esakal | सौंदर्यखणी : ग्लॅमरस ‘टिश्यू’ साडी I Tissue Saree
sakal

बोलून बातमी शोधा

Manava Naik

सौंदर्यखणी : ग्लॅमरस ‘टिश्यू’ साडी

sakal_logo
By
रश्मी विनोद सातव

टिश्यूच्या साडीला मोठी ऐतिहासिक परंपरा नसली, तरी निरनिराळ्या साड्यांमध्ये टिश्यूची साडी नेहमीच वेगळी उठून दिसते. मुघल साम्राज्यातील उच्चभ्रू कुटुंबातील अंगरख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टिश्यूच्या फॅब्रिकचा वापर होत असे. त्याकाळी या टिश्यूच्या विणीसाठी खऱ्या सोन्या-चांदीची ‘जर’ वापरली जात असे.

अतिशय तलम धागा वापरून टिश्यूच्या साड्या हातमागावर विणल्या जातात. ही साडी विणताना आडव्या धाग्यांमध्ये, गोल्ड किंवा सिल्व्हर ‘जरी’चे तलम धागे संपूर्ण साडीत विणले जातात आणि साडीसाठी वापरलेल्या उभ्या धाग्यांच्या पोतानुसार टिश्यूच्या साडीचा प्रकार ठरतो. या विणीवर भारतातील कोणत्या एक प्रांताची मक्तेदारी नाही. बनारसची ‘सिल्क-टिश्यू’, आंध्र प्रदेशची ‘उपाडा-टिश्यू’, राजस्थानची ‘कोटा-टिश्यू’, पश्चिम बंगालची ‘लिनन-टिश्यू’ किंवा मध्यप्रदेशची ‘चंदेरी-टिश्यू’ असे प्रकार या साडीत विणले जातात. साडी विणताना वापरलेल्या जरीच्या धाग्यांमुळे संपूर्ण साडीला एक ग्लॅमरस चमक येते. या साड्या टिश्यू पेपरसारख्या पातळ असतात, म्हणून त्यांना टिश्यूची साडी असे नाव पडले असावे. नाजूक, हलक्याफुलक्या आणि काही प्रमाणात पारदर्शक असणाऱ्या या साड्यांना स्वतःची एक खास नजाकत आहे!

यातील जरीमुळे पूर्वीच्या टिश्यूच्या साड्या नेसल्यावर ‘स्टीफ’ राहत असत; परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे उच्च प्रतीचे मऊ जरीचे धागे बनू लागले आहेत. त्यामुळे सिल्कच्या उभ्या धाग्यांबरोबर जरीचे मऊ धागे विणून केलेली टिश्यूची साडी अतिशय सुंदर दिसते आणि छान ड्रेप होते. हलक्या प्रतीचे जरीचे धागे वापरून विणलेली टिश्यूची साडी काही वर्षांनी उभी चिरत असे; पण अलीकडच्या काळात विणली जाणारी उच्च प्रतीच्या जरीची टिश्यू-साडी वर्षानुवर्षे तशीच राहते.

प्लेन टिश्यूच्या साड्यांबरोबर संपूर्ण साडीवर विणलेल्या नक्षीच्या टिश्यू साड्याही खूप लोकप्रिय आहेत. प्लेन टिश्यूच्या साडीवर ‘टेंपल ज्वेलरी’ किंवा ‘हँडमेड ज्वेलरी’ फार सुरेख दिसते. उच्च प्रतीची ‘जर’ वापरून हातमागावर विणलेल्या संपूर्ण नक्षीकाम केलेल्या या साड्यांची किंमत जास्त असली, तरी नववधूच्या ‘वेडिंग ट्रूसो’मध्ये अशा एखाद्या तरी सिल्क-टिश्यूच्या साडीची नक्कीच वर्णी लागते. दुसऱ्या विणीबरोबर, पदर आणि काठ टिश्यूत विणलेल्या साड्याही खूप लोकप्रिय आहेत. सिनेतारकांनादेखील या ग्लॅमरस साडीची भुरळ पडते, बारीक नक्षीकाम केलेल्या लाखों रुपये किंमतीच्या टिश्यू साड्या या तारका खूप ग्रेसफुली कॅरी करताना दिसतात.

टिश्यू साड्यांची घ्यायची काळजी

या साड्या ‘ड्राय-वॉश’च कराव्या लागतात. ही साडी वापरून झाल्यावर सावलीत थोड्या वेळ हवेला ठेवून मग सुती मऊ कापडात किंवा जुन्या सुती ओढणीत गुंडाळून ठेवावी. पाच-सहा महिन्यांनी या साडीची घडी बदलत राहावी. शिवाय परफ्युमचा वापर करताना थेट साडीवर करू नये, नाहीतर परफ्युममधील केमिकल्समुळे टिश्यूच्या धाग्यांवर व्यस्त परिणाम होऊ शकतो. योग्य ती काळजी घेतल्यास या साड्या वर्षानुवर्षे टिकतात.

