सोलो ट्रॅव्हलर : ‘यूँ ही चला चल राही’

सोलो ट्रॅव्हलर : ‘यूँ ही चला चल राही’

‘जग खरंच खूप सुंदर आणि सुरक्षितही नक्कीच आहे,’ मी सोलो सायकलिस्ट ‘प्रिसिलिया मदन’ हिच्याशी बोलत होते. त्या वेळी हे गाणे आणि हे विचार माझ्या मनात बॅकग्राउंडला चालू होते. साधारण ५ वर्षांपूर्वी प्रिसिलियाने पनवेल ते कन्याकुमारी हा १ हजार ९०० किलोमीटरचा प्रवास एकटीने आणि तेही सायकलीवरून पूर्ण केला. एकटीने, इतक्या लांब पल्ल्याचा प्रवास आणि तो ही सायकलीवरून करणे, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नव्हती. पण म्हणतात ना, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.’ प्रिसिलियाचेही असेच काहीसे आहे. तिची सायकलिंगची आवड आणि सायकलिस्ट होण्याची जडणघडण तिच्या बालवयापासूनच होत गेली. ती सांगते, ‘मी लहान असल्यापासून बाबांना ट्रेकिंग आणि सायकलिंग करताना बघत आले आहे. बाबांच्या या आवडीमुळे आमच्याकडे अनेक विदेशी सायकलिस्ट येऊन राहायचे. अशीच एकदा जगभ्रमंती करणाऱ्या सायकलिस्ट रुबिनाशी गाठभेट झाली, तेव्हा आपणही सोलो सायकलिंग करायचे, असा निश्चय केला. सुरुवातीला मी सुमारे ५० किलोमीटरच्या राइड करायचे. त्यानंतर तयारी सुरू झाली, पनवेल ते कन्याकुमारी या सोलो सायकलिंग प्रवासाची.’

इतक्या मोठ्या प्रवासासाठी फिटनेस आणि सराव महत्त्वाचा आहे. यासाठी ती नियमित ट्रेकिंग आणि १६-१७ किलो वजन सोबत घेऊन सायकलिंगचा सराव करायची. या नंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रवासाचे नियोजन. रस्ता, मुक्काम, आर्थिक नियोजन अशा अनेक गोष्टींची तजवीज आली. प्रिसिलियाने मुक्कामासाठी स्थानिक, नात्यातले लोक अशा ठिकाणी राहणे पसंत केले. ती सांगते, ‘लोकांना माझे फार कौतुक वाटायचे. इतकी लहान मुलगी इतक्या दूरवरून एकटीच आली आहे. लोक आदराने आणि प्रेमाने स्वागत करत.’ शिवाय तिच्या या प्रवासाची गोष्ट सोशल मीडियावर पोचल्यामुळे तिला सर्वच ठिकाणी खूप चांगले पाठबळ मिळाले.

प्रवासात सायकल खराब झाल्यास दुरुस्त कशी करायची किंवा आपण प्रवासात कुठेही प्लॅस्टिकचा कचरा करायचा नाही. अशा अनेक बारीकसारीक गोष्टींचा तिने विचार केला होता. आर्थिक नियोजनाचे म्हणाल, तर हा सर्व खर्च तिने तिच्या साठवलेल्या पैशातून केला.  आहे ना खास बाब!

बेतुल किल्ला, कोझिकोडे (जिथे वास्को-द-गामा सर्वप्रथम उतरला ते ठिकाण) सर्वाधिक आवडल्याचे ती सांगते. या व्यतिरिक्त माउंटेरिंगचे बेसिक व ॲडव्हान्स कोर्सेस तिने केले आहेत. आजही ती नियमित ट्रेकिंग व मॅरेथॉन करते. प्रिसिलायाविषयी अजून जाणून घ्यावेसे वाटतेय ना? फेसबुकवर तिचे पेज आहे ‘I P’RIDE’, आवर्जून पाहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com