
सध्या सोशल मीडियामुळे कित्येक नवीन चेहरे ओळखीचे होतात. इन्बॉक्समध्ये नंबर दिले, घेतले जातात.
- मीनल ठिपसे
शब्दांपेक्षा सोबतीतच
सामर्थ्य जास्त असते
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते !!!
सध्या सोशल मीडियामुळे कित्येक नवीन चेहरे ओळखीचे होतात. इन्बॉक्समध्ये नंबर दिले, घेतले जातात. फोटोमधूनच माणसाविषयीचे आपल्याला हवे तसे अंदाज बांधले जातात... चार-पाच वेळा भेटीगाठी होतात... यार दोस्त होतात!...खचाखच फोटो काढले जातात आणि काही दिवसांनी परत याचा चेहरासुद्धा बघणार नाही, इतकी चिडचिड एखाद्याबद्दल मनात बसते. ती अढी मनातून काही केल्या जात नाही!
अर्थात प्रत्येक नात्यात त्या नात्याची अशी एक उकल असतेच, मग ती सोशल मीडियावरून झालेली ओळख असो किंवा अगदी लहानपणापासुन चे जिवाभावाचे मित्रमैत्रिणी असो!...आपल्याला हवं तसं पुढचं माणूस वागलं नाही, की नाती हळूहळू दुरावायला लागतात. काही ती गोष्ट हलकेच विसरून पुनःपुन्हा दुसऱ्याला संधी देत राहतात, की चला मला हवं तसं आणि मला हवं तेच पुढचा नेहमीच कसा वागेल?... मग नकळत पुढचाही दोन पावलं पुढे येतो. नात्याची मुळं रुजवायचा प्रयत्न दोन्हीकडून होतो. माणूस म्हणून एकमेकांना आहे तसे स्वीकारले जाते. त्याला काय आवडणार नाही आणि काय आवडेल याचा विचार समंजसपणे दोन्हीकडून व्हायला लागतो. एकमेकांच्या गुणांची वाहवा होते आणि दुर्गुण आणि चुका एकांतात आणि कमीत कमी भावना दुखावल्या जातील अश्या मोकळेपणाने सांगितल्या जातात, खेळीमेळीत घेतल्या जातात. हक्काचं कुणीतरी आपल्यासाठी आहे, या भावनेमुळे सारी मरगळ दूर होते आणि प्रत्येक सुख-दुःखाला सामोरं जायचं एक विलक्षण बळ आपल्यात येतं...
तसं पाहायला गेलं, तर आयुष्य परफेक्ट असं कुणाच्याच वाट्याला येत नाही. प्रत्येकाची स्वप्नं वेगळी, वाटा वेगळ्या, आव्हानं वेगळी. त्यामुळे चुका होणारच; पण तुम्ही चुकलात म्हणून सोडून जाणारे हात नक्कीच तुमचे कधीच नव्हते! प्रसिद्धी, पैसा, रंग, रूप पाहून जुळवाजुळव केलेली नाती कधीच टिकत नाहीत. तुम्ही रडताना, ओरडताना, दुःखी असताना...तुम्ही अगदी आहात तसे आणि अगदी तसेच पाहिलेले... आणि तरीही तुमची साथ कायम देणारे ते तुमचे खरे सवंगडी!
लहानपणीची मैत्री बरेचदा निखळ असते. एकमेकांकडून फारशा अपेक्षा नसतात, अलगद एकमेकींची साथ दिली जाते. निरपेक्ष भावनेनं एकमेकांचा हात धरला जातो. त्या खेळण्यात, बागडण्यात नुसता आनंद असतो. ना वेळेचं बंधन असतं, ना आयुष्याची चिंता.
सध्या तर आयुष्य इतकं क्षणभंगुर झालंय, तरीही मनातला आकस जात नाही. दुसऱ्याबद्दल वाटणारी असूया संपत नाही. दुसऱ्याला माफ करण्याची मनाची तयारी होत नाही. अशा वेळी मायेची फुंकर घालणारी, प्राजक्तासारखी अबोल साथ देणारी ती खरी मैत्री!
काही घरंच मैत्रीपूरक असतात. यांच्याकडे नेहमीच मित्रमंडळींची ये-जा असते. मस्त गप्पांचे फड जमतात. फार आखीवरेखीव नसतात ही घरं; पण एक वेगळीच मायेची उब असते. या घरात तुम्ही अगदी कधीही जाऊ शकता; वेळ काळ न बघता. मनातल्या गोष्टी बोलत राहता येतात. चहाचे तर कित्येक कप रिते होतात. या लोकांच्या जाणीवा सजग असतात. आपुलकीची एक वेगळीच किनार असते या घरांना!
खरं तर सर्व नात्यांमधील मैत्री हेच नातं आपण स्वतः निवडलेलं असतं. आपल्याला समजून घेणारं कुणीतरी, ज्याच्याशी सगळं बोलता येईल, एक असं मैत्र ज्यात कुठेही दांभिकता नसेल, काही चांगलं केलं तर मनापासून कौतुक होईल, चुकलं तर हक्कानं कानउघाडणी होईल, दुखलंखुपलं तर मायेची फुंकर मारली जाईल... आपल्यापेक्षा वेगळं असं...पण तरीही आपल्यासारखंच!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.