दिलखुलास : ‘फापटपसारा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Property

माझ्या ओळखीचे एक सद्‍गृहस्थ आहेत. त्यांचं लहानपण खूपच खडतर परिस्थितीतून गेलंय. अत्यंत संघर्ष करून आज ते ‘श्रीमंत’ या स्तरावर आलेले आहेत.

दिलखुलास : ‘फापटपसारा’

- कांचन अधिकारी

माझ्या ओळखीचे एक सद्‍गृहस्थ आहेत. त्यांचं लहानपण खूपच खडतर परिस्थितीतून गेलंय. अत्यंत संघर्ष करून आज ते ‘श्रीमंत’ या स्तरावर आलेले आहेत. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवल्यामुळे अक्षरशः मधुकरी मागून त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांचं लग्न झालं अर्थातच साधेपणानं. नंतर कन्यारत्नही झालं. मुलगी खूप हुशार निघाली. या गृहस्थांना शिक्षणाची, वाचनाची खूप आवड. त्यांनी मुलीला उत्तम शिक्षण दिलं. ती परदेशी निघून गेली. त्यांचं त्यांच्या बायकोशी न पटल्यामुळे ते तिच्यापासून विभक्त राहू लागले. अर्थातच त्यांच्यावर जुन्या संस्कारांचा पगडा असल्यामुळे ते विभक्त राहू लागले असले, तरी त्यांनी रीतसर घटस्फोट घेतला नाही. आजही ते आपल्या पत्नीची आर्थिक बाजू स्वतः सांभाळतात. तिला काहीही कमी पडू देत नाहीत.

आज ते सत्तरीच्या जवळपास आलेले आहेत. खूप प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या, स्वतःचं ऑफिस आहे, स्टाफ आहे. मुलगी परदेशात खूप उच्च पदावर आहे. तिलाही खूप मोठा पगार आहे. तिनं लग्न केलेलं नाहीये. आज या गृहस्थांची अवस्था अशी झालेली आहे, की मी हे सर्व कुणासाठी केलं? कारण त्यांच्या मुलीनं त्यांना सरळ सांगून टाकलं, की बाबा तुम्ही हा एवढा ‘फापट पसारा’ कशासाठी मांडलात? आपल्याला एवढ्याची गरज नाहीच आहे मुळी. तुम्ही सर्व विका आणि इकडे या. त्यांच्या मनाला ‘फापटपसारा’ हा शब्द एवढा लागलाय ना! की ते मला सांगतात, ‘आता तुम्हीच सांगा? मी हा जो व्यवसाय करत होतो, तेव्हा मी हा ‘फापटपसारा’ करतोय, असं मला कधी वाटलंच नाही! आणि खरंच आहे.

माणूस २० वर्षांपासून कमवायला लागला आणि अगदी वयाच्या ६५ पर्यंत जरी कमवत राहिला, तरी बऱ्यापैकी प्रॉपर्टी जमा करू शकतो. पुढे जाऊन मुलांना त्याची फारशी किंमत असेलच याची खात्री देता येत नाही. परदेशी राहणारी मुलं तर एकदा गेली तिकडे, की तिकडचीच होऊन राहतात. मग त्यांना इकडे वडिलांनी केलेल्या प्रॉपर्टीत मानसिक गुंतवणूक राहतच नाही. मग ते वडिलांच्या मृत्यूनंतर इकडे येतात, सर्व प्रॉपर्टी जो भाव येईल त्या भावाला विकतात, पैसे गाठीशी मारतात आणि जातात.

ही परिस्थिती आज अनेक घरांतली आहे. तेव्हा आत्ताच्या साठीला आलेल्या पिढीनं हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपण पदरमोड करून चपला झिजवून, डोकं खपवून, प्रसंगी उपाशी राहून कमवलेला पैसा स्वत:साठी वापरा. तुमच्या बकेट लिस्टमध्ये ज्या-ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या, त्या-त्या तुम्ही लवकरात लवकर करायला घ्या. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मुलांना आपण शिकवण देऊन त्यांच्या पायांवर उभं केलं आहे- तेव्हा आता त्यांची वाट त्यांनाच चालू द्या. त्यात ढवळाढवळ करायला जाऊ नका. परदेशभ्रमण करा. उत्तमोत्तम कार्यक्रमांना आवर्जून जा. जे खावंसं वाटतंय ते खा, दोस्तांमध्ये रममाण व्हा. आपला एखादा छंद जोपासा. थोडक्यात स्वतःसाठी जगा. पुढच्या सात पिढ्यांची चिंता सोडा. तुमच्याकडे कितीही पैसा असला, तरी गेलेली वेळ परत येत नसते. तेव्हा pamper yourself. Think for yourself.

Web Title: Kanchan Adhikari Writes Property Investment Old People

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top