esakal | ‘पॉवर’ पॉइंट : चांगुलपणाचा अट्टाहास नको!
sakal

बोलून बातमी शोधा

power point

‘पॉवर’ पॉइंट : चांगुलपणाचा अट्टाहास नको!

sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

‘‘फार चांगुलपणा दाखवायला जाऊ नकोस. दुसऱ्यांना काही फरक पडत नाही, आपल्याला मात्र आयुष्यभर तसंच राहावं लागतं,’’ हे जिच्या तोंडून ऐकलं, ती स्वत: एकेकाळी मला चांगुलपणाची देवता वाटायची. हिला बहुदा चिडताच येत नाही असं मला नेहमी वाटायचं. म्हणजे जिथे गरज तिथे योग्य भूमिकाही घ्यायची ती- नाही असं नाही; पण तेही शांत स्वरात. तिचं सांगणं, तिचं बोलणं, समजावणं मुळात कुणाला राग येईल असं नव्हतंच.

मग अचानक वयाच्या या टप्प्यावर ती कोरडी का झाली होती? फार चांगुलपणा दाखवून फायदा नाही, असं तिला का वाटू लागलं होतं? एकदा निवांत तिच्याशी बोलल्यावर सतत समजुतीची भूमिका घेतलेल्या तिची दुसरी बाजूही समोर आली..

लहानपणापासून तिची जडणघडण समजूतदार मुलगी म्हणूनच झाल्यावर एक काहीसा अनाहूत ताण तिच्या मेंदूनं स्वीकारला होता. विचार नेमके कशामुळे तयार होतात? त्या विचारांच्या मागे काय प्रवास असतो? याचा माझा काही अभ्यास नाहीये; पण तटस्थ होऊन तिचं म्हणणं ऐकताना वाटलं, व्यवस्थित राहण्याचं, समजून घेण्याचं, आदबीनं जगण्याचं एक प्रेशर तिच्या डोक्यातल्या कुठल्यातरी खोलीत दडून बसलंय.

पिढ्यान्‌पिढ्यांच्या चालीरिती पाळायच्या नव्हत्या, तेव्हा ती फक्त ‘बाजूला’ बसायची. लग्नानंतर पाहुण्यांच्या सोहळ्यात मन रमायचं नाही, तेव्हा ती उत्तम चित्रं काढायला लागायची. तिची चित्रकला पाहण्यासाठी भोवती चिमुकले जमले, की ‘‘बरं झालं मुलं रमलीयेत,’’ म्हणत मग प्रौढ त्या खोलीत फिरकायचेही नाहीत. तिचीही सुटका व्हायची.

म्हणजे घटना छोट्या, सहज होत्या. त्या अदबीनं सांभाळण्यासाठी ‘नाहीला नाही’ म्हणण्याचं धाडसं तिचं तिनंच संपवलं होतं. नेहमीच सावरून नाही घेऊ शकणार अशा क्षणी ती थेट बोलायची; पण मेंदूला लावलेली समजूतदारपणाची सवय तिला मवाळपणे भूमिका मांडायला भाग पाडायची. अखेरीस कधीतरी या चांगुलपणाचं ओझं तिच्या डोक्यातल्या खोलीतून बाहेर पडणारच होतं.

हळूहळू तिचं तिला जाणवू लागलं, की उपजत माझा स्वभाव इतका मनमिळाऊ नाहीच मुळी. चारचौघांत दोनदोनदा विचार न करता ठाम भूमिका घ्यायला मला आवडतं. तिच्या डोक्यात सुरू झालेलं हे द्वंद मग ‘चांगुलपणा दाखवून काही उपयोग नसतो’ अशा वाक्यांनी पुढच्या पिढीपर्यंत जात होतं; पण ते फक्त लक्षण होतं. खरं दुखणं तिचा मूळ स्वभाव तिचा तिनंच खोल खोल आत बंद करून टाकणं होतं.

सांगायचा मुद्दा, प्रत्येकवेळी चांगलं राहण्याचं प्रेशर कधी ना कधी आपल्यातल्या प्रत्येक मैत्रिणीला आलं असेल. ‘‘एखादवेळी बोलले तरी कायमस्वरूपी माझ्याबाबतीत ग्रह करून घेतील,’’ या विचारांनी तिची घालमेलही होत असेल; पण असं मनात साचवून ठेवत, चांगुलपणाची व्याख्याच स्वत:साठी बदलवू नका.

पटलं नाही तर थेट बोला. जवळचे असो वा लांबचे, नातेवाईकांच्या गर्दीत रमायला नाही आवडत, तर थेट सांगा. सगळ्याच चालीरिती पटवून घेतल्या, म्हणजेच मी ‘समजूतदार’ ठरेन, हा अट्टाहास सोडा.

कसंय ना, व्यक्त होण्यातून झालेली बोच नंतर संवादानं दूरही करता येते; पण मनातल्या मनात कुढत बसल्यानंतरची बोच एकतर फक्त स्वत:लाच जाणवते आणि ती सहन करण्यावाचून काही पर्यायही नसतो. अशी ‘समाजमान्य सुसंस्कृत’ बनवण्याची धडपड जितक्या लवकर थांबवाल तितकं चांगलं.

loading image
go to top