Pallavi Patil
Pallavi PatilSakal

सौंदर्यखणी : ‘निजाम बॉर्डर’ची ‘मंगलगिरी’

मंगलगिरी गावात अनेक धार्मिक स्थळे असून सतरा-अठराव्या शतकात तिथल्या सुंदर मंदिरांमध्ये कॉटनच्या मंगलगिरी साड्या श्रद्धेच्या भावनेतून देवाला अर्पण करण्याची प्रथा होती.

आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील मंगलगिरी गावात, मंगलगिरी साडीचा जन्म झाला. सोळाव्या-सतराव्या शतकात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि ओडिशाचा काही भाग ‘कुतूबशाही’चं राज्य असलेल्या ‘गोलकोंडा साम्राज्याच्या’ अधिपत्याखाली येत होता. मुबलक प्रमाणात इथं पिकणाऱ्या कापसामुळे सतराव्या शकतात या भागात हातमागावर सुती कापड मोठ्या प्रमाणात विणले जात असे आणि पर्शियन व्यापाऱ्यांबरोबर पर्शियाला आणि युरोपात निर्यात होत असे. सतराव्या शतकाच्या अखेरीस ‘कुतुबशाही’ संपुष्टात आली, तरी इथे नांदत असलेल्या मूळच्या पर्शियन संस्कृतीचा बराच प्रभाव पुढे अनेक वर्षे या भागावर राहिला. या संस्कृतीतील विणकरांच्या वंशजांकडून पुढे इथे कॉटनच्या साड्या हातमागावर विणायला सुरुवात झाली आणि गावाच्या नावावरून त्या साडीला मंगलगिरी नाव पडले.

मंगलगिरी गावात अनेक धार्मिक स्थळे असून सतरा-अठराव्या शतकात तिथल्या सुंदर मंदिरांमध्ये कॉटनच्या मंगलगिरी साड्या श्रद्धेच्या भावनेतून देवाला अर्पण करण्याची प्रथा होती. मग पुढे या साड्यांच्या काठांमध्ये आणि पदरावर ‘जरी’काम होऊ लागले. इथल्या वस्त्रनिर्मितीवर निजामशाहीचा प्रभाव असल्यामुळे चक्क मंगलगिरी साडीच्या पारंपरिक ‘जरी बॉर्डर’ला ‘निजाम बॉर्डर’ असे नाव पडले! जरीच्या बारीक रेषा आणि बिंदूंचा १० ते १५ सेंटिमीटरचा नुसता ‘जरी’ पट्टा, हीच या बॉर्डरची खासियत. त्यामुळे साडीमध्ये दोन भिन्न संस्कृतींची सुंदर गुंफण दिसून येते. ‘निजाम बॉर्डर’ खास ‘पिट लूम’वर विणली जाते, म्हणून या संपूर्ण साड्या ‘पिट लूम’वर विणल्या जातात. ‘पिट लूम’ म्हणजे खड्ड्यावर ठेवलेले हातमाग! ‘पिट लूम’चे खालचे पेडल्स खड्ड्यात असतात आणि विणकर खड्ड्यात पाय सोडून बसतो आणि पेडल्स नियंत्रित करतो.

मंगलगिरीच्या ‘जर’ नसलेल्या बॉर्डरसुद्धा लोकप्रिय आहेत. प्लेन सुती मंगलगिरीला प्लेन कॉन्ट्रास्ट सुती बॉर्डरसुद्धा अतिशय सुंदर दिसतात. या साड्यांवर बुट्ट्या विणल्या जात नाहीत, त्या प्लेन असतात किंवा क्वचित प्रसंगी बारीक चेक्ससुद्धा विणली जाते. तलम कॉटनबरोबरच, एक धागा कॉटन आणि एक धागा सिल्कचा अशा गर्भरेशमी किंवा पूर्ण सिल्कमध्येसुद्धा मंगलगिरी साड्या विणल्या जातात; पण तलम कॉटनच्या मंगलगिरी साड्या जास्त लोकप्रिय आहेत. अनेक वर्षांपासून या साड्या इथे हातमागावर विणल्या जात आहेत. कॉटनचे धागे आधी पाण्यात उकळून घेऊन रात्रभर भिजवत ठेवले जातात, दुसऱ्या दिवशी ते धागे निथळून-पिळून साडी विणायच्या आधी हव्या त्या रंगात डाय करून घेतले जातात. ‘डाय’ झाल्यावर जास्तीचा रंग निघून जाण्यासाठी परत एकदा उकळून घेतले जातात. मग ते धागे परत पिळून-वाळवून विणण्यासाठी हातमागावर ताणून लावले जातात. मग त्या धाग्यांवर तांदळाचे पाणी स्प्रे केले जाते, त्यामुळे ते धागे थोडेसे ‘कुरकुरीत’ होऊन विणकाम सुलभ होते म्हणून या साड्या विकत घेतल्यावर त्यांना थोडा स्टार्च असतो.

