घरकुल अपुले : बहरू दे संवादकौशल्य! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Communication Skills

तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी- कारण खोडरबर कोणत्याच जिभेवर चालत नाही!! सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वापरण्यात येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाषण!

घरकुल अपुले : बहरू दे संवादकौशल्य!

- मीनल ठिपसे

तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी- कारण खोडरबर कोणत्याच जिभेवर चालत नाही!! सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वापरण्यात येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाषण! घरात तर याच महत्त्व आहेच; पण इतर नातीगोती, मित्र परिवार, कामाच्या ठिकाणीही याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संभाषणकौशल्य संवादकौशल्य व्हायला हवं... ती एक कला आहे आणि ही कला घरातील संवाद आणि कार्यालयीन संवाद इथं वापरता यायला हवी!

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. कुणी एकांतप्रिय असला, तरी सदैव तसा राहू शकत नाही. कुणाशी तरी बोलावं, आपले विचार सांगावेत, ही आंतरिक गरज प्रत्येक मानवी जीवामध्ये असते. तान्हं मूलसुद्धा याला अपवाद नाही. सुरुवातीला भाषिक संवाद नसतोच. ऐकलेले शब्द व हुंकार या संवादातून मूल शब्द उच्चारायला शिकतं.

खरं तर संवादाच्या व्याख्येमध्ये देहबोली आणि बोललेली भाषा यांच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण असं सम्मिलीत असतं. असं म्हणतात, की ‘बोलणाऱ्याचे दगडसुद्धा विकले जातात; पण न बोलणाऱ्याचे चणे विकले जात नाहीत’ म्हणूनच आजच्या या स्पर्धेच्या युगात उत्तम दर्जाचं संवादकौशल्य असणं अगदी आवश्यक आहे.

घरामध्ये पालक-मूल, नवरा-बायको, सासू-सून, आजी-आजोबा व नातवंडं या नात्यांमध्येही संवाद अतिशय महत्त्वाचा. सुसंवाद असेल, तर अगदी गहन विषयही बोलून चर्चा करून सोपा होऊ शकतो आणि विसंवाद असेल तर सोपी गोष्टही क्लिष्ट आणि गुंतागुंतीची होऊ शकते. वरवर पाहता जे मनात आहे आणि जे बोलायचं आहे ते बोलणं किती सोपं वाटतं; पण बोलण्याची वेळ, आवाजातील चढ-उतार, काय बोलतो यापेक्षा कसं बोलतो याचं समीकरण चुकलं, की नात्यात दुरावा येऊ शकतो, गैरसमज होतात.. मनात कायमची कटुता निर्माण होऊ शकते. काही वेळा मौनदेखील संवादाचा एक महत्त्वाचा भाग असतो.

मग संवादकौशल्य विकसित कसं करावं?... काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवता येतील :

भाषिक संवाद सात टक्के, आवाजातील चढ-उतार व बोलण्याची लय अडतीस टक्के आणि देहबोली, हावभाव याला पंचावन्न टक्के महत्त्व असतं.

इंग्रजी बोलता येणं म्हणजे उत्तम संवादकौशल्य नव्हे. अनेक भाषांवर प्रभुत्व हे केव्हाही चांगलंच; पण संवादकौशल्य ही एक कला आहे आणि इंग्रजी ही एक भाषा. संवादकौशल्य ही कला आपण सरावानं, अनुभवानं आणि उत्तम निरीक्षणशक्तीनं विकसित करू शकतो.

नवनवीन मुद्दे उत्तमरीत्या मांडून संवाद प्रवाही कसा ठेवता येईल, याकडे कल असावा. चौफेर वाचन आणि निरनिराळ्या क्षेत्रांतील माहिती असल्यास उत्तम संवाद साधणं सोपं जातं.

प्रत्येक नात्याची एक किमया असते- जी त्या नात्याला इतर नात्यांपेक्षा वेगळी बनवते. ज्या प्रकारचं नातं त्या प्रकारचा संवाद साधता आला पाहिजे. कोणतंही नातं दीर्घकाळ टिकवायचं असेल, तर त्या नात्याचा असा सुसंवाद हवा. नात्यातील संवाद म्हणजे सहृदयता! जो भी है बस दिल से!! आयुष्य भरभरून जगायचं असेल, तर नात्यातील संवाद जपता आला पाहिजे. त्याला खतपाणी घालून फुलवता आलं पाहिजे.

उत्तम वक्ता हा सर्वप्रथम उत्तम श्रोता असतो, या न्यायाने पहिल्यांदा आपली श्रवणक्षमता विकसित करावी. समोरील व्यक्तीचं बोलणं आधी संपूर्णपणे आणि लक्षपूर्वक ऐकावं आणि त्यानंतरच जरूर ती प्रतिक्रिया द्यावी.

म्हणी, वाक्यप्रचार, शब्दकोटी, प्रासंगिक काव्य, चारोळ्या, कोपरखळ्या यांचा प्रसंगानुरूप संभाषणादरम्यान कौशल्यानं आणि चपखलपणे वापर करावा.

जास्त ऐकावं आणि नेमकं, मार्मिक बोलावं. शब्द अर्थपूर्ण असावेत. शब्दांमध्ये प्रभाव हवा; अहंभाव नाही.

मुद्देसूद, अभ्यासनिहाय, आत्मविश्वासानं आणि संयमानं बोलणं शिकलं पाहिजे. उत्तम संवाद असेल तर माणूस भावनिकरित्या जोडला जातो.

संवादकौशल्य जन्मजात नसतं... आनुवंशिकरीत्याही मिळत नाही. त्यासाठी घरचं पोषक वातावरण, शिक्षकांचं मार्गदर्शन, वाचन, आत्मभान, आत्मविश्वास, सहसंवेदना या घटकांचं योगदान असतं!

Web Title: Minal Thipase Writes Communication Skills

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top