ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : एका केकची ‘गोड’ गोष्ट

Cake
Cake

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने जगभरात असंख्य लोक आपल्या आवडत्या व्यक्तींना भेटवस्तू आणि गोड पदार्थ भेटस्वरूप देतील आणि या गोड पदार्थांच्या यादीत सर्वांत पहिलं नाव केकचं असेल.

फ्रेश क्रीम केक सध्या ट्रेंडिंग आहेत आणि त्यात असंख्य फ्लेवर्स, डिझाईन उपलब्ध आहेत. चॉकलेट केकला लोकांची सर्वात जास्त पसंती असते आणि त्या खालोखाल स्ट्रॉबेरी, कॅरॅमल इत्यादी फ्लेवर्स. मात्र, केक आजच्या स्वरूपात यायच्या शतक आधी मात्र खूपच निराळ्या स्वरूपात होता. खमंग भाजलेला शाही ब्रेड असं म्हणू शकतो. केकचं सर्वांत जुनं नाव ‘काका’ असं आहे. काही खास प्रसंगी मित्रमंडळींसोबत मेजवानीमध्ये केक सर्व्ह केल्याचे उल्लेख ग्रीक आणि रोमन साहित्यात सापडतात. त्याकाळातले केक अर्थात अगदी जड एखाद्या बेक्ड पुडिंगसारखा लागत असे. नेहमीच्या ब्रेडपेक्षा थोडा अजून शाही ब्रेड तयार करावा या उद्देशानं त्यात अधिक प्रमाणात अंडी, बटर आणि यीस्ट किंवा बिअर, मध, सुका मेवा हे घटक घातले गेले. त्यापासून तयार झालेला केक हा बऱ्यापैकी घट्ट आणि जड असे. आजही इटलीमधील प्रसिद्ध पॅनेटॉने नावाचा ब्रेड हा जुन्या केकच्या जवळ जाणारी आवृत्ती आहे. हा ब्रेड भरपूर बटर, अंडी, थोडी साखर आणि सुकामेवा घातलेला एक रिच ब्रेड आहे आणि चवीला अतिशय छान लागतो. 

आजमितीला जगात हजारो केक रेसिपीज प्रचलित आहेत आणि या मॉडर्न केकचं श्रेय युरोपला जातं. सतराव्या शतकात बेकिंगमध्ये सातत्यानं नवीन प्रयोग केले गेले आणि त्यातून पुढे जाऊन अनेक बेक केलेले पदार्थ उदयास आले. त्यावेळेस अंड्यातला पांढरा भाग आणि साखर/ मध याचं उकळलेलं मिश्रण केकवर आयसिंग म्हणून वापरले जायचे. साखरेसारखे तत्सम गोड पदार्थ प्रचंड महाग होते, त्यामुळे एकोणिसाव्या शतकापर्यंत केक हा चैनीचा पदार्थ होता.

