esakal | माझा होशील ना
sakal

बोलून बातमी शोधा

 माझा होशील ना

झी’ मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतील आदित्य (विराजस कुलकर्णी) आणि सई (गौतमी देशपांडे) ही जोडी देखील लोकप्रिय झाली आहे. त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा मोठा मजेशीर आहे... 

माझा होशील ना

sakal_logo
By
विराजस कुलकर्णी/गौतमी देशपांडे

जोडी पडद्यावरची : विराजस कुलकर्णी/गौतमी देशपांडे
चित्रवाहिन्यांवरील काही मालिका पटकन लोकप्रिय होतात आणि त्यातील कलाकारांनाही चाहता वर्ग लाभतो. ‘झी’ मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतील आदित्य (विराजस कुलकर्णी) आणि सई (गौतमी देशपांडे) ही जोडी देखील लोकप्रिय झाली आहे. आदित्यची भूमिका साकारणारा विराजस आणि सईची व्यक्तिरेखा साकारणारी गौतमी यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा मोठा मजेशीर आहे. विराजस तेव्हा अकरावीत असेल. त्याच्या आणि मृण्मयी देशपांडेच्या नाटकाचा पुण्यात प्रयोग होणार होते. विराजस मृण्मयीच्या घरी नाटकाचा सेट बनवत होता. तो बनवताना गौतमी घरी आली. तिच्याकडे एक मांजर होते. त्या मांजराने विराजसच्या अंगावर उडी मारली. गौतमी म्हणजे मृण्मयीची बहीण. त्या दिवशी पहिल्यांदा विराजस आणि गौतमीची ओळख झाली. 

गौतमीच्या स्वभावाबद्दल विराजस म्हणतो, ‘गौतमी उत्तम कविता करते आणि मुख्य म्हणजे ती उत्तम गायिका आहे. तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. तो आमच्या मैत्रीतील समान धागा आहे. तिच्या स्वभावातील एक गोष्ट मात्र मला खटकते आणि ती म्हणजे तिला कधीही पटकन हसू येतं. एखाद्या दृश्याचे चित्रण सुरू आहे आणि तिला हसू आल्यावर मलाही हसायला येते आणि आम्ही दोघेही खूप हसायला लागतो.’ 

विराजसचा मजेशीर स्वभाव हा वातावरण आनंदी ठेवत असतो, असे गौतमी म्हणते. तो सहसा चिडत नाही, ही त्याच्यातील चांगली गोष्ट आहे. तो कधीकधी गौतमीचा मोबाईल घेतो आणि तो मोबाईल तिला परत देताना मोबाईल पडल्यासारखा आभास निर्माण करतो, तेव्हा गौतमीला राग येतो. गौतमी आणि विराजस यांनी पुण्यातील काही नाटकातून सहभाग घेतला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विराजस म्हणतो, ‘माझा होशील ना’ ही माझी पहिली दैनंदिन मालिका असल्याने यात भूमिका करताना मला खूप मजा येत आहे. माझ्या स्वभावातील खट्याळपणा, मिश्कीलपणा या व्यक्तिरेखेतही आणण्याचा मी प्रयत्न करत असतो.’ गौतमी सांगते, ‘मी साकारत असलेली सईची भूमिका ही आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आणि वास्तववादी आहे. सई थोडी हट्टी, प्रभुत्व गाजवणारी मुलगी आहे. त्यामुळे ती खरी, आजच्या काळातील वाटते.’ 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

‘माझा होशील ना’ मालिका सुरू झाली आणि काही दिवसात लॉकडाउन झाले. त्या काळात देखील विराजस, गौतमी आणि काही कलाकारांनी या मालिकेचे वेबिसोड्स केले होते. त्याचे शूटिंग अर्थातच प्रत्येकाने आपापल्या घरातून केले. गौतमी या काळात पुण्यात होती. तिने घरासाठी खूप वेळ दिला. गाण्याचा रियाज केला. अनेक वर्षांनंतर ती, मृण्मयी, आई, बाबा असे सर्व कुटुंबीयांसमवेत तिला वेळ घालवायला मिळाला, असेही गौतमी सांगते. 

लॉकडाउननंतर प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असल्याचे विराजस सांगतो. 

(शब्दांकन - गणेश आचवल) 

loading image