माझिया माहेरा : सुगंधी आठवणींचा खजिना

माहेराचे कौतुक करण्यात आपला महिलांचा हात कोणीच धरू शकत नाही, हे अगदी त्रिवार सत्य आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेराचा सार्थ अभिमान असतो.
Vittal Rukmini Temple Pune
Vittal Rukmini Temple PuneSakal
Updated on
Summary

माहेराचे कौतुक करण्यात आपला महिलांचा हात कोणीच धरू शकत नाही, हे अगदी त्रिवार सत्य आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेराचा सार्थ अभिमान असतो.

- सुधामती पारखी, पुणे

माहेराचे कौतुक करण्यात आपला महिलांचा हात कोणीच धरू शकत नाही, हे अगदी त्रिवार सत्य आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेराचा सार्थ अभिमान असतो. मी पूर्वाश्रमीची शकुंतला रानवडे. मुळा नदीच्या काठावर रम्य अशा परिसरात वसलेले औंध हे माझे माहेर. नदीकाठी असलेले विठ्ठल रखुमाईचे मंदिर, गावाच्या मध्यावर असलेले भैरवनाथाचे मंदिर, रामाचे मंदिर आणि गावाच्या वरच्या बाजूला असलेले मारुतीचे मंदिर ही गावातील भक्तिस्थळे. सर्व उत्सव गावकरी एकजुटीने साजरे करतात. दरवर्षी भैरवनाथाचा उत्सव साजरा केला जातो, छबिना निघतो, आमच्या घराण्यात पाटीलकी असल्यामुळे छबिना उचलण्याचा मान माझ्या भावांना दिला जातो. पंचक्रोशीतून लोक गावात येतात. कार्तिक महिन्यात विठ्ठलाच्या मंदिरात मोठा अन्नकोट केला जातो. सर्व गावकरी घरचे कार्य असल्यासारखे मदतीला येतात. सर्वांना जेवण दिले जाते.

गावामध्ये सरदार महादजी शिंदे यांचा मोठा वाडा आहे. त्या वाड्याशेजारीच माझे माहेर आहे. माझे माहेर म्हणजे जणू गोकुळच आहे. आता आईवडील नाहीत, तरी भाऊ- भावजया कधीही विसरत नाहीत. दरवर्षी राखी पौर्णिमेला आणि दिवाळीला दोघी बहिणी आपापल्या घरी भावांना जेवायला बोलावतो. आई-वडिलांच्या मायेच्या छत्राखाली घालवलेले ते दिवस अजूनही आठवतात आणि डोळे पाणवतात. वडील नोकरी करून मांडवाचा व्यवसाय करायचे, त्यामुळे त्यांना ‘मांडववाले रानवडे’ म्हणून सर्वजण ओळखायचे.

एखाद्या गरिबाला अवघ्या २५ ते ३० रुपयातसुद्धा ते मांडव घालून द्यायचे. कुणाची तेवढे पैसे द्यायची ऐपत नसेल, तर ‘अहो तुमच्या मुलीचे लग्न म्हणजे माझ्या मुलीचेच लग्न आहे,’ असे म्हणून त्यांनी फुकट मांडव घालून दिलेला आहे. त्या काळात माझ्या वडिलांनी कुणालाही पैशासाठी कधी अडवले नाही. गोरगरिबांची खूप जाणीव त्यांना होती. तेच संस्कार त्यांनी आम्हा बहीण भावंडांवर केले आहेत. त्या आठवणी मी हृदयाच्या एका कप्प्यात सुगंधी कुपीसारख्या जपून ठेवल्या आहेत.

शेजारच्या वाड्यातील ओसरीवर मैत्रिणींबरोबर खेळलेले खेळ, नदीचा तो विस्तीर्ण घाट, गणपती विसर्जनाच्या वेळी तिथे केलेली आरती, विठ्ठल-रखुमाई मंदिरासमोरील ती दीपमाळ, तिच्याभोवती खेळताना घालवलेले दिवस, शाळेतले दिवस, त्या खेळांच्या स्पर्धा, गँदरिंगमध्ये बसवलेले नाटक, त्या नाटकात मी केलेली भूमिका, गाणी ऐकायची खूप आवड असल्यामुळे घरात रेडिओ नसताना समोरच्या घराच्या कट्ट्यावर बसून ऐकलेल्या बिनाका गीतमाला आणि माझी आवड लक्षात ठेवून एक दिवस वडिलांनी घरी आणलेला मोठा रेडिओ, हे सर्व आठवले, की एक प्रकारची हुरहूर लागते जीवाला. मन हळवे होते, डोळे पाण्याने भरून येतात, मन पाखरू होऊन जाऊन येतेसुद्धा माहेराला... पण मग वाटते, गेले ते दिवस. लहानपण कुणालाच परत आणता येत नाही; पण त्या आठवणींच्या जीवावर तर माणूस जगत असतो, नाही का?

माझे सासर आणि माहेर दोन्हीही अगदी सोन्यासारखी आहेत. आता आयुष्याच्या या वळणावर मन अगदी तृप्त आहे. माझ्या मुलींची लग्ने झाली, त्या आपापल्या सासरी सुखाने नांदत आहेत, मुलगा त्याचा व्यवसाय सांभाळतो. तिन्हीसांजेला तुळशीला दिवा लावून तिच्याजवळ थोडा वेळ बसते आणि तिला नमस्कार करून देवाला सांगते, ‘दे रे देवा मला संपत्ती आगळीवेगळी, सुखी ठेव माझ्या सासरची आणि माहेरची सारी मंडळी.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com