esakal | फायब्रोइड : स्वरूप, लक्षणे, कारणे, उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

women-health

एखाद्या स्त्रीला काहीच लक्षणे दिसत नाहीत, तेव्हा तिला फायब्रॉईड आहे, याचा पत्ताही लागत नाही. मात्र, कधीकधी पाळीच्या वेळी खूप अंगावर जाणे, अवेळी आणि अकारण रक्तस्राव होणे, ओटीपोटावर भार आल्यासारखे वाटणे, लघवीच्या वेळी त्रास किंवा वेदना होणे, गर्भधारणेत समस्या निर्माण होणे आणि गर्भपात होणे, यांसारखी लक्षणे दिसून येतात. अशा वेळी उपचाराची आवश्यकता भासते.

फायब्रोइड : स्वरूप, लक्षणे, कारणे, उपचार

sakal_logo
By
डॉ. ममता दिघे

वुमन हेल्थ
वयात आल्यावर काही महिन्यांतच मुलींना पाळीची, त्या वेळी होणाऱ्या त्रासाची माहिती आणि सवय होते. या नियमित चक्राला त्या सरावून जातात. पण, काही वेळा अचानक खूप जास्त रक्तस्राव व्हायला लागतो किंवा पाळीच्या वेळी सहन न होण्याएवढे दुखू लागते. काही वेळेला या त्रासाची थेट कारणे नसतात, तर काही वेळा कारणे सापडतात. त्यातील एक कारण फायब्रॉईड असू शकते. फायब्रॉईड हा गर्भाशयाच्या स्नायूंचा ट्यूमर असतो आणि तो वाढून गर्भाशयाच्या आतल्या पोकळीत किंवा बाहेरच्या भिंतीवरही पसरू शकतो. तो ९९ टक्के कॅन्सरशी संबंधित नसतो. फायब्रॉईड होण्याची ठळक कारणे नसतात. आनुवंशिकता, वंश, हार्मोन्स, पर्यावरणातले घटक याबरोबरच पाळी लवकर सुरू होणे, ही काही कारणे असू शकतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एखाद्या स्त्रीला काहीच लक्षणे दिसत नाहीत, तेव्हा तिला फायब्रॉईड आहे, याचा पत्ताही लागत नाही. मात्र, कधीकधी पाळीच्या वेळी खूप अंगावर जाणे, अवेळी आणि अकारण रक्तस्राव होणे, ओटीपोटावर भार आल्यासारखे वाटणे, लघवीच्या वेळी त्रास किंवा वेदना होणे, गर्भधारणेत समस्या निर्माण होणे आणि गर्भपात होणे, यांसारखी लक्षणे दिसून येतात. अशा वेळी उपचाराची आवश्यकता भासते.

यावर उपचार करताना होणाऱ्या त्रासाची तीव्रता, फायब्रॉईड नक्की किती मोठा आणि कुठे आहे, पेशंटचे वय काय, पाळी संपण्याच्या आसपास आहे की अद्याप गर्भधारणेची इच्छा वा शक्यता आहे, यांसारख्या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. काही औषधोपचाराने जास्तीचा रक्तस्राव, वेदना यांवर उपाय करता येतो. काही औषधांनी फायब्रॉईडचा आकार घटवता येतो. अनेक महिने खूप रक्तस्राव होत असेल, तर त्यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठीही औषधे द्यावी लागतात. या कशाचाच उपयोग झाला नाही किंवा आकार खूप मोठा असेल आणि त्रास होत असल्यास शस्त्रक्रिया करून फायब्रोईड काढावा लागतो. लॅप्रोस्कोपीने फक्त फायब्रोईड काढता येतो किंवा गर्भधारणेचे वय उलटून गेले असल्यास गरजेनुसार गर्भाशयही काढून टाकता येते.

प्रत्येक व्यक्तीनुसार उपचार बदलतो आणि त्यासाठी तुम्हाला यांपैकी काहीही त्रास होत असल्यास लगेच तुमच्या डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्या.

पुढील गोष्टींकडे नीट लक्ष द्या
सातत्याने खूप रक्तस्राव होत असल्यास डॉक्टरांना दाखवा.
पाळीच्या वेळी औषधानेही कमी न होणाऱ्या प्रचंड वेदना होत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.
हिरव्या पालेभाज्या, फळे, सायट्रस फळे आवर्जून खा. लाल वा पांढरे मांस कमी करून त्याऐवजी मासे खा.
सोनोग्राफीने समस्येचे निदान होते; ती करून घ्या.
पुरेसे व्हिटॅमीन ‘डी’ मिळेल याची काळजी घ्या.
धूम्रपान, मद्यपान टाळा,
आरोग्यपूर्ण जीवनशैली ठेवा.

loading image