यावर हा फ्लू नाही हे निश्चित करण्यास व कोरोनाचे निदान निश्चित करण्यास मदत होईल. इतर लसी यासाठी की, इतर कुठल्याही कारणाने आजारी असलेल्या बाळाला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. मुलांना पुढील दीड महिना खेळण्यास बागेत किंवा इतरत्र गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. खेळताना एकमेकांना हात लावायचा नाही, हे त्यांना शिकवावे. मित्रांशी व इतर कोणाशीही शेक हँड करायचे नाही, हा नियम मुलांना समजून सांगायला हवा. लहान मुलांना बाहेर जाताना काही त्रास नसल्यास मास्क वापरण्याची गरज नाही. सर्दी खोकल्याचा त्रास असल्यास मास्क वापरण्यास हरकत नाही. पुढील दीड ते दोन महिने लहान मुलांना घेऊन प्रवास टाळावा. सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्यास कोमट पाणी प्यायला द्यावे. प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी नियमित आहार, ‘व्हिटॅमिन सी’युक्त फळे, लिंबू, संत्रे, मोसंबी द्यावे.

कोरोना व्हायरस

loading image
go to top