‘पॉवर’ पॉइंट : ‘स्विच ऑफ, स्विच ऑन’चं तंत्र

Switch-Technic
Switch-Technic
Updated on

आत्ता हा लेख वाचत असाल तेव्हा अगदी एका दिवसावर राष्ट्रीय रंगभूमी दिवस आहे. नाटक- रंगभूमी ही एक जादुई गोष्ट असते. मोठी होतानाचा काही काळ (म्हणजे आता मला सगळं कळतं असा दावा नाही); पण आयुष्यात १६ ते २१ वर्ष हा काळ मला अत्यंत महत्त्वाचा, सेन्सेटिव्ह वाटतो. त्या काळात मी या जादूई दुनियेचा छोटासा भाग होऊ शकले, म्हणून या दिवसाविषयी माझ्या मनात आत्मीयता आहे. अभिनयातच पुढे जावं असं वाटत असताना माझ्या करिअरची दिशा मी विचारपूर्वक निर्णय घेऊन बदलली हा भाग वेगळा. पण स्टेजवर उभं राहण्यानं मला खूप काही शिकवलं- जे माझ्या आतमध्ये कायमस्वरूपी कोरलं गेलं आहे. 

मला चार लोकांसमोर उभं राहून बोलता येईल का? या आत्मविश्वासापेक्षा, मी उभी राहिले तर नेमकं काय, किती, कसं, बोललं पाहिजे याचा आत्मविश्वास मला स्टेजनं दिला. आणि आज मला तुमच्यासोबत अशी गोष्ट शेअर करायची आहे, जी मला या जादुई दुनियेमुळे अधिक नीट समजू शकली. करिअरच्या चौकटीच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीनं मानसिक शांतता दिली आहे.

ती गोष्ट म्हणजे ‘स्विच ऑन स्विच ऑफ’ होण्याची. हे एक भयंकर भारी टेक्निक आहे- जो नंतर माझा स्वभावच झाला. एका मुद्द्यातून दुसऱ्या मुद्द्यावर जाताना, एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगाला तोंड देताना, एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जाताना, अगदी एका व्यक्तीशी प्रदीर्घ, गंभीर संवाद साधल्यानंतरही दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या व्यक्तीशी हलकाफुलका संवाद साधताना हे ‘स्विच ऑफ स्विच ऑन’ टेक्निक आता माझ्या स्वभावाचा भाग झाला आहे. 

काहींना हे स्वार्थी वाटेल, काहींना हा कोरडेपणा वाटेल, काहींना हा खोटेपणा वाटेल; पण मला हा गरजेचा अलिप्तपणा वाटतो. माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व्ह असूनही त्या परिस्थितीकडे, व्यक्तीकडे अलिप्तपणे पाहण्याची सवय मला लागली ती लागलीच. एका क्षणी कुठल्याशा कारणानं एखाद्या व्यक्तीशी संतापून बोलल्यानंतर लगेचच दुसऱ्या क्षणी त्याच व्यक्तीशी शांतपणे बोलता यायला हवं. हे बोलणं सोपं आहे; पण वागताना आधीच्या भानवेचा थ्रेड पुढे खेचला जातोच. तो तिथल्या तिथे तोडता आला, तर हे ‘स्विच ऑफ स्विच ऑन’ टेक्निक जमलं.. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थात आधीच्या प्रसंगाशी, व्यक्तीशी, घटनेशी असलेला थ्रेड कापून पुढच्या पायरीवर उडी मारणं हा स्वभाव फार कौतुकास्पद नसेलही; पण हे झालं समाजाच्या दृष्टीनं माझ्या स्वभावाचं विश्लेषण. पण मुळात विचारांचे, व्यक्तींचे, घटनांचे, अनुभवांचे असे कम्पार्टमेंट करता येणं हे अगदी नकळत होत असेल, आणि त्यानं मानसिक शांतता मिळत असेल तर त्याहून महत्त्वाचं काहीही नाही. 

कॉलेजमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर मैत्रीण म्हटली होती, ‘‘मूव्ह ऑन यार, जगात काही तो एकटाच आहे का’’... लहानपणी आजी तिच्याच वयाच्या मैत्रिणीला म्हटलेली आठवतीये, ‘‘तू आता यातून मन काढून घे, त्यांचं ते बघतील.’’ आज या वाक्यांचा विचार करताना वाटतं, की असं ‘मूव्ह ऑन’ व्हावं लागणं, किंवा ‘जाणूनबुजून मन काढून घ्यावं लागणं’ यापेक्षा त्या त्या क्षणी ‘स्विच ऑफ’ होऊन पुढच्या क्षणी नव्या अनुभवांसाठी, व्यक्तींसाठी, प्रसंगांसाठी ‘स्विच ऑन’ होणं अधिक सोपं आहे. काय वाटतं तुम्हाला?

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com