सौंदर्यखणी : काठात विणलेलं सौंदर्य : ‘कुपडम साडी’!

आंध्र प्रदेशात विणली जाणारी अजून एक सुंदर साडी म्हणजे- ‘कुपडम साडी.’ आंध्र प्रदेशात चिराळा समाजातील विणकरांकडून हातमागावर ही साडी विणली जाते.
Hemangi Kavi
Hemangi KaviSakal

आंध्र प्रदेशात विणली जाणारी अजून एक सुंदर साडी म्हणजे- ‘कुपडम साडी.’ आंध्र प्रदेशात चिराळा समाजातील विणकरांकडून हातमागावर ही साडी विणली जाते. ही साडी त्या प्रांतातील धार्मिक कार्यांमध्ये आवर्जून नेसली जाते.

‘कुपडम’ ही एक साडी विणकामाची विशिष्ट पद्धत असून, या पद्धतीत ही साडी विणली जाते, म्हणून तिला ‘कुपडम साडी’ म्हणतात. कुपडम पद्धतीत हातमागावर साडीच्या दोन्ही काठांसाठी आणि साडीच्या मधल्या भागासाठी ‘बान्या’चे धागे वेगवेगळे वापरले जातात, एकच एकसंध आडवा धागा विणला जात नाही. त्यामुळे ‘ब्राइट कॉन्ट्रास्ट’ काठ तयार होतात. ‘इंटरलॉकिंग’ पद्धतीने हे काठ मुख्य साडीला जोडले जातात. याला ‘कोरवाई टेक्निक’ असेही म्हणतात, शिवाय या काठांमधील आणि पदरामधील उभे-आडवे दोन्ही धागे सिल्कचे असतात आणि त्यात जरीचे धागे टाकून सुंदर नक्षी विणली जाते. आंध्र प्रदेशात तयार होणाऱ्या कुपडम साड्यांसाठी लागणारी ‘जर’ मात्र सुरतवरून मागवली जाते. या साडीच्या काठांमध्ये कधी ‘टेम्पल बॉर्डर’ किंवा ‘ईकत विणकाम’ तर कधी सुंदर पारंपरिक नक्षी विणलेली असते. कुपडमचे काठ अतिशय आकर्षक असून तीच या साडीची ओळख आहे.

कुपडमचे काठ आणि पदर सिल्कचा असून मुख्य साडी ‘गर्भरेशमी’ असते. साडीच्या मधल्या भागासाठी ६० ते ७० टक्के मलबेरी सिल्कचे धागे आणि ३० ते ४० टक्के कॉटनचे धागे वापरले जातात. त्यामुळे या साडीत सिल्क आणि कॉटन, या दोन्ही धाग्यांच्या गुणधर्मांची गुंफण झालेली असते. त्यामुळे या साडीचे काठ आणि पदर जरी, भरजरी असला तरी मुख्य साडीतल्या कॉटनच्या धाग्यांमुळे ही साडी वजनाला हलकी असते.

मूळच्या प्लेन असणाऱ्या या साड्या त्यात वैविध्य आणण्यासाठी आता भरलेल्या ब्रोकेड, चेक्स किंवा बुट्ट्यांमध्येही विणल्या जात आहेत. या साडीच्या विणकामात नवनवीत प्रयोग होत असून, मुख्य साडीत जरीचे तलम धागे संपूर्ण साडीत विणून ‘टिश्यू कुपडम’ साडीसुद्धा विणली जात आहे. हातमागावर केले जाणारे हे काम अत्यंत कौशल्याचे असून, अशा ‘टिश्यू कुपडम’ साड्यांच्या किंमतीसुद्धा जास्त असतात. आकर्षक रंगात विणल्या जाणाऱ्या या साड्यांना मोठी ऐतिहासिक परंपरा नसली, तरी ‘कुपडम साडी’ला, ‘कुपडम टेक्निक’मुळे स्वतःची खास ओळख आहे.

कौतुकाचा ‘धागा’

मूळची चित्रकार असलेली हेमांगी कवी, मुंबईत ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये शिकताना मित्र-मंडळींमध्ये कॉलेजच्या प्रोफेसर मंडळींची, गंमत म्हणून मिमिक्री करत असे! कॉलेजच्या सरांना हे कळल्यावर त्यांनी तिला मुंबई युनिव्हर्सिटीच्या ‘यूथ फेस्टिवल’मध्ये भाग घेण्यासाठी विचारलं, तेव्हा ती म्हणाली, ‘‘नको सर, मला स्टेजवर खूप भीती वाटते.’’ पण नंतर सगळ्यांच्या आग्रहाखातर शेवटी तिनं स्टेजवर होणाऱ्या विविध गुणदर्शनाच्या सादरीकरणात ‘फाइन आर्टिस्ट’ म्हणून भाग घेतला. हेमांगी म्हणाली, ‘‘ती माझी पहिली स्टेजची ओळख. मी चित्र काढताना कॅनव्हासवर व्यक्त होते, तसंच ‘स्टेज’सुद्धा मला एक कॅनव्हास वाटतो... व्यक्त होण्यासाठी!’’ ती स्टेजच्या ‘कॅनव्हास’वर इतकी मनमोकळेपणानं व्यक्त झाली, की तिला पुरुषोत्तम स्पर्धेसाठी कॉलेजतर्फे नाटकात मुख्य भूमिकेत घेतलं आणि त्या नाटकाला त्या वर्षीचं दुसरं पारितोषिकदेखील मिळालं. तेव्हापासून मनोरंजन क्षेत्रातली विविध माध्यमं तिच्यासाठी, तिची अभिनयकला रेखाटणारी सुंदर माध्यमं ठरत गेली. हेमांगी कायमच कोणताही आडपडदा न ठेवता थेट व्यक्त होत आली आहे. तिच्या या व्यक्त होण्याला आणि तिच्या अभिनयाला दाद देण्यासाठी म्हणून, तिची पुण्यातली एक चाहती तिच्यापर्यंत पोचली आणि तिनं हेमांगीपर्यंत आपल्या भावना एका वस्तूच्या माध्यमातून पोचवल्या, आणि ती वस्तू होती एक सुंदर ‘कुपडम साडी!’

