सुखाची परिभाषा 

मंदार जाधव/गिरीजा प्रभू 
Saturday, 29 August 2020

मंदार जाधव हा अभिनेता ‘जयदीप’ची, तर गिरीजा प्रभू ही अभिनेत्री ‘गौरी’ची भूमिका साकारत आहे. मंदार आणि गिरीजाची पहिली भेट झाली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ याच मालिकेच्या लुक टेस्टच्या वेळी.

स्टार प्रवाह वाहिनीवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका लोकप्रियता मिळवू लागली आहे. यातील जयदीप आणि गौरी ही जोडी लोकप्रिय होत आहे. मंदार जाधव हा अभिनेता ‘जयदीप’ची, तर गिरीजा प्रभू ही अभिनेत्री ‘गौरी’ची भूमिका साकारत आहे. मंदार आणि गिरीजाची पहिली भेट झाली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ याच मालिकेच्या लुक टेस्टच्या वेळी. तेव्हा मंदारची निवड जयदीपच्या भूमिकेसाठी झाली होती, परंतु ‘गौरी’ या भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड व्हायची होती. गिरीजा आणि मंदार यांच्यातील एक दृश्य ऑडिशन म्हणून चित्रित केलं गेलं होतं आणि त्यानंतर गिरीजाची ‘गौरी’ या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंदार जाधव याला आपण अनेक हिंदी मालिकांतून यापूर्वी पाहिलं आहे. स्टार प्रवाह वरील ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेत देखील त्यानं दत्तगुरूंची भूमिका साकारली होती. ‘जयदीप’ या भूमिकेविषयी तो म्हणाला, ‘खरेतर पौराणिक मालिकांत भूमिका करणं आणि दैनंदिन कौटुंबिक मालिकांत भूमिका करणं यात खूप फरक आहे. ‘सुख म्हणजे...’मधील ‘जयदीप’ लंडनमध्ये राहिलेला तरुण आहे. त्यामुळं त्याच्या मराठी उच्चारांवर थोडा इंग्रजीचा प्रभाव साहजिकच असणार, ही गोष्ट लक्षात घेतली. हा एक उद्योजकाचा मुलगा आहे. तो संस्कारी आहे, असे सर्व कंगोरे या भूमिकेतून मला साकारायला मिळत आहेत.’ गिरीजा प्रभूनं पुण्यातून ‘श्रावण क्वीन’ स्पर्धेत यश मिळवलं होतं. तसंच काही मालिकांत देखील तिनं काम केलं होतं. ती म्हणते, ‘सुख म्हणजे....’ या मालिकेत ‘गौरी’ची भूमिका मिळणं हा माझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल. ही भूमिका साकारताना कोल्हापुरी भाषा, तो लहेजा मी लक्षात घेतला. गौरीचा स्वभाव माझ्या स्वभावाशी बराच मिळताजुळता आहे. दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचं सुख मानणं, हा या व्यक्तिरेखेतील विचार मला खूप आवडला.’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मंदार म्हणतो, ‘गिरीजा दुसऱ्याचा विचार करणारी आहे. तिचा स्वभाव मैत्रीपूर्ण आहे. मालिकेतील कलाकारांशी सुद्धा तिची पटकन मैत्री झाली.’ 

गिरीजा म्हणते, ‘मंदारचं याआधीचं ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेतील काम मी पाहिलं आहे. दत्तगुरूंची भूमिका करताना त्यानं घेतलेली मेहनत आणि ‘जयदीप’ साकारताना घेतलेली मेहनत आपल्याला प्रभावित करणारी आहे. त्याच्या भूमिकेतील वैविध्य सर्वांनाच आवडणारं आहे.’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउनच्या काळात मंदारनं डायट, व्यायाम या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं होतं, तर गिरिजानं या काळात पाककृती, नृत्यकला यासाठी वेळ दिला. 

(शब्दांकन - गणेश आचवल) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sukh Mhanje Nakki Kay Asta serial Girija Prabhu & Jaydeep

Tags
टॉपिकस
Topic Tags: