आरोग्यमंत्र : ‘हृदयमित्र’ पेसमेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pacemaker

हृदयाचे ठोके जेव्हा अतिशय कमी गतीने पडतात, त्यावेळी पेसमेकर नावाचे छोटे उपकरण बसविले जाते. हृदयामध्ये ज्यावेळी ठोके खूप मंद हातात, त्यावेळी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

आरोग्यमंत्र : ‘हृदयमित्र’ पेसमेकर

मागील भागात आपण अरिदमियाच्या उपचारपद्धतीबद्दल माहिती घेतली. या भागामध्ये आपण पेसमेकर नावाचे उपकरण काय असते त्याची माहिती घेऊयात.

हृदयाचे ठोके जेव्हा अतिशय कमी गतीने पडतात, त्यावेळी पेसमेकर नावाचे छोटे उपकरण बसविले जाते. हृदयामध्ये ज्यावेळी ठोके खूप मंद हातात, त्यावेळी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी पेसमेकर हृदयाचे ठोके वाढविते. पेसमकरमध्ये एक छोटासा सांगणक असतो, जो नेहमी हृदयाचे ठोके निरीक्षणाखाली ठेवत असतो. ज्यावेळी असे लक्षात येते, की ठोके खूपच कमी प्रमाणात पडत आहेत, त्यावेळी तो आपल्याकडून ठोके देऊन हृदय बंद पडू देत नाही. यालाच ‘डिमांड पेसमेकर’ असे म्हणतात. जर गरज असेल, तरच असे पेसमेकर काम करतात. पेसमेकरमधून एक वायर ज्याला आम्ही ‘लीड’ असे म्हणतो ते बाहेर पडते. हा लीड उजव्या हृदयाच्या खालच्या (व्हेंट्रिकल) कप्प्यामध्ये बसविला जातो. पेसमेकर बसविण्याच्या प्रक्रियेसाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी ७-७ टाके पडू शकतात. हे शस्त्रक्रिया लोकल भूल देऊन केली जाते.

पेसमेकरचे भाग

पेसमेकरचे दोन भाग असतात.

1) पल्स जनरेटर : हा पेसमेकरचा मेंदू असतो. यामध्ये हृदयाची गती व लय मॉनिटर केली जाते.

2) लीड : हे एक वायर असते, जी पेसमेकर आणि हृदयामध्ये संपर्क बनवते. पेसमेकरच्या प्रकाराप्रमाणे १,२ किंवा ३ लीड्स असू शकतात. काही नवीन प्रकारच्या पेसमेकरमध्ये लीड्सपण नसू शकतात.

पेसमेकरचे प्रकार

आपल्या गरजेनुसार पेसमेकरचे खालील प्रकार असतात.

1) एक लीड पेसमेकर : यामध्ये एकाच लीड असतो. हा सर्वांत प्राथमिक स्वरूपाचा पेसमेकर आहे.

2) दोन लीड पेसमेकर : डीडीडीआर पेसमेकर. हा आधुनिक स्वरूपाचा पेसमेकर असून, तो हृदयाच्या नैसर्गिक पेसमेकरच्या खूप जवळ जाणारा असतो. यामध्ये हृदयाच्या उजव्या भागातील वरील आणि खालील दोन्ही कप्प्यांमध्ये लीड टाकले जाते.

3) कार्डियाक रेशनक्रोनिझेशन थेरपी : यामध्ये ३ लीड्स असतात. तिसरा लीड हा कोरोनरी सायनस या अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये बसवला जातो. यामुळे हृदयाची डावी आणि उजवी अशा दोन्ही बाजूला एकत्र ठोके दिले जातात. ज्या रुग्णांचे हृदय कमी क्षमतेने चालत असते, त्यांच्यासाठी हा पेसमेकर एक वरदान आहे.

4) आयसीडी : या पेसमेकरमध्ये ठोके देण्याव्यतिरिक्त हृदयाला शॉक देण्याचीही सोय असते. हृदय एकदम जोरात ठोके देऊन धडधडायला लागल्यास हे उपकरण आपणहून शॉक देऊन हृदय परत चालू करते.

पेसमेकर बसविल्यानंतर घ्यायची काळजी

  • शस्त्रक्रियेनंतर इन्फेकशन होऊ नये याची खूप काळजी घ्यावी लागते. २४ तास त्या बाजूचा हात हलविता येत नाही.

  • मोबाईल फोन हा थोडा ६ इंच दूर धरून बोलावे. शक्यतो वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवू नये. एमआरआयसारख्या तपासणीवेळी विशेष काळजी घ्यावी. काही प्रगत पेसमेकर असताना एमआरआय करता येऊ शकतो. या संबंधीची माहिती आपल्या कार्डिओलॉजिस्टकडून घ्यावी.

  • दर एक वर्षाने पेसमेकर हा चेक करून घ्यावा- जेणेकरून त्याचे काम व्यवस्थित चालू आहे अथवा बॅटरी किती शिल्लक आहे याची कल्पना येते. नवीन पेसमेकरची बॅटरी साधारणपणे ७-९ वर्षे एवढी चालते. त्यानंतर एक छोटीशी शस्त्रक्रिया करून पल्स जनरेटर बदलावा लागतो.

  • पेसमेकर हे एक जीवनावश्यक उपकरण आहे आणि त्यामुळे जीवनाची प्रत वाढू शकते आणि प्रसंगी जीवही वाचू शकतो.

टॅग्स :Womens Cornerheart attack