कन्याकुमारीतील वादळवाट... 

रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री 
Saturday, 12 December 2020

विवेकानंद मिशनचे अविनाशजी यांनी सांगितलं, की शासनानं ‘रॉक मेमोरियल’ उघडण्यास परवानगी दिली नाही. मात्र, बाकी सगळी पर्यटनस्थळं सुरू झाली आहेत. मी लगेच तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना ट्विट केले.

मी हा लेख लिहायला घेतला आहे, तेव्हा मी भारताच्या दक्षिण टोकावर स्वामी विवेकानंदांच्या शिलास्मारकावरून लिहिते आहे. ‘बुरेवी’ वादळ निवळलं आहे आणि मी एका शांतसमयी बसून लिहिते आहे. मी हा लेख पूर्ण करीन तेव्हा मी घराकडची वाट धरलेली असेल. समुद्राने वेढलेल्या बेटावर स्वामी विवेकानंदांनी दोन दिवस आणि तीन रात्र ध्यान केले आणि मग इथून देश विदेश भ्रमण सुरू केले. ऊर्जाशक्ती असलेल्या शिलाखंडावर सलग सहाव्या वर्षी मी पोचले आहे. एकटीनं या आधीही पाचदा आले आहे. इथं यायचं ठरवते, तेव्हा संपूर्ण वैश्विक शक्ती एकत्र येते आणि वाटेत कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येत नाहीत. वादळ तर नाहीच नाही... पण या वर्षी ‘बुरेवी’ येऊन गेलं आणि मला दोनऐवजी पाच दिवस थांबावं लागलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विवेकानंद मिशनचे अविनाशजी यांनी सांगितलं, की शासनानं ‘रॉक मेमोरियल’ उघडण्यास परवानगी दिली नाही. मात्र, बाकी सगळी पर्यटनस्थळं सुरू झाली आहेत. मी लगेच तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना ट्विट केले. मला ४८ तासांत अविनाशजी यांचा फोन आला- रॉक उघडलं आहे. माझी वाट मोकळी झाली. प्रवास करत कन्याकुमारीत पोचले. तिथं माझी नेहमीची रूम तयार होती- पण मला सांगण्यात आलं, की रॉक पुढील तीन दिवस बंद आहे, कारण वादळ येऊ घातलेलं आहे. त्यामुळं पुढील चार-पाच दिवस काही सांगता यायचं नाही. माझी तर तिसऱ्या दिवशी परतीची फ्लाईट होती. इथून पुढचे चार दिवस मला काही करताना ‘नाही’ हा शब्द खूपदा ऐकावा लागला. मी रूममध्ये पोचले आणि स्वतःला बंद करून घेतलं. कसं असतं नाही... ठरावीक वय झालं किंवा प्रतिष्ठा प्राप्त झाली, की ‘नाही’ ऐकायची सवय राहत नाही. मग चिडचिड आणि ‘हे आपल्याच बरोबर का होतं आहे.’ असा प्रश्न करावासा वाटतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लहानपणी आई मला अचानक एखाद्या दिवशी संपूर्ण घराला झाडू मारायला सांगायची. ‘मी का मारू', ‘मीच का मारायचा’ असे प्रश्न विचारले, की आई म्हणायची ‘तुझ्या प्रत्येक ‘का’चं उत्तर मिळणार नाही. सांगितलं म्हणून करायचं.’ त्यामुळं ‘का’ या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधायची सवय पडली. किंवा कधीतरी कळेल ह्या आशेत राहायला शिकले. पण यंदा मी पोचता क्षणी स्मारक बंद राहील असं सांगण्यात येणं म्हणजे कुठले संकेत आहेत, हे एक कोडं होतं. मी तीन दिवस इथंच राहून सहा डिसेंबरला परतायचं ठरवलं. गेस्ट हाऊसमध्ये फक्त मी एकटी. तुरळक कर्मचारी. भोवतालची नारळाची झाडं माझ्यावर रुसल्यासारखी माझ्याकडं वाकून पाहत होती. त्यांचं एकही पान हलत नव्हतं. असीम शांतता. वादळापूर्वीची शांतता म्हणजे काय असते हे मी पहिल्यांदा अनुभवलं. मला निवेदिता भिडे दीदी भेटल्या. त्यांच्या डोळ्यातली चमक आणि हळूच उमटलेलं स्मित मनाला खूप भावलं. त्यांनी रात्रीचं जेवण युवा शिबिरार्थींबरोबर करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी राहुलच्या बहिणीला भेटले. मी ‘केप'ला चाललो म्हणून गेलेला तो एक महिना झाला बेपत्ता आहे. तिसऱ्या दिवशी प्रमोदला भेटले. नैराश्यानं ग्रासलेल्या प्रमोदला कन्याकुमारीहून भारत-भ्रमंती करायची होती. पण दोन तास तोच बोलत होता, तेव्हा असं लक्षात आलं, की त्याची मनःस्थिती स्थिर नाही. त्याला मिशननं सध्या थांबवून ठेवलं आहे. असे काही अजून लोक मला भेटत होते आणि मिशनचं कार्य खूप अफाट आहे हे कळू लागलं. वादळ येत नव्हतं आणि निघूनही जातही नव्हतं. नुसतं नाट्य निर्माण करून ठेवलं होतं. अविनाशजी यांना विचारलं, की ते ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणायचे. त्यांचं बोलणं अगदी नकारात्मक होतं असं मी म्हणणार नाही, पण अगदी सकारात्मक होतं असंही नाही. आता एकदम एक जानेवारीलाच उघडेल, असंही अफवांचं वादळ उठलं. विचारांचा विळखा माझ्याभोवती वेटोळं घालत होता. मी दरवर्षी समुद्रावर एक कविता करते. नुकतीच ‘इस बार तुम पर कोई कविता नहीं’ असा सूर धरून हिंदीत कविता केली. त्याचा त्याला राग आला असावा, म्हणून मला तो वाट करून देत नाही... 

सहा तारीख उजाडली. सूर्योदय बघायला पोचले. आज जाऊ शकले, तर ठीक नाहीतर नाईलाजानं माघारी फिरावं लागणार. असं ‘का’ झालं ह्याचं उत्तर काळ देईलच. सूर्योदय झाला. काळे ढग नाहीसे झाले. आज मी शिलाखंडावर ध्यान मंडपात ध्यानस्थ बसले आहे, असं चित्र माझ्यासमोर उभं राहिलं. तसंच झालं. इच्छापूर्ती झाली. स्वामी विवेकानंदांचे आशीर्वाद मिळाले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

...या लेखाचा शेवटचा परिच्छेद मी परतीच्या प्रवासात कारमध्ये बसून लिहायला घेतला आहे. पोनुलिंगम वादळ, वारं, पाऊस यातून वाट काढत कार चालवतो आहे. आणि माझ्या चेहऱ्यावर पूर्वेकडून पश्चिमेकडं उगवलेलं  स्मित आहे. तुम्हाला ‘का’ हा प्रश्न अजूनही पडला असेल ना? ‘का’ हा धाडसी प्रयोग? तिथं जाऊनच ‘का’ ध्यान करायचं आहे तुला? माझ्या आई-वडिलांनी सांगितलं तेच मी तुम्हाला ही सांगते, प्रत्येक ‘का’चं उत्तर नसतं. माझ्यासारख्या ध्येयवेड्या वाटसरूला वादळाची वाट पालथी घालण्याशिवाय पर्याय नाही. इथून वाटचाल पुढच्या प्रवासाची. काय? येताय? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: radhika deshpande write article about Kanyakumari

Tags
टॉपिकस
Topic Tags: