‘खणाचा’ खणखणाट!

‘खणाचा’ खणखणाट!

खण म्हणजे पारंपरिक वस्त्रांमधलं एक खणखणीत नाणं! जवळजवळ ३०० वर्षांपूर्वीपासून उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या विदर्भ-मराठवाड्यात हॅन्डलूमवर हे वस्त्र विणलं जात आहे. पूर्वी खणापासून फक्त चोळ्या आणि लहान मुलींना परकर-पोलकी शिवली जात असत. पूर्वी कॉटन खणाचं कापड फक्त हॅन्डलूमवर बनत असे. त्याची प्रक्रियाही बरीच क्लिष्ट आहे. धाग्यांच्या मोठ्यामोठ्या लडी ‘अल्कलाईन सोल्युशन’मध्ये एक दिवस बुडवून ठेवणं, मग हवी ती शेड बनवण्यासाठी वेगवेगळ्या डाय पावडर पाण्यात मिक्स करून हवा तो रंग तयार करत ठेवणे, त्यानंतर दोन स्टीलच्या रॉडवर धागे लटकवून, बनवलेल्या रंगाच्या मिश्रणात बुडवून ४० ते ५० डिग्री सेल्सियसवर जवळजवळ तासभर उकळवणं, मग पिळून, विंचरून त्याच्या बॉबीन भरून हातमागावर लावणं आणि मग विणकामाला सुरुवात करणं- तेही हातानं, त्यामुळे पूर्वी १५ दिवसात फक्त २० मीटर कापड विणून होत असे! 

पुढे जेव्हा पॉवरलूम आल्या, तेव्हा मात्र सगळं चित्रच पालटलं ! खणाचं कापड काही प्रमाणात हॅन्डलूमवर आणि मोठ्या प्रमाणात पॉवरलूमवर बनू लागलं. खण फक्त चोळ्या आणि परकर-पोलक्यांपुरते मर्यादित न राहता बॅग्ज, ड्रेसेस आणि अतिशय सुंदर अशा डिझायनर साड्या खणात बनू लागल्या. 

खणाची टिपिकल मराठमोळी साडी, त्यावर शक्यतो कॉन्ट्रास्ट प्लेन ब्लाऊज, नाकात नथ आणि चांदी किंवा ऑक्सिडाईझचे दागिने हा पेहराव एकदम ट्रेंडिंग झाला. इतका ट्रेंडिंग, की सोशल मीडियावर साडीचा व्यवसाय करणाऱ्या असंख्य ब्रॅण्ड्समध्ये खणाची साडी येऊन विराजमान झाली आणि अगदी गृहिणींपासून ते थेट मोठमोठ्या सिनेतारका या खणसाडीच्या प्रेमात पडल्या. 

खण हा प्रकार पारंपरिक असला, तरी सध्या खणाच्या साड्यांना एक डिझायनर टचसुद्धा मिळाला आहे. पूर्वी काही ठराविक रंगांतच मिळणारं खणाचं कापड आता अनेक सुंदर रंगात मिळू लागलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर रंगसंगतीची चांगली जाण असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचं खणाचं कापड जोडून अतिशय सुंदर अशी साडी टेलरकडून बनवून घेऊ शकाल. शिवाय रेशमाचं काम केलेल्या खणाच्या ‘हॅन्ड-क्राफ्टेड’ साड्या हा पण एक छान पर्याय आहे. त्यामुळे खणाची साडी जरी ट्रेंडिंग असली, तरी प्रत्येकीची खणाची साडी अगदी युनिक असू शकते! त्यामुळे तुमचंही खणाचं नाणं खणखणीत वाजेल हे नक्की! 

खणाची साडी विकत घेताना या गोष्टी माहीत हव्यात : 
- खणाचे मुख्य दोन प्रकार असतात - हॅन्डलूमवर बनणारे खण आणि पॉवरलूम बनणारे खण. 
- पॉवरलूमवर बनणाऱ्या चांगल्या प्रतीच्या खणात ७० ते ८० टक्के कॉटन असतं आणि त्या खणाच्या कापडाला चकाकी येण्यासाठी २० ते ३० टक्के रेयॉन आणि आर्ट सिल्क असते. 
- हॅन्डलूमवर बनवलेले खण रेशमाचे असून काठात काही प्रमाणात कॉटन असते. हे खण थोडे महाग असतात. 
- काही ठिकाणी पॉवरलूमवर बनवलेले खण पूर्णपणे पॉलिस्टरचे असून त्याचे लवकरच धागे निघू लागतात. महत्त्वाचं म्हणजे पॉलिस्टरचे स्वस्त खण हॅन्डलूमचे खण म्हणून आपण हॅन्डलूमच्या किमतीत आपण विकत तर नाही घेत आहोत ना, याची चाचपणीही करता यायला हवी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com