प्रेम : एक भावनिक गरज

love yourself
love yourself

आपल्या भावनिक गरजा कोणत्या आहेत, त्या कशा ओळखाव्यात आणि त्याचे काय करावे हे आपण जाणतोच. या गरजा समजून घेणे पुरेसे नाही, त्यांना कबूल करणे आणि त्यावर कार्य करण्यासाठी पुरेसे संवेदनशील असणे आवश्यक आहे. आजपर्यंतचा अनुभव, अभ्यास व संशोधनानुसार आपल्या पाच भावनिक गरजा आहेत. प्रत्येक व्यक्तीची भावनिक गरज, त्याची तीव्रता, त्यांची परिस्थिती आणि जागरूकता या पातळीवर आधारित आहे. या गरजा एका अनुक्रमात स्पष्ट केल्या आहेत, जेणेकरून ते समजणे सोपे होईल.

पहिली गरज ‘प्रेमा’ची 
विचार करा, तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही बिनशर्त प्रेम करता? असे लोक आहेत जे तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतात?

आपण बिनशर्त प्रेम प्राप्त करतो, तेव्हा आपली प्रेमाची आवश्यकता/गरज पूर्ण होते. काही लोकांशी खोलावरचे संबंध बांधले जातात. बिनशर्त प्रेम मिळत नाही तेव्हा, आपण नकळत त्यांच्याकडून प्रेम मिळावे म्हणून त्यांना आवडेल तसे वागू लागतो. अगदी त्यांना आवडेल तसा विचारही करू लागतो. पण तो एक व्यवहार बनतो. असा विश्वास (belief ) निर्माण होतो, ‘मला प्रेम मिळवण्यासाठी खूप काही देण्याची गरज आहे.’ आपला वेळ, ऊर्जा आणि भावना गुंतवूनही प्रेम मिळत नाही, तेव्हा काहीजणांना ‘मी प्रेमळ नाही,’ असे वाटते, तर काहींना वाटते, ‘मी प्रेमासाठी लायक नाही.’  

काहीजणांना वाटते ‘माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे.’ ज्यांना निरपेक्ष प्रेम मिळते त्यांच्याबद्दल हेवा वाटायला लागतो.

बऱ्याच वेळा, आपण प्रेमाचा अंतिम स्रोत म्हणून मोजक्या लोकांना निवडतो व त्यांचाकडूनच प्रेम मिळाले पाहिजे, असा आग्रहही धरतो. आपल्याला प्रश्न पडतो, प्रेमाची अपेक्षा करणे चुकीचे आहे का? अजिबात चुकीचे नाही. आपल्याला स्वतःला हा प्रश्न विचारण्याची गरज आहे, ‘मी नेहमीच अपेक्षा करतो की कोणीतरी माझ्यावर प्रेम केले पाहिजे?’ याचे उत्तर सोपे आहे. जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही, तोपर्यंत कोणीही तुमच्यावर प्रेम करणार नाही. एक मुलगा होता, जो आपल्या वडिलांच्या प्रेमाच्या आशेने सर्व काही करीत होता. त्याने काहीही केले, तरी त्याचे वडील कधीच आनंदी नव्हते. परिणामी त्याने आपल्या प्रिय मित्र परिवाराकडून प्रेम मिळावे म्हणून त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत गेला, प्रेम मिळेल या आशेवर. पण अखेर त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग त्याला जाणवलं, मी एक चांगला माणूस आहे जो लोकांना मदत करतो. मी प्रेमाच्या अपेक्षेने का करत आहे? मी याबद्दल आनंदी का होऊ शकत नाही आणि स्वतःवर प्रेम का करू शकत नाही? तो त्याच्या यशस्वी होण्याचा एक क्षण होता. तेव्हापासून, त्याने स्वतःवर प्रेम करण्यास सुरुवात केली, त्याला समजले की, असे बरेच लोक आहेत जे त्याच्यावर तो जो आहे, जसा आहे त्यावर निरपेक्ष प्रेम करतात, तो एक आनंदी व्यक्ती बनला आणि आश्चर्याची बाब म्हणजे सर्वजण त्याच्यावर प्रेम करू लागले.

आता आपल्याला प्रेमाची आवश्यकता आहे, हे समजल्यावर काय करावे?
मूळ कारण समजून घ्या.

आपल्याला फक्त विशिष्ट लोकांकडूनच प्रेमाची आवश्यकता का आहे, ते समजून घ्या. ते माझ्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? मी प्रेमासाठी काही लोकांवर पूर्णपणे अवलंबून आहे का? याची उत्तरे शोधा.

स्वतःवर बिनशर्त प्रेम करा 
मला माहीत आहे की, हे ऐकायला सोपे वाटते पण करणार कसे? स्वतःवर प्रेम करणे म्हणजे लाड करणे नव्हे. स्वत:वर प्रेम करणे म्हणजे आपण जसे आहोत, तसे स्वतःला आनंदाने स्वीकारणे. स्वतःचे imperfection स्वीकारणे, हेच प्रेमाचे शुद्ध रूप आहे.
आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित करा.

आपण वारंवार बंद असलेल्या दरवाजाकडे पहातच राहतो, परंतु आजूबाजूला काही दरवाजे उघडलेले असतील हे विसरतो. त्यामळे, जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. जे तुम्हाला एक आनंदी व्यक्ती बनण्याची ऊर्जा देतील त्यांचा सहवास वाढवा.

लक्षात ठेवा, स्वतःला स्वीकारणे, त्याचा आनंद साजरा करणे व आपणच एक प्रेमाचे माध्यम बनणे, हाच प्रेमाची भावनिक गरज पूर्ण करण्याचा उत्तम मार्ग आहे.

स्वतःवर बिनधास्त व बिनशर्त प्रेम करा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com