सौंदर्यखणी : डौलदार दाक्षिणात्य सुती साडी!

रश्मी विनोद सातव
Friday, 26 March 2021

दक्षिण भारतात खूप मोठी ‘टेक्सटाईल इंडस्ट्री’ आहे. दक्षिण भारतातले सिल्क आणि कॉटन जगभर प्रसिद्ध आहे. सिल्कचा धागा कसा बनतो हे आपण पूर्वी पाहिले आहे. आज आपण कॉटनचा धागा कसा बनतो ते पाहूयात

दक्षिण भारतात खूप मोठी ‘टेक्सटाईल इंडस्ट्री’ आहे. दक्षिण भारतातले सिल्क आणि कॉटन जगभर प्रसिद्ध आहे. सिल्कचा धागा कसा बनतो हे आपण पूर्वी पाहिले आहे. आज आपण कॉटनचा धागा कसा बनतो ते पाहूयात. झाडावरच्या कापसाच्या बोंडांमधून कापूस वेचल्यानंतर त्यातला ओलावा जाण्यासाठी उन्हात वाळवून त्यातील सरकी म्हणजे बिया काढल्या जातात. बिया काढण्याच्या प्रक्रियेला ‘जिनिंग’ म्हणतात. मग त्या कापसाचे पिंजण म्हणजे ‘कार्डिंग’ केले जाते. त्या पिंजलेल्या कापसाचे पातळ शीट्स तयार केले जातात. मग ते शीट्स गुडाळून लांबट नळ्या तयार केल्या जातात, त्यांना ‘पेळू’ किंवा हिंदीत ‘पुनी’ असे म्हणतात. मग त्यातील एक धागा पकडून त्याला टकळी किंवा चरख्याच्या साह्याने पीळ देत ओढला जातो. त्यातून एक लांबलचक धागा तयार होतो, याला सूत-कताई असे म्हणतात. याच सुतापासून पुढे हातमागावर खादीचे कापड बनते आणि हीच सगळी प्रक्रिया जर मशीनवर केली तर जे कापड बनते त्याला सुती कापड म्हटले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हाताने कातलेल्या सुतापासून, हातमागावर साड्या बनवितांना हे सुत, हातमागावर थेट लागले जाते. पण मशिनवर काढलेले सूत खूप पातळ असते म्हणून दोन ते तीन सूतांना पीळ देऊन, दोन ते तीन प्लायचा धागा बनविला जातो आणि मग हे धागे हातमागावर उभे-आडवे लावले जाऊन, ‘हँडलूम सुती साड्या’ खूप निगुतीने विणल्या जातात. हँडलूम साड्या बनवताना लागणारे कसब, वेळ आणि मेहनत बघता हँडलूम साड्या, पॉवरलूम वर विणलेल्या साड्यांपेक्षा का महाग असतात, याचे उत्तर मिळते. 

दक्षिण भारतातल्या कर्नाटक, केरळ, आंध्रपदेश, तेलंगण आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये, अनेक गावांमधून कॉटनच्या साड्या विणल्या जातात. या राज्यातल्या त्या त्या ठिकाणच्या स्थानिक विणकारांनी या साड्यांमध्ये वैविध्य आणले आहे, आणि त्यानुसार चेट्टीनाड, कोवाई, कसावू, धारवाड, मंगलगिरी, वेंकटगिरी, गुंटूर, सनगुडी अशी असंख्य नावे त्या साड्यांना मिळाली आहेत. गावांच्या नावावरून किंवा डिझाईनच्या प्रकारावरून दक्षिणात्य सुती साड्यांना अशी वेगवेगळी नावे जरी पडली असली तरी एकत्रितपणे या साड्यांना ‘साऊथ कॉटन साड्या’ असेही म्हटले जाते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या हातमागावर विणलेल्या साऊथ कॉटन साड्या नेसायला हलक्याफुलक्या जरी असल्या तरी, टिकायला खूप दणकट असतात. कोणत्याही ऋतूत नेसता येणाऱ्या या साड्या पिढ्यान्‌पिढ्या टिकतात, त्यामुळे या मऊसूत साड्यांच्या ऊबदार गोधड्याही अतिशय सुंदर दिसतात. विशेष म्हणजे या साड्यांच्या डिझाईनवर दाक्षिणात्य मंदिरांचा आणि तिथल्या निसर्गाचा खूप प्रभाव पडलेला दिसतो. या साड्यांच्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर्सही अप्रतिम असतात. या साड्यांवरच्या डिझाईनमध्ये बऱ्याचदा गोपुरं, कोयऱ्या, रुद्राक्ष, रुई फुले, वेलबुट्टी आणि पाने वगैरे असतात. ज्या भागात साडी विणली जाते त्या भागातील संस्कृती आणि नैसर्गिक साधनसंपत्तींचे, ती साडी प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे या साड्यांमधून दाक्षिणात्य सौंदर्याचे दर्शन घडते.

