शर्वरीला मिळाली खास दाद!

sharvari jamenis
sharvari jamenis

शर्वरी जमेनीसचा पहिला मराठी चित्रपट ‘बिनधास्त’ १९९९ मध्ये प्रदर्शित झाला आणि त्या पहिल्याच चित्रपटातील शर्वरीच्या अतिशय ताकदीच्या अभिनयाला त्या वर्षीचे फिल्म फेअर आणि स्क्रीन अवॉर्ड्‌स या दोन्ही प्रतिष्ठित मंचांवर मराठी चित्रपट विभागाचे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे’ पुरस्कार मिळाले होते. ही गुणी अभिनेत्री एक उत्तम कथक नृत्यकलाकारसुद्धा आहे. प्रसिद्ध नृत्यगुरू पंडिता रोहिणीताई भाटेंकडे कथकचं प्रशिक्षण घेऊन त्यातच पदवीचं शिक्षण घेणाऱ्या शर्वरीला दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीच्या प्रतिष्ठित ‘नॅशनल अवॉर्ड’सारखे इतरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही मिळत गेले. शर्वरीच्या नृत्य सादरीकरणाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मोठ्या प्रमाणावर घेतली गेली आहे. ऑस्ट्रेलियातील ऑपेरा हाउसमध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करणारी, शर्वरी तिसरी भारतीय ठरली आहे! शर्वरीला रसिकांकडून कायमच मनापासून दाद मिळत आली आहे. अशीच एक खास दाद शर्वरीला कायमच लक्षात राहिली आहे.

आठ वर्षांपूर्वी शर्वरीचे, कर्नाटकात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सोलो कथकचे कार्यक्रम ठरले होते. पहिला कार्यक्रम बागलकोट जिल्ह्यात होता. संध्याकाळी सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात पहिला दीड तासाचा गाण्याचा कार्यक्रम होता आणि नंतर शर्वरीचं दीड तासाचं कथक नृत्याचं सोलो सादरीकरण होतं. मात्र, कार्यक्रम सुरू होण्याच्या थोडाच वेळ आधी तिला सांगण्यात आलं, की आधी सोलो गाणारे जे गायक होते त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते गाऊ शकत नाही, तर तूच अडीच-तीन तासांचा कार्यक्रम करशील का? एकटीने सलग अडीच-तीन तास नृत्य करणं आणि तेही त्यातील आधी न ठरलेल्या काही रचना, सादर करायच्या म्हणजे खूपच आव्हानात्मक होतं! शिवाय कार्यक्रमात हार्मोनियम वाजवणारे वादक जे त्या गावातले होते, त्यांना शर्वरीच्या ऐनवेळेस ठरवलेल्या रचना माहीत नव्हत्या; पण ते शिवधनुष्य शर्वरीनं लीलया उचललं आणि पेललंदेखील! शर्वरी सलग तीन तास अथक नृत्य करत होती. तेव्हाचं तिचं ते सादरीकरण म्हणजे प्रेक्षकांसाठी एक स्वर्गीय अनुभूती होती. तीन तासांनी जेव्हा शर्वरीचा तो अद्‍भुत पदन्यास थांबला, तेव्हा भारावलेले प्रेक्षक भानावर आले आणि प्रेक्षकांनी ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिलं. कितीतरी वेळ टाळ्या थांबतच नव्हत्या! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तो कार्यक्रम संपला सव्वादहा वाजता आणि मग शर्वरीच्या रूममध्ये प्रेक्षकांमधून एक बाई भेटायला आल्या. त्या गायनॉकॉलॉजिस्ट होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘मी आज एक मोठी जोखमीची सर्जरी करून कार्यक्रमाला आले होते. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप थकले होते. कार्यक्रम थोडावेळ बघून मी जाणार होते; पण तू जे काही सादर केलंस ते जबरदस्त, अप्रतिम होतं. मी घरी जाण्यासाठी उठूच शकले नाही. माझा शारीरिक आणि मानसिक थकवा निघून गेला तो केवळ तुझ्यामुळे. तुझ्या नृत्याला दाद म्हणून मला तुला आवर्जून काहीतरी द्यायचं आहे, नाही म्हणू नकोस. मला फक्त तुझा आवडता रंग आणि तू कोणत्या हॉटेलमध्ये थांबली आहेत ते आणि तू परत कधी जाणार आहेत ते सांग.’’ 

शर्वरी आणि त्या डॉक्टरबाईंमध्ये एक कोणतातरी अदृश्य धागा जोडला गेला होता आणि शर्वरी एकेक उत्तर देत गेली... आवडता रंग - निळा, हॉटेलचं नाव वगैरे सांगितलं; पण शर्वरी दुसऱ्याच दिवशी सकाळी सात वाजता हॉटेल सोडून दुसऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार होती. भारावलेला निरोप घेऊन त्या बाई निघून गेल्या. 

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर पावणेसात वाजता हॉटेलच्या रिसेप्शनवरून शर्वरीला फोन आला. त्या बाई शर्वरीला भेटायला आल्या होत्या. त्यांनी एक सुंदर निळी सिल्कची इरकल साडी शर्वरीच्या हातात ठेवली. त्या म्हणाल्या, ‘‘बागलकोटला तू परत कधी येशील माहीत नाही, आपली परत भेट होईल की नाही तेही माहीत नाही; पण ही घे, बागलकोटच्या कला-संस्कृतीचं प्रतीक असलेली ही हातमागावरची इरकल साडी- खास तुझ्यासाठी. एका कलेनं दुसऱ्या कलेचा केलेला हा सन्मान समज!’’  

त्या बाईंचं एवढ्या सकाळी येणं, तेही साडी घेऊन, म्हणजे शर्वरीसाठी एक कोडं होतं! त्या बाईनी त्यांच्या नेहमीच्या दुकानदाराला रात्री उशिरा फोन करून दुकान उघडायला लावलं आणि एक सुंदर निळी साडी शर्वरीसाठी घेतली! याहून कोणती मोठी दाद असू शकते? शर्वरीसाठी ही साडी ‘पुरस्कारतुल्य’ आहे हे नक्कीच.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com