सौंदर्यखणी : ‘मिथिला कनेक्शन’ असलेली ‘मधुबनी’ | Mdhubani Saree | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreya Bugade
सौंदर्यखणी : ‘मिथिला कनेक्शन’ असलेली ‘मधुबनी’

सौंदर्यखणी : ‘मिथिला कनेक्शन’ असलेली ‘मधुबनी’

रामायणकाळात तेव्हाच्या मिथिला प्रांतात म्हणजे आत्ताच्या बिहारमध्ये मधुबनी कला उदयास आली, असं मानलं जातं. पौराणिक दाखल्यांनुसार, सीता स्वयंवराच्या वेळेस मिथिलानगरीच्या जनक राजानं, एका चित्रकाराला सीतेच्या स्वयंवराचं चित्र काढायला सांगितलं होतं आणि ते चित्र त्या चित्रकारानं मधुबनी शैलीत काढल्याचा उल्लेख आढळतो. शिवाय स्वयंवरासाठी मिथिलानगरीतील स्त्रियांनी राजवाड्याच्या भिंती सुशोभित करण्यासाठी मधुबनी शैलीत चित्रं काढल्याचे उल्लेखही आढळतात. त्यामुळे मधुबनी शैलीला, ‘मिथिला शैली’ किंवा ‘भित्तीचित्रं’ असंही म्हणत असत, आणि या संदर्भांमुळे ही शैली किती जुनी आहे याचाही अंदाज येतो. पुढे काळाच्या ओघात ही शैली लोक विसरू लागले; पण १९३४ मध्ये, बिहारमध्ये मोठा भूकंप झाला आणि घरांची मोठी पडझड झाली. त्या पडझडीची पाहणी तत्कालीन ब्रिटिश अधिकारी विल्यम आर्चर करत होते, तेव्हा त्यांना, पडलेल्या काही घरांच्या भिंतींवर मधुबनी शैलीतली चित्रं दिसली आणि त्या चित्रांना प्रसिद्धी मिळाली व मधुबनी शैली पुन्हा जगासमोर आली. पुढे १९६० मध्ये बिहारमध्ये मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा मधुबनी आर्टिस्ट महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून, ‘अखिल भारतीय हस्तकला मंडळा’नं अशा महिलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिलं आणि त्यातून मधुबनी साडी प्रसिद्धीच्या झोतात आली.

‘मधुबनी’ ही साडीची वीण नसून ती एक चित्रकलेची शैली आहे. ही शैली वापरून पेंट केलेली साडी म्हणजे मधुबनी साडी. या साडीसाठी टसर सिल्क, घिचा सिल्क, मुगा सिल्क, रॉ सिल्क, डयुपियन सिल्क, मलबेरी सिल्क इत्यादी फॅब्रिकचा वापर केला जातो. अलीकडे लिनन आणि कॉटनवरसुद्धा मधुबनीचे प्रयोग होत आहेत. मधुबनी जिल्ह्यातील मधुबनी आर्टिस्टमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आहेत. घरकाम सांभाळून त्या हे काम करत असतात.

ही साडी तयार करण्यासाठी सर्वांत आधी योग्य त्या फॅब्रिकची निवड होते. साडीसाठी ठरावीक रंग हवा असेल, तर ते फॅब्रिक हव्या त्या रंगात डाय करून घेतलं जातं. मग साडीच्या मापाचं ते कापड थोडा वेळ पाण्यात भिजवून वाळवलं जातं. मग त्या कापडावर हलका स्टार्च करण्यासाठी आरारूट, साबुदाणा आणि पाणी याचं मिश्रण फवारलं जातं आणि साडीला रोल प्रेस केलं जातं. अशा रोल प्रेस केलेल्या साड्या मधुबनी आर्टिस्ट आपापल्या घरी घेऊन जातात आणि मोठ्या आडव्या टेबलवर ही साडी क्लिप्सनी ताणून लावावी जाते. आधी हलका स्टार्च केलेला असल्यामुळे त्यावर पेंटिंग करणं सोपं जातं. प्रामुख्यानं काठांवर आणि पदरावर मधुबनी पेंटिंग केलं जातं. पेंटिंगसाठी आधी हातानं आउटलाईन काढून घेतली जाते, त्यासाठी निबचा वापर केला जातो. बोरूसारख्या लाकडी पेनला पुढे निब असते आणि काळ्या रंगात बुडवून फ्री हॅन्ड पद्धतीनं आउटलाइन काढून घेतली जाते. हा काळा रंग वाळला, की बारीक ब्रशनं आतील रंग भरायला घेतले जातात. कधी रंग भरले जातात, तर कधी, रंगीत बारीक रेषांनी डिझाइनच्या आतील भाग भरला जातो. ब्रशचा शोध लागायच्याही आधी हे रंगकाम करताना हाताची बोटं किंवा बारीक काड्यांना कापूस गुंडाळून त्याचा वापर केला जात असे.

नैसर्गिक रंग वापरून बारीक नक्षीकाम केलेल्या या चित्रांमध्ये प्राणी, पक्षी, मासे, तुळस, वड, बांबू, ग्रह-तारे इत्यादी निसर्गातील घटकांबरोबरच, भौमितिक आकार आणि रामायणातील आणि इतर पुराणकथांमधले प्रसंग चित्रित केलेले असतात. मधुबनीमधील देव-देवतांची आणि इतर स्त्री-पुरुषांच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून मधुबनी ओळखली जाते. उदाहरणार्थ, माशाच्या आकारात काढलेले मोठे डोळे आणि टोकदार नाक किंवा बारीक काम केलेले मोठे दागिने वगैरे. मधुबनी करणाऱ्या स्त्रिया सांगतात, ‘चित्रांमधील या प्रत्येक घटकाला काहीतरी अर्थ आहे, जसं मासे म्हणजे सुदैव, मोर म्हणजे प्रेम, तुळस म्हणजे पवित्र, बांबू म्हणजे समृद्धी, ग्रह-तारे म्हणजे आशावाद. शिवाय देव-देवतांची चित्रं काढून आम्ही आमची सेवा देवाला रुजू करतो!’

नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी फळांच्या बिया, सालं, झाडांची मुळं, पानं, फुलं, तांदळाची पेस्ट, हळद, चंदन, इंडिगोसारखे घटक वापरले जातात आणि काळ्या रंगासाठी कोळसा आणि गाईचं शेण यांचं मिश्रण वापरलं जात असे. हे नैसर्गिक रंग पक्के होण्यासाठी केळीच्या पानातील एका घटकात मिसळून वापरले जात असत; परंतु अलीकडच्या काळात मात्र नैसर्गिक रंग बनविणारे कारागीर कमी झाल्यामुळे खास फॅब्रिकसाठी बनविलेले रंग वापरले जातात.

मधुबनी साडी फ्री हॅन्ड पद्धतीनं पेंट केल्यामुळे प्रत्येक साडी वेगळी असते, आणि मधुबनीची एकेक साडी म्हणजे, फ्रेम करून ठेवावी अशी कलाकृती असते. मधुबनी ही फक्त एक कला नसून, महिला मधुबनी आर्टिस्टसाठी सक्षमीकरणाचंदेखील एक साधन आहे!

श्रेयाच्या ‘म्युझियम’मधली मधुबनी

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातील एक अद्‍भुत रसायन म्हणजे- ‘श्रेया बुगडे.’ वयाच्या आठव्या वर्षापासून बालनाट्यात काम करणारी श्रेया कॉलेजमध्ये असतानाही विविध एकांकिका स्पर्धांत भाग घेत होती. मराठीबरोबरच गुजराती, मारवाडी आणि पारशी भाषांमधूनसुद्धा ती एकांकिका करत असे. त्यातूनच तिचा व्यावसायिक नाटकांचा प्रवास सुरू झाला. निरनिराळ्या भाषेतील लोकांची बोलण्याची लय आणि ढब- याचं निरीक्षण करण्याचा छंद तिला लहानपणीच जडला होता. श्रेयानं मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचं असं मात्र काही ठरवलं नव्हतं. व्यावसायिक नाटकांमुळे तिला मालिकांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि ‘तू तिथे मी’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘अस्मिता’सारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका खास लक्षात राहिल्या. मग ‘झी मराठी’वरील ‘फू बाई फू’ या ‘स्टॅन्ड अप कॉमेडी शो’मधून श्रेयाची खास ओळख निर्माण झाली. नंतर ‘चला हवा येऊ द्या’मुळे मराठीत विनोदी स्किट हा प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला आणि विनोदी अभिनयावर मास्टरी मिळवणारी श्रेया, ‘चला हवा येऊ द्या’मधील एकमेव स्त्री कलाकार ठरली. श्रेयानं विनोदी स्कीटमधून अक्षरशः शेकडो भूमिका केल्या.

या भूमिकांसाठी तिनं त्या-त्या भूमिकेला साजेसे असे अनेक समर्पक पेहेराव केले आहेत; पण श्रेया म्हणाली, ‘‘मी मूळची साडी-वेडी आहे! मला घरच्या आणि इंडस्ट्रीच्या कार्यक्रमांना साड्याच नेसायला आवडतात, अगदी ‘पेज थ्री पार्टी’ असेल तरीही! माझ्या आईकडे असंख्य साड्या आहेत. देशभरातील सगळ्या ‘वीव्ह्‌ज’च्या साड्या तिच्याकडे आहेत. तिचा संग्रह म्हणजे साड्यांचं म्युझियम आहे. आता माझाही साड्यांचा संग्रह सुरू झाला आहे. मी शूटिंगनिमित्त ज्या ठिकाणी जाते, तिथली खास साडी ‘सुव्हिनिअर’ म्हणून आवर्जून विकत घेत असते; पण त्यासाठी लवकरच मला आता मोठं वार्डरोब घ्यावं लागणार आहे!’’

तिच्या आईकडचा साड्यांचा संग्रह आणि तिच्या आईची साड्यांची जाण सर्वश्रुत आहे. एकदा श्रेयाच्या मोठ्या बहिणीच्या एका मैत्रिणीला फॅशन डिझाईनिंगच्या कोर्समध्ये, भारताच्या निरनिराळ्या विणींच्या साड्यांचा प्रोजेक्ट करायचा होता. ‘गुगल’वरच्या फोटोंपेक्षा ती श्रेयाच्या आईकडे गेली! देशभरातील निरनिराळ्या पारंपरिक विणींच्या पस्तीस साड्या तिला एके ठिकाणी मिळाल्या आणि ती खूश झाली.

श्रेयालासुद्धा आईमुळे साडी हा प्रकार प्रचंड आवडतो. श्रेयाचं ‘साडी-स्टायलिंग’ तिची आईच करत असते. श्रेयाचं हे साडीप्रेम तिच्या मित्र-मैत्रिणींना चांगलंच माहिती आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी श्रेया, तिचे यजमान आणि तिची खास मैत्रीण अभिज्ञा भावे व तिचे यजमान एकत्र ट्रिपला गेले होते. त्या ट्रिपमध्येच श्रेयाचा वाढदिवस होता. अभिज्ञानं श्रेयाला वाढदिवसानिमित्त एक खास ‘सरप्राईझ गिफ्ट’ दिलं. आत एक सुंदर गुलबक्षी रंगाची मधुबनी पेंटिंग केलेली साडी होती. श्रेया म्हणाली, ‘‘माझ्या आईकडे अनेक मधुबनी साड्या आहेत; पण माझ्या स्वतःकडे मधुबनी नव्हती. अभिज्ञानं दिलेल्या या साडीमुळे संग्रहात नवीन प्रकार रुजू झाला!’’ अभिज्ञा तिला म्हणाली, ‘‘तुला गिफ्ट देणं सोप्पं आहे, फारसा विचार करावाच लागत नाही. सरळ हॅन्डलूम प्रदर्शनात गेले आणि ट्रिपच्या आधीच साडीचा हा एक वेगळा प्रकार तुझ्यासाठी घेऊन ठेवला होता!’’

श्रेयाला ही गिफ्ट मिळाल्यानंतर लॉकडाऊनमुळे लगेच ही साडी नेसायचा प्रसंग आला नव्हता; पण दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये घरून ऑनलाईन मुलाखती सुरू झाल्या आणि ‘झी मराठी’च्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी श्रेयाला घरून लाईव्ह जायचं होतं. मग तिनं त्या कार्यक्रमासाठी तिच्या स्वतःच्या ‘साडी म्युझियम’मधली तिच्या खास मधुबनी साडीची घडी मोडली आणि लॉकडाऊनमुळे थांबलेल्या कार्यक्रमांना पुन्हा सुरुवात केली.

loading image
go to top