ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : मऊ, मुलायम चीजकेक

तेराव्या शतकाच्या अखेरीस लिहिलेल्या ब्रिटिश पुस्तकात चीजकेकची रेसिपी सापडते. अमेरिकेत न्यूयॉर्क चीजकेक अतिशय प्रसिद्ध आहे.
Cheesecake
CheesecakeSakal

चीजकेक म्हटले, की डोळ्यांसमोर मऊ मुलायम केक येतो. पु. ल. देशपांडे श्रीखंडाचे जसे वर्णन करतात, त्याप्रमाणे तर्जनीने उचलून जिभेवर चाटणाप्रमाणे लावावे आणि आस्वाद घ्यावा, तसाच चीजकेकदेखील ब्रह्मानंदी टाळी लावून आरामात खावा असा पदार्थ. पारंपरिक केकप्रमाणे स्टीफ केक नसून तोंडात विरघळणारा हा मनमोहक पदार्थ. चीजकेक तसा भारतात हल्लीच प्रचलित झाला आहे; परंतु त्याचा इतिहास मात्र फार जुना आहे.

असे म्हटले जाते, की ख्रिस्तपूर्व ७७६ वर्षांपूर्वी चीजकेकसदृश गोड पदार्थ पहिल्या ऑलिंपिकमध्ये ॲथलिट्सना दिला गेला असावा. ग्रीसमध्ये चीजकेक अतिशय प्रसिद्ध होता इतकेच नाही, तर नवरी मुलगी लग्नाला येणाऱ्या अतिथींना स्वतःच्या हस्ते हा केक तयार करून खायला घालत असे. रोमन आक्रमणानंतर ही खास पाककृती त्यांच्याही हातात पडली आणि नंतर रोमन लोकांनी संपूर्ण युरोपमध्ये त्याचा प्रसार केला. चीजकेकचे ‘प्लासेंटा’ हे सर्वांत जुने नाव ऐकायला विचित्र वाटेल; पण हा केक जवळपास आताच्या चीजकेकसारखाच असे. ज्यात त्यातील क्रस्ट निराळा बेक केला जाई आणि आतील भागात गोट चीज, अंडी आणि गव्हाचे पीठ वापरले जाई. बेक केल्यानंतर केकवर मध घातला जात असे, तर कधी चीज आणि मध दोन्ही वापरले जायचे. बरेचदा मोठ्या आकारात केक तयार करून नंतर त्याचे चौकोनी तुकडे बाजारात विकले जात. यावरून अडीच हजार वर्षांपूर्वीदेखील लोक गोड पदार्थ किती आवडीने तयार करत असत हे दिसून येते. यातूनच काही निराळे पदार्थ उदयास आले. जसे की तेरोपिता किंवा कासेरोपिता. फिलो पेस्ट्री म्हणजे वस्त्रगाळ कणकेच्या पातळ पोळ्या लाटून भरपूर बटर लावून त्यात चीज-अंड्याचे मिश्रण भरून लहानसे पाय तयार करणे. या पदार्थांची सुरुवात ग्रीक काळापासून झाली आणि आजही या पदार्थांच्या सुधारित आवृत्ती चलनात आहेत.

तेराव्या शतकाच्या अखेरीस लिहिलेल्या ब्रिटिश पुस्तकात चीजकेकची रेसिपी सापडते. अमेरिकेत न्यूयॉर्क चीजकेक अतिशय प्रसिद्ध आहे. सन १८७२ मध्ये विल्यम लॉरेन्स फ्रेंच चीज तयार करत असताना अचानक क्रीम चीजचा शोध लागला. त्याने ते बाजारात विकायला सुरुवात केली नि फिलाडेल्फिया चीज असे नामकरण केले, पुढे ही कंपनी क्राफ्टने विकत घेऊन फिलाडेल्फिया चीज या नावानेच विक्री सुरू ठेवली. १९२९ मध्ये अरनॉल्ड रूबेन या जर्मन ज्यू हॉटेलियरने कॉटेज चीजऐवजी क्रीम चीज, सोअर क्रीमसोबत चीजकेक तयार करून पाहिला आणि त्याची चव अल्पावधीतच लोकांना आवडली. नंतर पेस्ट्री क्रस्टऐवजी ग्राहम कुकीज बेस करता वापरली जाऊ लागली आणि त्याचसोबत सेट चीजकेकलासुद्धा प्रसिद्धी मिळाली.

