esakal | ‘पॉवर’ पॉइंट : बाण... शब्दांचे!
sakal

बोलून बातमी शोधा

Word Power

‘पॉवर’ पॉइंट : बाण... शब्दांचे!

sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

‘अशक्य आहेस तू,’ तो तावातावानं तिला म्हटला. मी करतीये ते कधीच त्याच्यासाठी ‘इनफ’ का नाहीये? असं वाटून तिचा आहे तो कॉन्फिडन्सही गळला. त्यानं मला कितीदा हे ऐकवलंय, याचा हिशेब ती काढायला बसली. दोघांना जेवायला बोलवून हातून पाच जणांना पुरेल एवढा स्वयंपाक झाला तेव्हा.. त्याच्या खेकसून बोलण्यानं डोळ्यात पाणी तरळलं तेव्हा... जवळच्या मित्राचा फोन आल्यावर हातातलं काम झटकून फोनकडे धावले तेव्हा... ‘तुझ्या नातेवाईकांच्या गराड्यात मला एकटीला सोडू नकोस,’ असं ठामपणे म्हटले तेव्हा... अशा कित्येक छोट्या प्रसंगात त्यानं ही वाक्यं ऐकवली होती. जेवणाचा चुकलेला अंदाज, तापट स्वरानं बिथरणं, हक्काच्या माणसाशी बोलावंसं वाटणं, मुखवट्यांच्या दुनियेपासून लांब रहावसं वाटणं, या सगळ्यात अगम्य कोणती भावना आहे? हे तिला कधीच समजलं नाही.

आपण सगळ्यांनी कधी ना कधी हे अनुभवलं असेल. काही व्यक्ती सातत्यानं आपल्याला असं काही बोलत असतात, की एखादी गोष्ट करण्याचा आपला कॉन्फिडन्सच हलतो. मग फक्त ‘ते’ वाक्यं ऐकायला मिळू नये, म्हणून आपलं सगळंच वागणं, बोलणं, कृती अतिशय घासूनपुसून करायला लागतो. नव्या नोकरीत, नव्या घरात, नवीन नात्यात कधीही अशी वेळ येऊ शकते. एकवेळ माझ्यातला इनोसन्स, म्हणजे निरागसता गेली तरी चालेल; पण मला अमुक अमुक व्यक्तीकडून ‘हे’ वाक्य शेवटी ऐकायचं नाहीये, म्हणून आपण इतके तोलून मापून राहायला लागतो, की आपल्यातली नैसर्गिक लय मरून जायला लागते. आणि हीच ती वेळ असते, जेव्हा त्या वाक्यांचा अर्थ आपण आपल्यापुरता बदलण्याची नितांत गरज असते. समोरचा किती हिणकस प्रकारे आपल्याला हे वाक्यं म्हणलाय, त्याचा ‘सूर’ धरून बसण्यापेक्षा, त्याच वाक्याचा दुसरा अर्थही निघू शकतो. वरच्या उदाहरणात, ‘‘तू अशक्य आहेस’’ याचा तिनं तिच्यापुरता दुसरा अर्थ घ्यायला हवा होता. म्हणजे तिनं असा विचार करायला हवा, की लोकांसाठी ओंजळभरच करण्यात समाधान न वाटणं, भांडणातून चढलेला स्वर टोचणं, जोडलेली नाती जपण्यासाठी धावणं, आणि ओढूनताणून जपावी लागतील अशी वेळ आलेल्या नात्यांचे ताण न घेणं. हे सगळं करणं, म्हणजे समोरच्याला आपण ‘अशक्य’ वाटणं असेल, तर खुशाल तिनं आयुष्यभर ‘अशक्यच’ राहावं.

एखादा सतत आपल्यावर फेकत असलेल्या वाक्यांचे अर्थ स्वत:पुरते बदलून घेणं फार कठीण नसतं. शब्द जादुई असतात, कधी ते त्रासदायक... कधी आधार देणारे. आपल्याला त्रास होणाऱ्या शब्दांचा अर्थ बदलून आपला कॉन्फिडन्स वाढणार असेल तर काय हरकत आहे असे ‘शाब्दिक खेळ’ खेळायला? समोरच्यानं आपल्यासाठी स्वल्पविराम, पूर्णविराम का ठरवावेत? आपल्यावर प्रश्नचिन्हं का फेकावीत? समोरच्यानं आपल्याला पूर्णविराम दिला असेल, तर तो आपण आपल्यासाठी स्वल्पविराम का ठरवू शकत नाही? याचा एकदा विचार करूया. समोरचा काय आणि कसं बोलतो यापेक्षा, मला त्यातलं काय, कसं आणि कितपत ऐकायचंय, असा विचार केला तरच आपली नैसर्गिक लय मरणार नाही. ‘‘तू नॅचरल राहा, जशी आहेस तशी’ हे समोरच्याला त्याच्या सोयीनं हवं असतं. पण तसंच कायमस्वरूपी असण्याचं सुख, फक्त स्वत:चं स्वत:ला माहिती असतं. ते आयुष्यभर अनुभवता आलं पाहिजे.