दिलखुलास : जीवन सोपं करू या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Life

मी व माझा मुलगा आम्ही गाडीतून एकत्र जात असलो, की त्याला आत्ताची नवीन गाणी ऐकायची असतात आणि मला ८० ते ९० च्या दशकातली.

दिलखुलास : जीवन सोपं करू या!

- कांचन अधिकारी

मी व माझा मुलगा आम्ही गाडीतून एकत्र जात असलो, की त्याला आत्ताची नवीन गाणी ऐकायची असतात आणि मला ८० ते ९० च्या दशकातली. मी अजूनही जुनाट पद्धतीनं गाडीतल्या सीडीवर गाणी ऐकते व तो ब्ल्यूटूथवर कनेक्ट करतो. आजकाल म्युझिक इंडस्ट्रीमध्ये खरंच काही पैसा मिळत नाही- कारण, बहुतांश लोकं गाणी डाउनलोड करतात. टेक्नॉलॉजी ही एक अशी गोष्ट आहे, की आपल्याला कळायच्या आतच ती गोष्ट outdated होऊन नवीन शोध लागलेलाच असतो. आता हेच पाहा ना, पूर्वी टीव्हीचा चौकोनी खोका असायचा. त्यानंतर भिंतीवर लागणारा स्लिम फिट एलसीडी कधी आला आणि आपणही आपल्या नकळत चांगला चालता चौकोनी टीव्ही कधी विकला आणि कधी एलसीडी बसवून घेतला हे आपल्यालाही आठवत नाही.

मोबाईल फोनच्या बाबतीत तर एवढे शोध लागलेत, की पूर्वीचा फोन म्हणजे ‘आला रे’ आणि ‘गेला रे’ एवढाच होता; पण म्हणून आपलं काम कुठे अडत नव्हतं आणि केवळ तेवढंच काम फोनचं असल्यामुळे तो कायम सुरळीत चालायचाही. कधी हँग होत नव्हता. हळूहळू त्यात मेसेजेस आले. मग कॅमेरा आला. मग तो कॅमेरा किती जीबीचा आहे ते आलं. आता तर त्यात प्लेस्टोअर आहे- म्हणजे माणूस एकटा बसला असेल, तर त्याला आपला जीव रमवण्यासाठी दुसऱ्या कुणाची वाट पाहायला नको. आपलं प्लेस्टेशन उघडायचं आणि एकटं खेळत बसायचं. पण या सगळ्या गोष्टी माणसाला एकटेपणा आणवतात हे आपण विसरत चाललो आहोत. सध्या व्हॉट्सॲपनं तर लोकांना वेडच लावलंय. आत्ताच्या तरुण मुली तर एखाद्या हॉटेलात बसतात. समोरच्या बटाटावड्याचा फोटो काढतात आणि आपल्या मैत्रिणीला पाठवतात व खाली मेसेज लिहितात- ‘लवकर ये वडा थंड होतोय!’ वडाही खुशीत येतो आपलाही कोणीतरी फोटो काढतंय या कल्पनेनं.

आजकाल तर टच स्क्रीन फोनमध्ये सगळीच ॲप्लिकेशन्स असतात. अगदी बँकेच्या कामापासून ते सिनेमाचं तिकीट बुक करण्यापर्यंतची सगळी कामं आपण एका छोट्या मोबाईलवरून करू शकतो. इतकंच काय, हिंदू तिथी, कॅलेंडर, मुहूर्त सगळीच माहिती आता फोनवर मिळते.

पूर्वीच्या काळी संध्याकाळ झाली, की आपण पाढे म्हणत असू- कारण तेव्हा कॅलक्युलेटर इतका सहज उपलब्ध नव्हता; पण आता तर फोनमध्येच असतो. मोबाईल फोनची ॲप्लिकेशन्स शिकावी तेवढी थोडीच आहेत. मला तर चक्क ती माझ्या मुलाकडून शिकून घ्यावी लागतात. थोडक्यात काय, तर टेक्नॉलॉजी जशी पुढारते, त्याप्रमाणे लगेचच आपण आपलं जुनं इन्स्ट्रुमेंट काढून टाकतो आणि नवीन घेऊन येतो. मग आपल्याला त्यासाठी इएमआय मोठा भरावा लागला तरी चालेल. पूर्वीच्या काळी म्हणायचे, की आपण आपली राहणी साधी ठेवावी आणि उच्च विचारसरणी ठेवावी. आजकाल उलट झालंय, ज्याची राहणी उच्च त्याला समाजात मान-सन्मान जास्त मिळताना आपण पाहतो. विचारसरणीला विचारणाऱ्यांची संख्या रोडावत चाललीय. आज आपल्याकडे सॅन्ट्रो गाडी असेल, तर आपण होंडा सिटीची स्वप्न पाहतो. सिटी आली, की फॉर्च्युनरची स्वप्न पडतात. फॉर्च्युनर आली, की मर्सिडीज हवीहवीशी वाटते; पण या सगळ्या प्रक्रियेत आपण आपल्याला किती खेचत नेतोय याचा आपण विचारच करत नाही. त्यासाठी खूप पैसा कमवायचा हेच एकच महत्त्वाचं ध्येय ठरवतो. मग आपली फॅमिली, आपले दोस्त, आपला स्वतःचा असा वेळ आपण ठेवूच शकत नाही आणि मग या सगळ्या वस्तू हेच आपलं जीवन बनून जातं. आपल्याला जग सुखानं जगता यावं यासाठी आपण म्हणजे मानवाने या वस्तू निर्माण केल्या आहेत; या वस्तूंच्या मागेच मानव धावायला लागला आणि मुख्य जे होतं ‘सुख’ जे आपल्याला फक्त आपल्या माणसांच्या बरोबरच मिळणार आहे, ते सुंदर क्षणच तो हरवून बसला. कारण, त्याला सगळा वेळ त्यासाठी लागणारा पैसा कमवण्यातच जाऊ लागला.

माझे आई-वडील अतिशय साधे, सरळ, सच्चे आहेत. त्यांना मोबाईल नको आहे. चौकोनी टीव्ही मी काढून टाकला व नवीन एलसीडी त्यांना घेऊन दिला, तर ते मलाच रागावले की, ‘का तो टीव्ही विकलास? त्यावरही चित्र दिसत होतं!’ ते म्हातारे झाले असल्यामुळे घरातील फोन त्यांना पुरतो कारण, ते कुठेही आता बाहेर जातच नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं ते आनंदी आहेत. त्यांच्या गरजा मोठ्या नाहीत- त्यामुळे त्यांचं जीवन सुखी आहे. त्यांनी जीवनाला सोप्पं केलं आहे. तुम्हीही थोडासा वेळ काढून या गोष्टीवर विचार करा- मग तुम्हालाही जाणवेल अशा कितीतरी वस्तू आहेत- ज्याची आपल्याला खरंच किती आवश्यकता आहे? विचार करा आणि जीवन सोप्पं करून टाका.

‘संतुलित दिमाग जैसी कोई सादगी नहीं

संतोष जैसा कोई सुख नहीं।।’

Web Title: Kanchan Adhikari Writes Lets Make Life Easier

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :LifeWomens Corner
go to top