ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : गुणकारी जायफळ

मधुरा पेठे
Friday, 26 March 2021

आपल्याकडे जायफळ बऱ्याच गोड पदार्थात वापरले जाते. मुख्यतः बासुंदी, श्रीखंड, मसाले दूध, पुरणपोळी या पदार्थांत वेलचीसोबत जायफळसुद्धा हवेच. अनेक शाही पदार्थांतही जायफळाचा वापर केला जातो.

आपल्याकडे जायफळ बऱ्याच गोड पदार्थात वापरले जाते. मुख्यतः बासुंदी, श्रीखंड, मसाले दूध, पुरणपोळी या पदार्थांत वेलचीसोबत जायफळसुद्धा हवेच. अनेक शाही पदार्थांतही जायफळाचा वापर केला जातो. सुगंधी मसाले म्हणून बिर्याणी आणि मोगलाई पदार्थांत जायफळ नि जयपत्रीचा विशेष उपयोग असतो. मसाले आणि गोड पदार्थांसोबत पोटाच्या विकारांवर, त्वचेकरता देखील जायफळाचा वापर होतो. 

अशा या जायपत्री आणि जायफळाचा इतिहास मात्र अतिशय रक्तरंजित आणि आचंबित करणारा आहे. युरोप आणि जगातील इतर भागांत जायफळ प्राचीन काळापासून वापरले जात होते. परंतु त्याचे मूळ मात्र इंडोनेशियातील छोट्याशा बांडा बेटामध्ये आहे. अनेक शतके या बांडा बेटांवरील जायफळ नि जायपत्री भारतीय समुद्रीमार्गाने जगभरात पोचायची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अरबी व्यापाऱ्यांचा यावर पूर्ण ताबा असल्याने त्यांच्यामार्फत भारत आणि आशिया खंडातील मसाल्यांचा व्यापार चाले. जहाजांतून अनेक महिने प्रवास करून अनेक बंदरावर जकात देत देत युरोपात पोचेपर्यंत हे मसाले सोन्यापेक्षाही महाग होत असत. त्यामुळे त्यांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागे. बऱ्याच मसाल्यांचा वापर औषधाकरता करत असल्याने त्यांची किंमत गगनाला भिडे, त्यापैकी एक म्हणजे जायफळ. 

त्या काळात प्लेगने हैराण झालेल्या जनतेचा असा गैरसमज होता, की जायफळ गळ्यात घातल्याने प्लेगसारख्या संसर्गजन्य रोगांपासून सुरक्षितता मिळते. त्यामुळे त्याकाळी सुरेख नक्षीकाम केलेल्या पेंडंटमध्ये जायफळ ठेवून गळ्यात दागिन्याप्रमाणे वापरले जायचे. सोबत जायफळाचा वापर बटाटे, मांस आणि पेयांच्या पाककृतींमध्ये होत असे. अशा या सोन्यापेक्षा मौल्यवान आणि अतिशय उपयोगी मसाल्याच्या शोधात पंधराव्या शतकात पोर्तुगीज अनेक खटपटी करून बांडा बेटांवर पोचले. नंतर सोळाव्या शतकात डच लोकांनी या व्यवसायावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी जे जे शक्य होईल ते सर्व केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यापार या उद्देशाने गेलेले डच तेथील स्थानिकांवर अमानुष अत्याचार करू लागले. स्थानिकांची लोकसंख्या १५ हजारांवरून घटून निव्वळ १ हजारावर पोचली. उरलेल्याना गुलाम बनवून तिथे जायफळाच्या झाडांची भरपूर लागवड केली गेली. नंतर ब्रिटिश तिथे पोहोचले आणि काही काळ त्यांनी तिथे कब्जा केला. पुढे ब्रिटिशांनी या झाडांची लागवड त्यांच्या वसाहती असलेल्या देशांतही केली. जायफळ आणि लवंग या महत्त्वाच्या मसाले व्यापारावर वर्चस्व मिळवण्याकरता डच आणि ब्रिटिशांमध्ये द्वंद्व सुरू राहिले. परंतु, बांडा ते युरोप थेट व्यापारामुळे जायफळ, जायपत्रीची किंमत झपाट्याने कमी झाली आणि त्याचा पदार्थांमधील वापरही वाढला. कोलोनियल एरामध्ये अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील काही लबाड व्यापाऱ्यांनी लाकडाची हुबेहूब दिसणारी जायफळ तयार करून विकण्याचा उद्योग केला. जोपर्यंत जायफळ किसून बघत नाहीत, तोपर्यंत हे फसवे जायफळ ओळखणे कठीण व्हावे इतकी हुबेहूब असायची. अनेक लोक यात फसले आणि त्यावरून ‘वुडन नटमेग’ हा फसवणूक शब्दाकरता प्रतिशब्द झाला. 

जायफळ आणि इतर मसाले वापरून युरोपमध्ये अनेक अल्कोहोलिक पेये तयार केली जात. त्यातील मसाले घातलेली म्यूल वाईन प्रसिद्ध होती. बटाटे, मांस आणि चीज वापरून केलेल्या पाककृतीमध्ये जायफळ हमखास वापरले जायचे. फ्रेंच पाकशास्त्रात सर्वांत महत्त्वाचा ज्याला ‘मदर ऑफ सॉस’ म्हटले जाते, त्या ‘बॅचमेल सॉस’मध्ये (व्हाईट सॉस) जायफळ हा महत्त्वाचा घटक आहे. भारतात गोड पदार्थांत जिथे गूळ वापरला जातो, तिथे हमखास जायफळ घातले जाते. जायफळ वेलची ही सुवासिक मसाल्यांची जोडी गोड पदार्थाची चव वाढवते. आज या लेखाच्या निमित्ताने नारळ आणि जायफळ एकत्रित वापरून स्वादिष्ट आणि मुलायम पुडिंग पाहूयात.

कोकोनट नटमेग पुडिंग
साहित्य -
अर्धा लिटर नारळाचं घट्ट दूध, ३०० मिली अमूल क्रीम, अर्धा कप दूध, अर्धा कप साखर, १ टीस्पून कॉर्नफ्लोअर, १ टेबलस्पून व्हॅनिला फ्लेवर चायनाग्रास किंवा अर्धी पट्टी आगर आगर गरम पाण्यात भिजवून, अर्धा टीस्पून जायफळ पावडर. 
सजावटीसाठी : अर्धा टीस्पून कोको पावडर,चिमूटभर जायफळ पावडर.

कृती -

  • नारळाचे दूध, अमूल क्रीम, साखर एकत्र करून मंद आचेवर गरम करत ठेवा, चमच्याने ढवळा.
  • अर्धा कप दुधात कॉर्नफ्लोअर मिक्स करून घ्या. दूध गरम झाल्यावर त्यात कॉर्नफ्लोअर मिक्स केलेले दूध, जायफळ पावडर आणि चायनाग्रास / आगर आगर मिक्स करा. 
  • सर्व मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत ढवळत रहा.  
  • घट्ट होत आले की लगेच गॅस बंद करून जाड गाळण्याने गाळून घ्या आणि काचेच्या भांड्यात सेट करायला ठेवा. फ्रीज मध्ये किमान ४ तास थंड करा. 
  • सेट झालेले पुडिंग डिशमध्ये काढून त्यावर कोको पावडर आणि जायफळ पावडर डस्ट करा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhura Pethe Writes about Curative nutmeg