घरकुल अपुले : कानमंत्र पालकत्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parenting

व्यक्ती कोणतीही असो तुम्ही त्याच्याशी प्रेमाने, आदराने बोललात, तर त्या व्यक्तीला नक्कीच आनंद होतो. मुलांची चूक झाली तर शक्य तेवढे समजून सांगण्याचा प्रयत्न करा.

घरकुल अपुले : कानमंत्र पालकत्वाचे

- मीनल ठिपसे

व्यक्ती कोणतीही असो तुम्ही त्याच्याशी प्रेमाने, आदराने बोललात, तर त्या व्यक्तीला नक्कीच आनंद होतो. मुलांची चूक झाली तर शक्य तेवढे समजून सांगण्याचा प्रयत्न करा. अर्थात काही प्रसंगी थोडे कठोर होऊन समज देण्याचीही गरज असतेच. त्यांना जाणीव करून द्या, की तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे. काही वेळा मुलांना तुमची खूप जास्त गरज असते. मायेचा स्पर्श आणि प्रेमळ बोल यांची गरज असते. अशा वेळी त्यांना दूर करू नका. नाहीतर त्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते.

काहीवेळा नकळत एक विरोधाभास अजूनही काही ठिकाणी दिसून येतो तो म्हणजे मुलांना शिस्त लावण्यावर जास्त भर दिला जात नाही; पण मुलींना मात्र उठता बसता नियमावली सांगितली जाते. मुलगा आणि मुलगी फरक न करता दोघांनाही शिस्त लावली पाहिजे. चांगली व्यक्ती म्हणून जगण्याची, माणुसकी जपण्याची शिकवण दिली पाहिजे. मुलींप्रमाणे मुलांनाही स्वयंपाकघरात मदत करण्यासाठी किंवा वेळप्रसंगी अडणार नाही यासाठी तयार करा. आपल्या मुलांनी आत्मनिर्भर व्हायला हवे असेल, तर स्वतःची कामे स्वतः केली पाहिजेत, ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबवा. या काळातील अतिशय मौल्यवान आणि महत्त्वाची शिकवण म्हणजे मुलांना स्त्रीचा आदर करायला शिकवणे. याचबरोबर मुलांना संवेदनशील राहायला सांगा आणि वेळीच त्यांना आपलं मन हलकं करण्याची शिकवण द्या.

प्रत्येक मूल वेगळं असतं. एक वेगळं व्यक्तिमत्त्व घडत असतं! त्यामुळे सतत दुसऱ्या मुलांशी तुलना करणे टाळा. मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव द्या. स्पर्धायुगामध्ये टिकून राहण्यासाठी कष्ट करणं उत्तमच; पण या सगळ्यात ते स्वतःचं अस्तित्व विसरणार नाहीत, याची काळजी घ्या. हल्ली अनेक क्षेत्रं उपलब्ध आहेत आणि त्यात भरपूर वावही आहे. मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहा; पण त्यांना त्यांचं आयुष्य घडवण्याचं स्वातंत्र्यही द्या. बरेच वेळा मुलं पालकांचं अनुकरण करत असतात, तेव्हा एक आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करा.

आजकालच्या मुलांना गॅजेट्स, व्हिडिओ गेम्स, मोबाईल यांचं जवळजवळ व्यसनच लागलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा मुलं इतकी हट्टी होतात, की त्यांना सांभाळणं पालकांसाठी अवघड होऊन बसतं! मुलांना चांगला वागणं शिकविण्यासाठी काही नियम ठरवणं गरजेचं असतं. नियमाची यादी बनवा आणि ते भिंतीवर लावा. पालकत्वातील सकारात्मता अनुभवायची असेल, तर मुलांकडून अशक्य अपेक्षा न ठेवता आधी त्यांना ती जशी आहेत तसे स्वीकारा आणि मग चांगले घडवण्याकडे कल असू द्या.

अनेकदा आपल्या कामावरचा किंवा इतर गोष्टींचा राग आपण मुलांवर काढतो. मग चिडचिड होते. यासाठी तुम्हाला शांत आणि संयमी राहणं गरजेचं आहे. मुलं मोठी होताना अनेक लोकांना भेटत असतात. प्रत्येकाच्या चांगल्या वाईट वागण्याचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. काही गोष्टींत तुम्हाला तुमच्या मुलांचं वागणं पटणार नाही, तेव्हा टोकाची भूमिका न घेता मुलांना समजून घ्या. चुकीची जाणीव योग्य शब्दात आणि योग्य पद्धतीने करून द्या. पालकांचं परस्पर वागणं सकारात्मक, आदरयुक्त आणि आनंददायी असलं पाहिजे, तरच मुलं आनंददायी बालपण जगू शकतील.

मुलांना गोष्टी शेअर करण्याची सवय लावणं अत्यंत गरजेचं आहे. ही सवय मुलांनी आत्मसात केली, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात त्याचा चांगला बदल नक्कीच होतो. तुमच्या मुलांना सकारात्मक पद्धतीनं आव्हानांचा सामना करायला शिकवा. मुलांना कडक नियंत्रणात ठेवण्याऐवजी त्यांचा मित्र, मार्गदर्शक बनण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Minal Thipase Writes Parenting Advice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Womens Cornerparenting