
कोरोनाचं सावट थोडंसं दूर झालंय आणि हळूहळू जीवनाची विस्कटलेली घडी पुन्हा नेटकी बसविण्याचा प्रयत्न चालू आहे.
घरकुल अपुले : पौष्टिक ‘लंचबॉक्स’
- मीनल ठिपसे
कोरोनाचं सावट थोडंसं दूर झालंय आणि हळूहळू जीवनाची विस्कटलेली घडी पुन्हा नेटकी बसविण्याचा प्रयत्न चालू आहे. मामाच्या गावाला जायचा प्लॅन यावर्षी यशस्वी झालाय, बऱ्याच अंशी पूर्वीसारखी उन्हाळ्याची सुट्टीत धमाल करून बच्चे कंपनी शाळा या विषयाकडे वळली आहे. नवीन पुस्तकं, वह्या, त्यांना कव्हर्स घालणं, गणवेश, नवीन बूट, सॉक्स याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डबा!
आम्हाला लहानपणी डब्याचे एवढे प्रकार असतात, त्यातसुद्धा म्हणे ग्लॅमर असतं याची पुसटशीही कल्पना नव्हती. रोज आपलं दोन घडीच्या पोळ्या आणि फळभाजी किंवा उसळ. घरी आलं, की एखादा कोरडा खाऊ आणि रात्री अगदी सगळा स्वयंपाक असायचा. गरम, अगदी तव्यावरची पोळी, तूप, एखादी भाजी, ताजा नारळ घातलेली आमटी, कोशिंबीर, ताक, भात! अगदी सगळं शिस्तीत. रात्री भात खाऊ नये, ताक पिऊ नये वगैरे संकल्पनाच मुळात माहीत नव्हत्या; पण एक होतं, वर्गात काही मैत्रिणी मात्र वेगवेगळं आणायच्या काहीतरी डब्यात. थालीपीठ, डोसा, भेळ, इडली सांबार असं काहीतरी. भारी वाटायचं खूप; मग आईच्या मागे भुणभुण, की ‘असं काहीतरी वेगळं देत जा ना डब्यात.’ रोज वेगळं काहीतरी आणणाऱ्या मुलींचा वेगळाच तोरा असायचा किंवा निदान मला तरी तसं वाटायचं; पण हे आईसाहेबांच्या गळी उतरवणं काही जमलंच नाही. आता मुलांचे डबे करणे म्हणजे आई या व्यक्तीसमोरचा सर्वांत गहन प्रश्न असतो.
बरं आता पूर्वीसारखं एक डबा दिला, की झालं काम असं नसतं. एक खाऊचा डबा, एक जेवणाचा डबा. एक तर डब्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत; पण त्यातल्या त्यात गरम पदार्थांसाठी तरी स्टीलचे डबे असावेत, असा आग्रह धरला जातो. त्यात पुन्हा मुलांना हे डबे आवडले पाहिजेत. सोन्याच्या खरेदीला कमी वेळ लागेल, एवढा वेळ पोरं त्या डब्याचा रंग-रूप-पोत वगैरे बघत असतात... आणि डबा ही ‘गुंतवणूक’च असते, निदान वर्षभरासाठीची तरी!
आमच्या वर्गात एक मुलगी भाकरी आणि कांदा-लसूण चटणी आणि त्यावर तेल असा डबा आणायची कधी कधी. खरं सांगते त्यासारखा कोणताही पदार्थ अजून आवडला नाही. साधंसं आयुष्य! कुणाच्याही भाजीशी पोळी लावून खायचो, डबा विसरला तरी कधी उपाशी रहायची वेळ आली नाही. मुलांना पदार्थ आवडावेत आणि ते तब्येतीसही उत्तम असावेत या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यात हल्ली डॉक्टर वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देत असतात. मग मुलांच्या वाढीसाठी, बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी, मानसिक आरोग्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा डबा या संकल्पनेत समावेश असावा या गोष्टी समजतात.
अर्थात प्रोसेस्ड फूडचा वापर कोणालाच उपयोगी नाही, तरी पोरांना पोळी-भाजीव्यतिरिक्त कप केक, पॅनकेक, डोनट वगैरेच हवं असतं. मग पोषणमूल्यं, तब्येतीस उत्तम आणि मुलांना आवडेल असा डबा बनवणं हे अतिकौशल्याचं काम होऊन बसतं. नोकरी करणाऱ्या स्त्रियांची तर वेळेचं गणित आणि डबा हे समीकरण म्हणजे प्रचंड ओढाताण. तरीही पोरं इतका वेळ शाळेत असतात, त्यांच्या वाढीच्या वयात त्यांना उत्तम तेच मिळावं याकडे प्रत्येक आईचा कटाक्ष असतो!
मी तर डब्याचं असं वेगळं वेळापत्रकच करून ठेवते. दर आठवड्याचं वेळापत्रक तयार असलं, की त्याप्रमाणे वाणसामान, भाजी, फळं याची तयार करून ठेवता येते. सहसा डब्यासाठी पोळ्या करताना त्याला तुपापेक्षा तेलाचा हात लावावा. आणि डब्यासाठीच्या भाज्यांसाठी कांदा व ओले खोबरे याचा वापर कमी करावा.
वेगवेगळ्या प्रकारचे पराठे हा डब्यासाठी उत्तम पर्याय. मेथी, पालक, पनीर, बटाटा, कोबी, मुळा यांचे पराठे मुलांनाही आवडतात आणि भाज्याही पोटात जातात. मुलांना आवडत असेल, तर चीज पोळीही देऊ शकता. छोट्या सुटीसाठी शिरा, आंबोळी, कडधान्य भेळ, भाज्या घालून धिरडी, घारगे, शेवयांचा उपमा, सांजा, थालीपीठ, बीटरूट कटलेट, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, तिखट मिठाच्या पुऱ्या, इडली, डोसे देता येतात. वेगवेगळे, विविधरंगी पदार्थ करून बघणं गरजेचं आहे. जेणेकरून पदार्थामध्ये विविधता राहील, मुलांना काय आवडतं याचा अंदाज येईल. ताजी फळं हा उत्तम पर्याय आहे; पण त्याच्या फोडी केल्यास त्यातील सत्त्व तर कमी होतंच आणि फोडी काळ्याही पडतात. त्यामुळे एक तर छोटी अख्खी फळं द्यावीत किंवा मग ड्रायफ्रूट्स द्यावीत.
मुलांना सहसा पौष्टिक गोष्टींपेक्षा कुरकुरीत, तेलकट पदार्थ आवडतात. वेफर्स, कुरकुरे यांसारखे पदार्थ देण्यापेक्षा खाकरा, सॅलड घालून खाकरा चाट, ज्वारी किंवा तांदळाच्या पापड्या किंवा छोट्या कुरड्या देता येतात. चुरमुरे, साळीच्या लाह्या, मखाणे, पातळ पोहे यामध्ये दाणे, खोबरे, कडीपत्ता आणि कमी तेलाचा वापर करून घरगुती चिवडा तयार ठेवावा. पंधरा दिवसांतून एकदा मात्र मुलांना खूप आवडतात असे पास्ता, गूळपोळी, पुरणपोळी, सँडविच, पुलाव, पॅनकेक असे प्रकार देता येतील. उन्हाळ्यात कोकम किंवा लिंबाचं सरबत वेगळ्या बाटलीत द्यावं. डब्याची झाकणं व्यवस्थित असावीत. सांबार, आमटी, सरसरीत उसळी डब्यात देणं टाळावं.
Web Title: Minal Thipase Writes Nutritious Lunchbox
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..