या हलक्याफुलक्या साड्या कोणत्याही ऋतूत नेसता येतात. शिवाय मंगलगिरी विणीवर - ईकत विणीचे किंवा कलमकारी पेंटिंगचे ब्लाऊज पेअर केले, की निरनिराळ्या कलांचा संगम फार सुरेख दिसतो. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी या साड्या एक स्टेटमेंट ठरत आहेत. मंगलगिरी साडीमुळे मंगलगिरी गावाला ओळख प्राप्त झाल्यामुळे या साडीला शासनाकडून ‘भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्रक’ मिळाले आहे. आंध्र प्रदेशच्या अनेक साड्या लोकप्रिय असल्या तरी साधेपणाचे सौंदर्य जपणारी मंगलगिरी साडी खास लक्षात राहते.

साडी, फोटो आणि बरंच काही...

आर्किटेक्ट असलेल्या पल्लवी पाटीलला लहानपणापासूनच नव-निर्मितीची, फॅशन डिझायनिंगची जाण होती. कॉलेजमध्ये असताना पल्लवी स्वतःचे कपडे स्वतः डिझाईन करत असे. काही दिवसांपूर्वी तिनं तिच्या आईच्या ३५ वर्षांपूर्वीच्या निरनिराळ्या विणींच्या साड्यांचे स्वतः डिझाईन केलेले कल्पक ड्रेस शिवून घेतले होते.

एकदा तिनं आवड म्हणून एका ‘सौंदर्य आणि टॅलेंट’ स्पर्धेत भाग घेतला होता, त्यातील तिचं सादरीकरण बघून स्पर्धेचे परीक्षक सतीश राजवाडे तिला म्हणाले, ‘‘खूप उत्तम अभिनय करतेस तू, तुझा चेहराही चित्रपट क्षेत्रासाठी योग्य आहे, आवड असेल तर ये या क्षेत्रात, खूप मेहनत घे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे - ‘बाय चॉईस ये, बाय चान्स येऊ नकोस’!’’ ही पल्लवीसाठी मोठी पावती होती! मग पल्लवीनं खूप विचार करून आपला जॉब सोडला आणि योगेश सोमणच्या अभिनयाच्या एका कार्यशाळेत ती सहभागी झाली. ही कार्यशाळा संपवून तिनं ‘नाईन एक्स झकास हिरॉईन’ या शोमध्ये भाग घेतला आणि त्यात ती पहिल्या तीन क्रमांकांत आली. तिथं आदित्य सरपोतदार यांना तिचा अभिनय आवडला आणि त्यांनी त्यांच्या ‘क्लासमेट’ या चित्रपटासाठी तिची निवड केली. पल्लवीच्या ‘क्लासमेट’मधील अभिनयाची दखल घेतली गेली आणि त्यातून तिला अभिनयाच्या अनेक ऑफर्स आल्या.

अशाच तिच्या एका चित्रपटाचं शूटिंग दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये चालू होतं. वैभव तत्त्ववादी तिचा सहकलाकार आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शक होते. एका बंगल्यात चालू असलेल्या त्या शूटिंगच्या आजूबाजूचा परिसर- बाग खूप सुंदर होती. पल्लवीच्या एका सीनसाठी तिच्या ड्रेस डिझायनरनं- प्राची खाडेनं तिच्यासाठी एक सुंदर पिच कलरच्या कॉटनच्या साडीची निवड केली होती. पल्लवी म्हणाली, ‘‘मला ती साडी पाहताक्षणीच खूप आवडली, तिचा रंग, पोत आणि सगळंच. मला साडी फार छान ड्रेप करता येत नाही; पण प्राचीनं ती साडी मला अतिशय सुंदर ड्रेप केली, मला कोणी छान साडी नेसवून दिली तर साडी हा प्रकार कॅरी करायला मला खूप आवडतो. शिवाय मला साड्यांचे प्रकारही फार माहीत नाहीत, या लेखाच्या निमित्तानं ती मंगलगिरी साडी होती हे कळालं.

आता मला साड्यांचे इतर प्रकारही शिकून घ्यायचे आहेत.’’ ती साडी नेसून सीनसाठी तयार झालेली पल्लवी मस्त दिसत होती. सीन सुरू व्हायलाही वेळ होता, त्यामुळे पल्लवीला त्या साडीत खास फोटो शूट करण्याचा मोह आवरला नाही. मग तिनं सेटवरची फोटोग्राफर श्रुती बागवेकडून अगदी सीनला बोलवेपर्यंत त्या साडीतले खूप फोटो काढून घेतले. पुढे लॉकडाऊनमुळे त्या चित्रपटाचं चित्रीकरण थांबलं; पण पल्लवीसाठी मात्र ते चित्रीकरण, ते लोकेशन, ती साडी, त्या साडीतले फोटो... या सगळ्या लक्षात राहणाऱ्या खास आठवणी आहेत. त्या साडीमुळे पल्लवी, साडी या पेहरावाच्या जाम प्रेमात पडली होती, त्यामुळे त्या साडीचा खूप मोठा किस्सा नसला तरी ती साडी पल्लवीच्या खास लक्षात राहिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com