जिलेटिन वापरून बेक न करतासुद्धा चीजकेक तयार करता येऊ लागला. हा झटपट तयार होणारा मऊ मुलायम केक अमेरिकन लोकांच्या भलताच पसंतीस उतरला.  गमतीचा भाग म्हणजे चीजकेक हा केक नव्हे. तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलो, तर चीजकेक म्हणजे खरं तर पाय डिश आहे ज्यात क्रस्ट निराळा असतो आणि आतील सारण निराळं. परंतु केव्हातरी त्याला पडलेलं हे नाव आपल्याला जास्त भावतं. सोबत चीजकेक सेव्हरीसुद्धा तयार केले जातात जसे, की प्रसिद्ध French Quiche- किश. आता जगभरात प्रत्येक देशात स्वतःचे काही खास चीजपासून तयार केलेले पदार्थ आहेत. जसे भारतात भापा दोई- ज्यात दही दूध आणि अटवलेले दूध वापरले जाते, तसेच रशियन चीजकेकमध्ये कॉटेज चीज म्हणजे पनीर वापरले जाते, एशियामध्ये उबे म्हणजे जांभळ्या रताळ्याचा चीजकेक गेली ४ वर्षे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सुफले स्टाईल जापनीज चीजकेकदेखील लोकांना आवडतोय. यात निरनिराळे फ्लेवर्स हा चीजकेकचा सर्वांत मोठा आकर्षणबिंदू. आंब्याच्या मोसमात आंबा फ्लेवरचा केक लोकांच्या विशेष आवडीचा आहे. चला तर, आज एक छान चीजकेकची रेसिपी पाहूयात.

चॉकलेट चीजकेक कप्स

साहित्य -

  • क्रस्टकरिता -  १४ ओरिओ कुकीज, ३ टेबलस्पून बटर वितळवलेले.

  • चीजकेककरिता - ५०० ग्राम क्रीम चीज, अर्धा कप साखर, १०० ग्राम कुकिंग चॉकलेट, २ अंडी, २ टीस्पून व्हॅनिला इसेन्स.

कृती - क्रस्टकरिता -

  • चीजकेक कप्स पॅनमध्ये बटर लावून घ्या.

  • त्यात बटरपेपर गोल आकारात कापून लावा म्हणजे केक चिकटणार नाहीत. 

  • मिक्सरमध्ये ओरिओ कुकीज आणि बटर टाकून बारीक करा. 

  • एकेक चमचा प्रत्येक कपकेक पॅनमध्ये टाकून दाबून सेट करून घ्या. 

चीजकेककरिता : 

  • कुकिंग चॉकलेट वितळवून घ्या. 

  • क्रीमचीज, साखर, व्हॅनिला इसेन्स, अंडी, वितळवलेले चॉकलेट एकत्र करून मुलायम होईपर्यंत हँडमिक्सरने फेटा.

  • हे तयार मिश्रण चमच्याने ओरिओ कुकीज लेयरवर भरा. 

  • १५० सेल्सिअसवर ओव्हनमध्ये २० ते २५ मिनिटे बेक करा.

  • केक तयार झाल्यावर थंड करून पॅन फ्रिजमध्ये २४ तास ठेवा. 

  • २४ तासांनंतर चीजकेक अलगद पॅनमधून बाहेर काढा आणि फ्रेश क्रीमने सजवून सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com