‘आनंदाचा ठेवा’
अभिनेत्री, लेखिका विभावरी दीक्षित-देशपांडेच्या आईचं तीन वर्षांपूर्वी अचानक निधन झालं. तिची आई म्हणजे डॉ. मनीषा दीक्षित. ‘मराठी काव्यसमीक्षा’ हा त्यांचा पीएचडीचा विषय होता. प्रतिभावंत लेखिका आणि नाट्य समीक्षक असलेल्या मनीषाताई, सांस्कृतिक क्षेत्रातील एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व होत्या. मनीषाताईंच्या आवडीनिवडी पण सोज्वळ, सौम्य आणि अभिजात अशा होत्या. भाषेचा अलंकार बाळगणाऱ्या मनीषाताई दागिने आणि कपडे यात मात्र फार रमणाऱ्या नव्हत्या; पण त्यांना कॉटनच्या आणि विशेषकरून साऊथ कॉटन साड्या प्रचंड आवडत असत. त्यांच्याकडे सुंदर साऊथ कॉटन साड्यांचा मोठा खजिना होता. त्यांच्या त्या कॉटनच्या साड्यांना त्या गंमतीने ‘कॉटनचे शालू’ म्हणत. 

बंगळुरूला विभाचे बरेच नातेवाईक राहतात, त्यामुळे विभावरीच्या आईचं बऱ्याचदा बंगळुरूला जाणं-येणं होत असे. त्या, त्यांच्या सगळ्या कॉटनच्या साड्यांची खरेदी खास बंगळुरूला जाऊन, ‘नल्लीज’ मध्ये करत असत. इतकंच काय तर, विभावरीच्या साखरपुड्याच्या आणि लग्नातल्या साड्यासुद्धा, चक्क विभावरी बंगळुरूला नसताना त्यांनी ‘चिकपेठ’मधून आणल्या. ‘चिकपेठ’ म्हणजे सिल्क आणि कॉटन साड्यांची मोठी बाजारपेठ. विभावरीची आणि तिच्या आईची साड्यांची आवड एकाच धाटणीची आहे, त्यामुळे विभावरी तिच्या आईला म्हणाली होती, ‘‘तुला आवडतील त्या साड्या घेऊन ये, मला नक्कीच आवडतील.’’... आणि तसंच झालं. त्यांनी आणलेली प्रत्येक साडी विभावरीला प्रचंड आवडली होती आणि त्या साड्यांचं, विभावरीच्या कार्यक्रमांमध्ये भरभरून कौतुकही झालं होतं. गंमत म्हणजे विभावरीच्या आईच्या साड्या, विभावरीच्या मैत्रिणींमध्येसुद्धा एक जिव्हाळ्याचा विषय होता!  

आईच्या अचानक जाण्याचा आघात, पुढे कितीतरी दिवस विभावरी पचवूच शकली नाही...आईच्या खोलीत जाऊन, तिच्या वस्तू आवरणं किंवा त्या वस्तूंकडे नुसतं बघणंही विभावरीसाठी खूपच अवघड होतं. पुढे असंच दीड वर्ष उलटल्यानंतर, एक दिवस, ठरवून विभावरी त्या खोलीत गेली आणि तिनं आईचं कपाट उघडलं...आणि तिला आईचे शब्द आठवले... ‘‘मी गेल्यावर माझ्या सगळ्या साड्या तू घे....माझा ठेवा समज!’’ आई गेल्याच्या दुःखात असलेल्या विभावरीला, आईचा स्पर्श झालेल्या त्या साड्या, ‘आनंदाचा ठेवा’ घेऊन आल्या. त्या साड्यांमधून विभावरीला परत तिची आई भेटली....! 

त्या ठेव्यातली, एक सुंदर गाजरी रंगाची, कॉन्ट्रास्ट टेम्पल बॉर्डर असलेली आणि साडीभर विखुरलेले ‘हजारी बुट्टे’ असलेली साऊथ कॉटन साडी, विभावरीनं त्यानंतर येणाऱ्या गणेशचतुर्थीला नेसली आणि त्या साडीत तिला तिच्या आईचा मऊसूत स्पर्श जाणवला आणि त्यामुळे आई ठेवून गेलेल्या ‘आनंदाच्या ठेव्या’नंच तिला आईच्या दुःखातून बाहेर यायला मदत केली. 

विभावरीनं हा ‘आनंदाचा ठेवा’ खूप जतन करून ठेवला आहे आणि विभावरी, त्यातल्याच काही साड्या आईच्या जवळच्या मैत्रिणींना आणि विभावरीच्या काही खास मैत्रिणींना- ज्यांना तिच्या आईच्या साड्या आवडायच्या, ‘आईची आठवण’ म्हणून देणार आहे ज्यामुळे हा आनंदाचा ठेवा असाच पुढेही वाटला जाईल ...!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashmi Satav Writes about Southern cotton saree