esakal | पूना गेस्ट हाऊस - माझं माहेरघर 
sakal

बोलून बातमी शोधा

Sulochana

मी नव्वदीच्या उंबरठ्यावर उभी, तर पूना गेस्ट हाऊस पंच्याऐंशी वर्षांचं. म्हणजे वयाच्या भावनेच्या हिशेबापेक्षा वेगळं नातं मी यांच्याशी जोडलेलं आहे. माझ्या आठवणींचा गोफही घट्ट विणलेला आहे. 

पूना गेस्ट हाऊस - माझं माहेरघर 

sakal_logo
By
सुलोचना, ज्येष्ठ अभिनेत्री

पुण्याच्या लक्ष्मी रोडवरचं पूना गेस्ट हाऊस आणि सरपोतदार परिवार यांच्याशी अनेक पिढ्यांच्या कलावंतांचं रसिकांचं खवय्याचं नातं आहे. मी त्याच गोतावळ्यातली एक. मी नव्वदीच्या उंबरठ्यावर उभी, तर पूना गेस्ट हाऊस पंच्याऐंशी वर्षांचं. म्हणजे वयाच्या भावनेच्या हिशेबापेक्षा वेगळं नातं मी यांच्याशी जोडलेलं आहे. माझ्या आठवणींचा गोफही घट्ट विणलेला आहे. 

मी पहिल्यांदाच कोल्हापूर सोडलेलं. पुणं माझ्यासाठी नवखं. ‘जिवाचा सखा’साठी १९४८मध्ये पहिल्यांदाच पुण्यात आले, ते थेट पूना गेस्ट हाऊसच्या मायेच्या घरात उतरले आणि कायमची जोडले गेले. सरस्वतीबाई सरपोतदार, मी त्यांना वहिनी म्हणत असे, त्यांच्या करारी, कर्तबगार आणि अतिशय प्रेमळ अशा व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. गेस्ट हाऊसमध्ये येणारी माणसं म्हणजे त्यांचा जणू परिवार. सर्वांना प्रेमानं, मायेनं वागवणाऱ्या वहिनींचा माझ्यावर विशेष लोभ होता. मी आले की, त्यांची कॉट माझ्यासाठी असे आणि स्वतः मात्र खाली पथारी टाकून निजत! आज असं प्रेम कोण करणार? चारू माझ्या वयाचा. वहिनींच्या संस्कारात वाढलेला. शूटिंगवरून दमलेल्या कलावंतांची काळजी घेणारं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणारं हे कुटुंब म्हणजे कलावंतांचं माहेरच! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निराधार, एकाकी, निष्कांचन कलावंतासाठी चारू भक्कम उभा असे. जुने संगीत रंगभूमीचे गायक नट श्रीपाद जोशी, मधू आपटे यांनी पूना गेस्ट हाऊसमध्ये अखेरचा श्‍वास घेतला, तो चारूच्या सहृदयतेमुळंच. नाटक संपल्यावर डॉक्‍टर काशिनाथ घाणेकरांना दही-भात लागत असे. तो तत्परतेनं चारूच देत असे. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. आज त्यांची पुढची पिढीदेखील पूना गेस्ट हाऊसची मायेची, प्रेमाची परंपरा राखून आहे, याचं कौतुक वाटतं. अभय शर्मिला, किशोर, साधना आणि सनत ही पिढी माझ्या नव्वदीच्या समारंभाचा घाट घालत आहेत. माझी साठी, पंच्याहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन याचे सोहाळे या कुटुंबांनी ज्या प्रेमानं केले, ते कधी विसरू शकत नाही. परंतु, आज चारू नाही ही सल मनात आहे. त्याच्या नातीच्या लग्नाला २०१७च्या डिसेंबरात आले होते. त्यानंतर चारू गेला, मात्र त्याचा वावर माझ्या भोवती नेहमी राहील. अभय, किशोर, माझी कांचन ही भावंडं आहेत. ती तशीच प्रेमानं नांदतील. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वहिनींसारखी व्यक्ती पुन्हा भेटणार नाही. ‘मोलकरीण’ चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारताना मी त्यांनाच समोर ठेवलं होतं. त्या व्यक्तिरेखेनं सर्वांचं मन जिंकलं होतं. माझ्यासारखी कलावंत दुसरं काय करू शकते! आजही माझं माहेर मला बोलावतंय, यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं? 

loading image