केक फुलवण्यासाठी अनेक पर्याय वापरत असत; परंतु १८४३ मध्ये बेकिंग पावडरचा शोध लागला आणि केक अजून छान तयार करता येऊ लागला. बटर क्रीम आणि फ्रेश क्रीममधील सर्वांत जुनं आहे ते फ्रेश क्रीम. सन १९५०च्या आसपास बटर क्रीमचा वापर केक डेकोरेशनकरता सुरू झाला; पण त्याच्या कितीतरी आधी फ्रन्समध्ये सोळाव्या शतकापासून फ्रेश क्रीम निरनिराळ्या डेझर्टवर टॉपिंग म्हणून वापरत असत. त्यावेळेस त्याला ‘स्नो क्रीम’ असंही म्हटलं जायचं. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेलं शतकभर संपूर्ण जगाला गारुड घालणारा, लोकप्रिय ‘ब्लॅक फॉरेस्ट केक’ हा जर्मनीमधलं प्रसिद्ध घनदाट जंगल ‘ब्लॅक फॉरेस्टर’मध्ये मिळणाऱ्या आंबट मोरेलो चेरीज, व्हीप्ड क्रीम, चॉकलेट, चेरी लिकर आणि केक वापरून १९१३मध्ये जोसेफ केलर या शेफनं तयार केला. भारतात ब्रिटिशांमुळे केक आला आणि काही स्थानिक ख्रिस्ती बेकरींमध्ये ब्रेड, बिस्किटांसोबत केकदेखील विकायला सुरुवात झाली. ऐंशीच्या दशकात वाढदिवसाला केक विकत आणण्याची प्रथा सुरू झाली; पण तरीही त्यात अंडं असल्यानं केक तयार करणं किंवा खाणं हे फारसं प्रचलित नव्हते. नंतर बिना अंड्याचा फ्रूट किंवा चॉकलेट केक बाजारात मिळायला लागला. पाठोपाठ मोंजिनिस केक शॉप सर्वत्र सुरू झाली आणि तिथे खास लहान मुलांच्या वाढदिवसाकरता एगलेस बटरक्रीम केक मिळू लागले. नंतर व्हीप क्रीमचा ब्लॅक फॉरेस्ट केक बाजारात आला आणि लोक या केकच्या प्रेमात पडले. पाठोपाठ डच ट्रफल केक आणि इतर अनेक फ्लेवर्स बाजारात येऊ लागले. हळूहळू बटरक्रीम मागं पडलं आणि फ्रेश क्रीम केकची चलती होऊ लागली. नवनवीन फ्लेवर्स आणि कॉम्बिनेशनसोबत आकर्षक सजावट आणि नानाविध आकार यामुळे केक इंडस्ट्रीनं भारतात जम बसवला. आज अशाच एका व्हॅलेंटाईन डे स्पेशल केकची रेसिपी पाहूयात.

स्ट्रॉबेरी व्हॅलेंटाईन केक
साहित्य - दीड कप मैदा, पाऊण कप घट्ट दही, अर्धा कप तेल, एक चमचा बटर, पाऊण कप साखर, सव्वा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, दीड टीस्पून व्हॅनिला इसेन्स. 
क्रीमकरता : एक कप फ्रेश क्रीम, पाव कप स्ट्रॉबेरी क्रश, ८ ते १० ताज्या स्टॉबेरी काप करून; लाल, गुलाबी, हिरवा, पिवळा रंग. 

कृती -

  • १८० डिग्रीवर ओव्हन गरम करून घ्या. 
  • दह्यात बेकिंग सोडा आणि पावडर एकत्र करून मिक्स करा. त्यात साखर, तेल, बटर मिक्स करा. 
  • वरून मैदा चाळून थोडा थोडा टाका. वरून लाल रंग, व्हॅनिला इसेन्स टाकून मिक्स करा. 
  • केकचं मिश्रण केक टिनमध्ये ओतून ४५ मिनिटांकरता बेक करा आणि केक थंड करून घ्या. 
  • फ्रेश क्रीम ब्लेंडरनं फेसून घ्या. १ कप क्रीम बाजूला ठेवा. आणि उरलेल्या क्रीममध्ये हिरवा, पिवळा रंग घालून मिक्स करा. 
  • केकचे तीन भाग करून प्रत्येक भागावर हिरवे क्रीम, स्ट्रॉबेरी क्रश आणि तुकडे लावून घ्या. तिन्ही लेयर एकावर एक लावून सगळीकडे व्यवस्थित क्रीम लावून घ्या. फ्लॅट सुरीने क्रीम एकसमान करा.
  • उरलेल्या थोड्या पांढऱ्या क्रीममध्ये गुलाबी रंग घालून मिक्स करा. पायपिंग बॅग रोज नोझल घेऊन बॅगमध्ये लाल रंग लावून घ्या आणि त्यात गुलाबी क्रीम भरा. केकवर क्रीमनं सुरेख फुलं काढा आणि थोडी सजावट करा. 
  • हा केक दोन तास फ्रिजमध्ये थंड करत ठेवा आणि मग आवडत्या व्यक्तीला गिफ्ट करा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com