ऑन डिफरंट ट्रॅक : शोध इतिहासाचा आणि संस्कृतीचा 

शिल्पा परांडेकर 
Saturday, 4 July 2020

साईलीला प्राचीन, पूर्वमध्य आणि मध्ययुगातील विषयांच्या अभ्यासाबरोबरच कला, स्थापत्य, मूर्तीशास्त्र आणि वसाहतींचा इतिहास यांच्या अभ्यासात विशेष रस आहे. पर्यावरण क्षेत्रातही तिचे मोठे योगदान आहे.

नाव - साईली पलांडे-दातार 
गाव - पुणे 
व्यवसाय - भारतविद्या आणि इतिहास अभ्यासक, पर्यावरण परिसंस्था अभ्यासक, शेतकरी 
वय - ३७ वर्षे 

किल्ले, लेणी मंदिरे, जुने वाडे पाहताना आपले मन इतिहासाचा धांडोळा घेऊ लागते. इतिहासातील, पुराणातील घटना, रचना, परंपरा, संस्कृती आपल्याला आकर्षित करतात. मार्क ट्वेन या अमेरिकन लेखकाने म्हटल्याप्रमाणे, ‘भारत इतिहासाची जननी आहे. मानव इतिहासाची अत्यंत मौल्यवान आणि अत्यंत कलात्मक सामग्री केवळ येथेच आहे.’ त्यामुळे साईलीसारख्या भारतविद्या आणि इतिहास अभ्यासकास भारतभूमी खुणावत नसल्यासच नवलच! 

अभियंता असलेल्या साईलीने सुरुवातीस जिज्ञासेपोटी विविध व्याख्याने, वाचन, भारत इतिहास संशोधक मंडळातील काही अभ्यासवर्ग, ज्येष्ठ इतिहास संशोधकांकडून ‘ऐतिहासिक संशोधन’ याविषयी प्राथमिक माहिती मिळवली. पुढे याविषयात सखोल ज्ञान मिळविण्यासाठी भारतविद्या, पुरातत्व, धर्म, दैवतशास्त्र, कला, स्थापत्य तसेच विविध भाषा व लिपींचा तिने अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘इतिहास संशोधन’ नक्कीच आव्हानात्मक क्षेत्र आहे. यासाठी आवड, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे. ‘मी ज्येष्ठ इतिहास संशोधक मेहेंदळे यांच्या संशोधनाचा धागा पकडून, सतराव्या शतकातील इंग्लंडच्या वर्तमानपत्रातील तत्कालीन भारतीय बातम्यांचा नव्याने अभ्यास केला. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीच्या व इतर राज्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या बातम्यांचा समावेश होता. या संशोधनामुळे माझा आत्मविश्‍वास दुणावला,’ साईली सांगते. 

साईलीला प्राचीन, पूर्वमध्य आणि मध्ययुगातील विषयांच्या अभ्यासाबरोबरच कला, स्थापत्य, मूर्तीशास्त्र आणि वसाहतींचा इतिहास यांच्या अभ्यासात विशेष रस आहे. पर्यावरण क्षेत्रातही तिचे मोठे योगदान आहे. शिवाय फिल्म, वेबसीरीज, डॉक्युमेंटरीसाठी सल्लागार म्हणून व कार्यशाळा, अभ्याससहली अशा विविध प्रांतात ती कार्यरत आहे. 

ऑन डिफरंट ट्रॅक : गृहिणी ते ज्योतिषी

ऐतिहासिक संशोधन करताना येणाऱ्या अडथळे आणि अडचणींबाबत ती सांगते, ‘मला क्वचित प्रसंगी स्त्री म्हणून काही अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, या अडचणी मला नवा दृष्टीकोन देतात.’ इतिहास क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल साईलीला या क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यावरच न थांबता भविष्यात तिला भारतातील विविध वारसास्थळांचा, प्राचीन धर्मपरंपरांचा व संस्कृतीचा अजून सखोल अभ्यास करायचा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

साईलीच्या कामाचा आवाका इतका मोठा आहे की, तो एका लेखात मांडणे पुरेसे होणार नाही, मात्र तिच्या आव्हानात्मक आणि वेगळ्या वाटेस पाहून कवी अनिलांच्या ओळी आठवतात.. 

मला आवडते वाट वळणाची.. 
क्षितिजाकडची पुढची पुढची.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa parandekar writes article about history and culture