दिलखुलास : भूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Appetite
दिलखुलास : भूक

दिलखुलास : भूक

- कांचन अधिकारी

तहान लागलेल्या माणसाला आजूबाजूचं काहीही दिसत नाही. त्याला फक्त डोळ्यांसमोर बिसलेरीची बाटली दिसते. त्यामुळे ती कोणत्या दुकानात मिळेल, हाच विचार त्याच्या डोक्यात घोळत असतो. त्याला समोरून विद्या बालन जरी गेली, तरी लक्षात येणार नाही. तसंच भूक लागलेल्या माणसाची नजर रेस्टॉरंट कुठे आहे हेच पाहत असते. त्याला ज्वेलरीचं दुकान, फर्निचरचं दुकान यांत रस नसतो. लग्नाळलेल्या मुलाची नजर ही मुलींवरून हटत नसते, तसंच उपवर मुलगी कोणता मुलगा आपल्याला योग्य ठरेल याच विचारात गुरफटलेली असते. साधी चप्पल शिवणाऱ्याचीही नजर लोकांच्या चपलांवर असते. त्याच्या वर त्याची नजर जातच नाही. कपडे शिवणारा टेलर कपड्यांकडे प्रथम पाहतो. दुसरीकडे जर आपण आपला कुर्ता शिवून घेतला आणि तो घालून जर आपण आपल्या टेलरकडे गेलो, तर पहिला प्रश्न तो आपल्याला विचारतो, की ‘तुम्ही हा कुर्ता कुठे शिवून घेतलात?’

आता आमच्या क्षेत्रापुरतं बोलायचं झालं, तर एक अभिनेता दुसऱ्या अभिनेत्याचा अभिनय प्रथम पाहतो व नंतर त्याची नजर कला दिग्दर्शन, मेकअप व दिग्दर्शनाकडे जाते. एक दिग्दर्शक जेव्हा दुसऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट पाहतो, तेव्हा त्याची पारखी नजर त्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे अधिक असते. थोडक्यात काय? तर ज्याला ज्याची भूक आहे, तिथेच त्याची शोधक नजर आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपली शिक्षणाची भूक ही अधिक शिक्षित होऊनच पुरी करायची असते.

आजकाल समाजात बलात्काराच्याही बातम्या वाचायला मिळतात. त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे? समाजातील काही घटकांची विकृत भूक हेच आहे. स्त्री ही उपभोगाची वस्तू समजून तिच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार होतच असतात. यात त्या व्यक्तीचं Sexual Frustration म्हणजेच त्याची कामवासना उफाळून येऊन तो हे कृत्य करतो आहे का, हेही बघितलं गेलं पाहिजे. समाज अनेक वृत्ती व प्रवृत्तींनी भरलेला आहे. यात विकृती हीसुद्धा एक ‘प्रकृती’ आहे असंच दिसून येतं.

सध्याचं युग हे ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं आहे. तरुणाई टीव्ही, रेडियो यापासून दूर जाऊन नेटफ्लिक्स, डिस्ने, हॉटस्टार, सोनी लिव्ह, ॲमेझॉन प्राइम याकडे जास्त आकर्षिली जात आहे. ओटीटीवर येणाऱ्या वेब सीरिजमध्ये जास्त सेक्स, हिंसाचार, शिव्या असा आक्षेपार्ह कंटेंट खूपच पाहायला मिळतो. हे सर्व सतत पाहून पुरुषांची वासना जागृत होण्यास मदत होते आणि मग ही अशी कामवासना भागवण्यासाठी बलात्कार आणि मग स्त्रीने कुठे बाहेर बोलू नये म्हणून तिला जीवानिशी संपवणं हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

निर्भया प्रकरण, कोपर्डी प्रकरण, मथुरा प्रकरण, शक्ती मिल प्रकरण... जितकी नावं लिहावीत तितकी कमीच आहेत. ओटीटीवरच्या कंटेंटचं अतिशय उच्छृंखल पिक्चरायझेशन असतं, ज्यामुळे पाहणाऱ्याच्या भावना उद्दीपित झाल्याच पाहिजेत. अशा सर्वांवर कायद्याने चाप लावलाच गेला पाहिजे. सेल्फ सेन्सॉरशिप काम करत नसेल, तर तिथं राष्ट्रीय सेन्सॉरशिप हवीच, या मताची मी आहे. एकदा प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्याशी बोलण्याचा योग आला होता, तेव्हा ते मला म्हणाले होते, ‘‘मी डबल मीनिंग डायलॉग्ज लिहितो व बोलतो म्हणून माझ्यावर सेन्सॉर बोर्डाची कात्री जोरात चालते. पण माझ्या कुठल्याही चित्रपटात स्त्रीच्या अंगावरचा पदर ढळलेला मी कधीही दाखविलेला नाही. माझ्या चित्रपटातील डायलॉगचा अर्थ (अश्लील) तुम्ही तसा लावताय. मी निरागसतेनंच बोललाय तो डायलॉग.’’ यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवू या; पण आपण जे ऐकतो, पाहतो, खातो तशी आपली वृत्ती बनते हे खरं.

भूक ही अन्नाची, पाण्याची, पैशाची, कामवासनेची कशाचीही असली, तरी त्यावर स्वत्वानंच विजय मिळवता आला पाहिजे. ज्याचं आपल्या मनावर व शरीरावर नियंत्रण आहे तोच माणूस उच्चपदावर पोचतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Womens Cornerappetite
loading image
go to top