चंदेरी धाग्यांची मैत्री

आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मनवा शाळेत असल्यापासूनच ‘थिएटर’ करत होती; परंतु या क्षेत्रात यायचं असं काही तिनं ठरवलं नव्हतं. मनवा म्हणाली, ‘‘एकदा मी नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी एका टीव्ही चॅनेलच्या ऑफिसमध्ये गेले होते, तिथं माझं व्यक्तिमत्त्व आणि माझं बोलणं ऐकून त्यांनी मला एक ऑडिशन द्यायला सांगितली, आणि चक्क त्या ऑडिशनमधून माझं, ‘स्पेशल स्क्वार्ड’ या मालिकेसाठी सिलेक्शन झालं आणि मी आपोआप या क्षेत्रात आले! त्या मालिकेतील माझा अभिनय बघून मला हिंदी-मराठी मालिका आणि चित्रपटांसाठी अनेक ऑफर्स आल्या आणि या क्षेत्रात मी स्थिरावले, ती कायमची!’’

स्क्रिप्ट आणि भूमिकेला अत्यंत महत्त्व देणाऱ्या मनवाच्या अभिनय कलेला अनेक पैलू आहेत. नृत्य, संगीत आणि दिग्दर्शनाचीसुद्धा उत्तम जाण असलेल्या मनवाला चित्रपटांबरोबरच ‘थिएटर’ करायलाही जाम आवडतं. थोर नाटककार शेक्सपिअर यांनी लिहिलेल्या ‘हॅम्लेट’ या जगप्रसिद्ध मूळ नाटकाचा, लेखक नाना जोग यांनी खूप वर्षांपूर्वी मराठीत अनुवाद केला होता. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते नाटक दिग्दर्शित केलं. त्या नाटकात मनवा ‘ऑफिलिया’च्या कसदार भूमिकेत काम करते. या नाटकात मनवाबरोबर अजून एक स्त्री पात्र आहे, ते म्हणजे राणीचं. अभिनेत्री मुग्धा गोडबोले ही भूमिका करते. दोनच स्त्री पात्रं असलेल्या या नाटकाच्या निमित्तानं मनवा आणि मुग्धा एकत्र काम करू लागल्या आणि त्यांची घट्ट मैत्री झाली. या नाटकाच्या दौऱ्यांवर असताना मनवा आणि मुग्धा जाम धम्माल करतात. मनवा म्हणाली, ‘‘आमच्या दोघींची मैत्री तशी फक्त अंदाजे चार वर्षांपूर्वीची; पण आमची छान गट्टी जमली आहे. मुग्धा जाम गप्पिष्ट आहे. आम्ही दौऱ्यावर असताना रात्री उशिरापर्यंत कितीतरी तास गप्पा मारत राहतो. तिच्या लाघवी स्वभावामुळे माझी ती खास हक्काची मैत्रीण झाली आहे.’’

त्या दोघींची मैत्री झाल्यानंतर, सप्टेंबरमध्ये मनवाच्या वाढदिवसाची पार्टी होती. अर्थातच मुग्धा त्या पार्टीला गेली होती आणि तिने मनवाला एक छानशी सिल्व्हर टिश्यूची साडी भेट दिली. इतकी सुंदर साडी भेट मिळाली म्हणून मनवाला खूप भारी वाटलं होतं- कारण तोपर्यंत मनवाकडे स्वतःच्या अशा फारशा साड्या नव्हत्या. शिवाय ‘साडी’ या विषयातील प्रचंड ज्ञान नसल्यामुळे मनवा नेहमी, आई आणि बहिणीच्याच साड्या वापरत असे. मनवा म्हणाली, ‘‘मुग्धानं भेट दिल्यामुळे ही साडी माझ्यासाठी खूप खास आहे, मला माझ्या वाढदिवसाला फारसं कधीच कोणी गिफ्ट देत नाही! पण मुग्धाचा हा ‘गिफ्ट-सिलसिला’ अजूनही चालू आहे. मुग्धा दर वाढदिवसाला मला काही ना काही गिफ्ट देत असते. तिनं दिलेल्या गिफ्ट्स मी फार सांभाळून वापरते.’’

या टिश्यूच्या साडीत गुंफलेले दोघींच्या मैत्रीचे चंदेरी धागे, मनवा आयुष्यभर सांभाळून ठेवेल हे नक्की!

loading image
go to top