esakal | गरोदरपणात प्रवास करताना घ्यावयाची काळजी 
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnant Women

गर्भवती महिलांनी या काळात काळजी घेणे आणि आरामदायक वातावरणात वेळ घालवणे आवश्यक असते. त्यामुळे अनावश्यक प्रतिबंध घालण्याची गरज नाही; तथापि स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. 

गरोदरपणात प्रवास करताना घ्यावयाची काळजी 

sakal_logo
By
डॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ

गर्भवती महिलांद्वारे डॉक्टरांकडे विचारल्या जाणाऱ्या सर्वांत सामान्य प्रश्नांपैकी एक म्हणजे गर्भवती असताना प्रवास करणे योग्य आहे का? गर्भवती महिलांनी या काळात काळजी घेणे आणि आरामदायक वातावरणात वेळ घालवणे आवश्यक असते. त्यामुळे अनावश्यक प्रतिबंध घालण्याची गरज नाही; तथापि स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. 

प्रवास कोणत्या वेळी करणे योग्य? 
सामान्यतः गर्भवती महिलांना प्रवास करण्यासाठीचा सर्वांत सुरक्षित कालावधी हा बारा आठवड्यांपासून ३४ आठवड्यांपर्यंत असतो. मात्र, प्रवास करण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचादेखील सल्ला घेणे आवश्यक असते. साधारणपणे रक्तस्राव अथवा कधीकधी गर्भपात होण्याच्या धोक्यामुळे महिलांना गर्भधारणेच्या बारा आठवड्यांपूर्वी प्रवास करण्याची परवानगी दिली जात नाही. चौतिसाव्या आठवड्यांनंतर म्हणजेच नववा महिना सुरू असताना, दिलेली तारीख जवळ आली असताना, पाण्याचा स्राव किंवा प्रसूती वेदना सुरू होण्याची शक्यता जास्त असल्याने प्रवासाची परवानगी नसते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चारचाकी वाहनाने प्रवास करताना : 
* प्रवासाचा मार्ग सोयीस्कर असावा. 
* प्रवासादरम्यान अनेक स्पीड ब्रेकर आणि खड्डे नसावेत आणि असतील तर वाहन हळू चालवणे आवश्यक आहे. जेणेकरून शरीराला कमी धक्का बसेल. 
* प्रवास लांब अंतराचा आणि दीर्घ कालावधीचा असेल, तर या काळात प्रवासादरम्यान पुरेशी विश्रांती घेता येईल याची खात्री केली पाहिजे. घरगुती अन्न आणि पाणी सोबत घ्यावे. 
* अन्न, पाण्याचे वेळेवर सेवन करणे आवश्यक आहे. पाठीच्या दुखण्याचा त्रास होत असेल, तर महिला कारमध्ये सहज झोपून प्रवास करू शकेल अशी व्यवस्था असावी. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेनद्वारे प्रवास करताना : 
* ट्रेनमधून प्रवास करणे हा महिलांसाठी सुरक्षित प्रवास असतो; परंतु यातही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. 
* घरगुती अन्न आणि पाणी सोबत घ्यावे. 
* बाहेरील खाद्यपदार्थांमुळे संसर्गाचा धोका संभवतो, त्यामुळे ते टाळणे आवश्यक 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विमानाद्वारे प्रवास करताना : 
गरोदरपणाच्या काळात हवाई मार्गाने प्रवास सर्वांत सुरक्षित. प्रवासाचा कालावधी कमी असतो. याशिवाय फारसा शारीरिक ताण येत नसल्यामुळे अधिक सोयीस्कर ठरते. काही विमान कंपन्या गर्भवती महिलांना चौतिसाव्या आठवड्यानंतर प्रवासाची परवानगी देत नाहीत व ‘फिट टू एअर ट्रॅव्हल’ हे प्रमाणपत्र मागू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला, परवानगी व संबंधित प्रमाणपत्र घेऊनच प्रवास करावा. 

कोणत्याही प्रवासापूर्वी, स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला आणि प्रवासासाठी परवानगी घेणे आवश्यक. कारण त्याचा परिणाम हा माता आणि बाळावर होतो. ज्या महिलांना लो लाईंग प्लेसेन्टा, मुदतीपूर्वी प्रसव होण्याचा धोका किंवा लवकर प्रसूती होण्याचा धोका असतो, अशा महिलांना विशेषत: जास्त अंतर प्रवास करण्याची परवानगी नसते.