esakal | ‘पॉवर’ पॉइंट : गोष्ट आरंभाची...
sakal

बोलून बातमी शोधा

‘पॉवर’ पॉइंट : गोष्ट आरंभाची...

‘पॉवर’ पॉइंट : गोष्ट आरंभाची...

sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

भीती वाटली होती मला, पहिल्यांदा विमानात बसून देशातून बाहेर पडून दुसऱ्या देशात जायला. त्यात हाँगकाँगपर्यंत पोचले आणि पुढचं विमान निघून गेल्याची घोषणा झाली. धड ना स्वत:च्या देशात, धड ना जिथे पोचायचंय त्या देशात, तिसऱ्याच भूमीवर, नको त्या वेळेला अडकल्याची भावना माझा श्वासाचा वेग हलवत होती. पहिल्यांदाच सामोरी जात असलेल्या घटनेचं दडपण येत होतं.

पहिला प्रवास करण्याची वेळ वयाच्या २४ व्या वर्षी आली, म्हणजे तशी उशिरा आली असली, तरी सोशल मीडियानं आयुष्य व्यापून टाकलेला तो काळ नव्हता. मी आता फार मोठी असल्याच्या आविर्भावात सांगत नाहीये. पण ६ वर्षांपूर्वीची गोष्टही आपल्याला ‘पूर्वी’ची वाटावी, म्हणजे सोशल मीडियानं आपल्याला किती झपकन बदलवलंय, कळतंय ना? तर घडणारी प्रत्येक गोष्ट पटकन सोशल मीडियावर पोस्ट करावी, आणि आपल्याला आधार द्यायला कुणाचे ‘अंगठे’ दिसतील किंना ‘दिल’ दिसेल असं काही नव्हतं. मग मी विचार करायला लागले की असं दडपण मला कधी कधी आलंय?

पहिल्यांदा प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाताना, पहिल्यांदा शाळेतून कॉलेजात जाताना, पहिल्यांदा शहर सोडून मुंबईत जाताना. या सगळ्या ठिकाणी मी जगले; पण ज्यांनी जगवलं ती नाती होती. नात्यांच्या बाबतीत असं दडपण कधी कधी आलय? पहिल्यांदा प्रेमंभंग झाला तेव्हा, पहिल्यांदा नातं थांबवण्याचा निर्णय घेतला तेव्हा, पहिल्यांदा खऱ्या अर्थानं कुणाला तरी जीव लावला तेव्हा. म्हणजे सगळ्या ‘पहिल्यांदा’ घडणाऱ्या गोष्टींचं दडपण होतंच. मग विचार केला की नकोशा नात्यातून, हव्याशा जागेतून बाहेर पडल्यावरही पुढचं आयुष्य बरंच चाललंय की.. कुठे काय वाईट सुरूये? म्हणजे पहिल्यांदा घडणाऱ्या गोष्टीचा तात्पुरता तणाव असणं हे सहाजिक आहे तर.. त्याक्षणी मी ठरवलं, आयुष्यात पहिल्यांदा घडणारी गोष्ट खऱ्या अर्थानं जगायची.

असे कित्येक पहिले क्षण, पहिल्या भेटी, पहिल्या जागा होत्या ज्या मला अजून जगायच्या होत्या. पण दडपणात त्या मनासारख्या जगताच आल्या नाहीत. पहिल्यांदा घडणारी गोष्ट मनसोक्त जगण्यासाठी मी स्वत:कडे अजून तटस्थ होऊन बघायला हवं होतं का? म्हणजे त्या पहिलेपणाची मजा मला अजून वाटली असती का? तसंच काहीसं शेवटाबाबतही. काही वेळा एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर आपल्याला माहीत असतं, की आता ही शेवटची भेट. शेवटचंच बघतोय हिला. अगदी आत फक्त स्वत:ला कळत असतं हे. समोरच्या व्यक्तीलाही कदाचित वेळ सरल्याची कल्पना नसते. किंवा आपण एखाद्या जागी पहिल्यांदा आणि शेवटचंच उभं राहतोय. यानंतर कधीही नाही. ही जाणीव फक्त आपल्याला असताना अंगावर कधी वेगळाच शहारा आलाय? मग अशा वेळी तो शेवटचा क्षण किती मनापासून जगता आला असता, असे भविष्यात आडाखे बांधायला लागू नयेत, असा तो क्षण आज जगावा जगावा. असे अनेक शेवटचे क्षणही माझ्या हातून अनेकदा निसटलेत. पण जसे अनुभव वाढत गेले तसे मी हे क्षण ठरवून जगायचं ठरवलंय.

पहिली भेट आणि शेवटची भेट यातली पॅशन सारखी असते. मध्ये घडतो तो निव्वळ व्यवहाराचा किंवा नात्याचा भाग. पहिल्यांदा नव्या घरात गेल्यानंतरचा वास शेवटी तिथून निघताना पुन्हा आठवून बघा. जितका वास बदललेला असेल तितकेच आपले अनुभवही. आरंभीला नमन करतो त्या देवतेच्या सणाची सुरुवात झालीये. त्यानिमित्तानं नात्यातले, जगण्यातले असे सगळे आरंभ मनापासून जगायचं ठरवू या. कारण नात्यांमधल्या अनेक घटना कालांतरानं पुसट होतात. मेंदूच्या कुठल्याशा कोपऱ्यात राहून जातात. वर्षानुवर्षं नंतर लक्षात राहतो तो फक्त प्रत्येक घटना पहिल्यांदा घडली तो क्षण. त्यामुळे तो क्षण दडपणात घालवण्यापेक्षा रसरसून जगलो तर सुरूवात अजून काहीशी वेगळी होऊ शकेल का? प्रयत्न करू या.

loading image
go to top