काही दिवसांपूर्वी हेमांगी, एका शूटिंगच्या निमित्तानं पुण्याला निघाली होती. प्रवासात तिनं सोशल मीडियावर गंमत म्हणून पुण्याला निघाल्याचं आणि ती उतरणार होती त्या हॉटेलचं लोकेशन अपडेट केलं. हे अपडेट नेमकं तिच्या पुण्यातल्या त्या चाहतीनं पाहिलं आणि ती चाहती थेट त्या हॉटेलवर गेली आणि हॉटेलच्या रिसेप्शनवर तिनं हेमांगीसाठी एक छानसं पाकीट ठेवलं आणि तिच्या रूमवर पोचवायला सांगितलं! हेमांगीनं ते कुतूहलानं उघडून पाहिलं, तर आत एक छोटीशी चिठ्ठी आणि एक सुंदर पिवळ्या रंगाची साडी. चिठ्ठीत हेमांगीच्या व्यक्त होण्याचं आणि तिच्या अभिनयाचं मनापासून कौतुक होतं आणि त्यानिमित्तानं तिला कुपडम साडी भेट दिली होती! या सगळ्या प्रकारानं हेमांगी खूप भारावून गेली. तिला ती साडी खूपच आवडली. तिच्याकडे कुपडम हा प्रकार नव्हताच. कामाची दाद म्हणून मिळालेली ती साडी हेमांगीसाठी खूप खास आहे.

गंमत म्हणजे हेमांगीचं ‘साडी कनेक्शन’ लहानपणापासून आहे. चार-पाच वर्षांची असल्यापासून तिला साडी या पेहरावाचं आकर्षण होतं. इतक्या लहानपणी, ती तिच्या आईच्या साड्या नेसायचा प्रयत्न करून वेड्यावाकड्या गुंडाळत असे. हळूहळू आई कशी साडी नेसते ते बघून-बघून ती स्वतःची स्वतः साडी नेसू लागली आणि तिला ती जमूही लागली. दहा बारा वर्षांची होईपर्यत तर, हेमांगीला उत्तम साडी नेसता येऊ लागली. बारा वर्षांची असताना ती इतकी उत्तम साडी नेसत असे की, ती तिच्या बिल्डिंगमध्ये त्यासाठी प्रसिद्ध झाली. इतकी प्रसिद्ध, की बिल्डिंगमधल्या तरुण मुली सणावारांना आणि अगदी ‘कांदेपोह्यां’च्या कार्यक्रमांनादेखील, साडी नेसून द्यायला हेमांगीला बोलावत असत. हेमांगी त्यांना छान चापून-चोपून साडी नेसवून, अगदी स्टूलवर उभं राहून पदरदेखील पिनअप करून देत असे. इतकंच नाही, तर हेमांगी अजून थोडी मोठी झाल्यावर साडी नेसून डोंगरदेखील चढत असे. तिच्या सगळ्या बहिणींच्या लग्नांत करवली म्हणून हेमांगी साडी आवर्जून नेसत असेच; शिवाय त्या लग्नांनंतर करवली म्हणून डोंगरावरच्या त्यांच्या नेहमीच्या देवदर्शनाला जातानासुद्धा हेमांगी साडी नेसून भराभरा डोंगर चढत असे! शूटिंगच्या सेटवरसुद्धा साडीत, क्रेनवरून इकडून तिकडे जाणं आणि साडीतला तिचा सहज वावर बघून सेटवरचे सगळे तिच्याकडे कौतुकानं बघतच राहतात!

हेमांगी म्हणाली ‘‘मी आईच्या तीस-पस्तीस वर्षांपूर्वीच्या काही साड्या अजूनही आवडीनं नेसते. त्या साड्या अजूनही खूप छान राहिल्या आहेत. माझ्या आजीची नऊवार साडीसुद्धा मी माझ्या नाटकांच्या प्रयोगांना नेसत असते. जीन्स आणि ड्रेसेसपेक्षाही, साडी मला जास्त कम्फर्टेबल वाटते. साडीइतका ग्रेसफुल पेहेराव नाही!’’

नेहमीप्रमाणेच छान व्यक्त होणारी हेमांगी, या लेखाच्या निमित्तानं साडीवर बोलतानाही भरभरून व्यक्त झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com