थॉट ऑफ द वीक : माझी प्रगती 

सुप्रिया पुजारी, लाइफ कोच 
Friday, 24 April 2020

आपले सोशल लाइफ,आपले छंद व नाती यांपैकी कोणतेही क्षेत्र तपासा.आपली कोणती प्रगती होत आहे? वैचारिक,भावनिक की आर्थिक? प्रगती कोणतीही असो,आपण मागे जात आहोत का पुढे वाटचाल होत आहे,हे जाणून घेणे महत्त्वाचे

मागील लेखामध्ये आपण ‘कौतुक’ ही भावनिक गरज समजून घेतली. त्याआधी आपण प्रेम, स्वतःचे महत्त्व याही गरजा समजून घेतल्या. या भावनिक गरजा आपले अंतर्मन व त्यामधील आपला संवाद घडवीत असतात. अशीच एक महत्त्वाची गरज म्हणजे ‘प्रगती’. असे बऱ्याचदा होते की, एखाद्याचा सहवास आपल्याला खूप प्रेरणा देतो. एखादे पुस्तक खूप नवीन दृष्टिकोन देते. एखादा निर्णय खूप प्रगती देतो. असेही होते की, काही लोकांचा सहवास आपल्याला कमकुवत बनवितो. एखादा निर्णय आपली प्रगती थांबवितो. ही नक्की कसली प्रगती आहे? कधी भावनिक, कधी वैचारिक, कधी आर्थिक. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपण माणसांची निवड, निर्णय व आपल्या क्रिया या भावनिक गरजांच्या आधारे करीत असतो. कधी प्रेमाची गरज असते, तर कधी कौतुकाची. मात्र, ‘प्रगती’ ही गरज इतर गरजांसारखी जास्त स्पष्ट नसते. नकळत आपल्या मनात दडून बसलेली असते. एक क्षण असा येतो की, आपल्याला प्रगतीची ऊर्जा मिळत नाही. आपण इथे का आहोत, हा प्रश्‍न सतत येतो. यालाच आपण प्रगती थांबली असे म्हणतो. 

आपले कार्यक्षेत्र, सोशल लाइफ, आपले छंद व नाती यांपैकी कोणतेही क्षेत्र तपासा. आपली कोणती प्रगती होत आहे? वैचारिक, भावनिक की आर्थिक? प्रगती कोणतीही असो, आपण मागे जात आहोत का पुढे वाटचाल होत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे. आर्थिक व शारीरिक प्रगती अगदी सहज तपासता येते, पण भावनिक व वैचारिक प्रगती कशी तपासावी? खालील मुद्दे आपल्याला याबाबत मदत करतील. 

आपल्या आयुष्यातील कोणत्याही भागाचा विचार मनात ठेवा, उदा - काम, मित्र परिवार व जवळची नाती, त्यासाठी खालील प्रश्‍न तपासा. 

१. मी आनंदी आहे का? 
आपले काम असो व आजूबाजूची माणसे; त्यांचा सहवास किंवा कामाचे स्वरूप मला अधिक आनंदी बनविते का मला उदास करते? आपले बाह्य वातावरण आपल्या अंतर्मनाची मन:स्थिती काही प्रमाणात ठरवीत असते. 

२. मला नवीन विचार येतात का? 
रोजच्या कामातून, संभाषणातून मला नवीन कल्पना येत आहेत का? काहीतरी नवीन शिकावे, मग ते एखादे वाद्य असो व भाषा. काहीतरी नवीन शिकण्याची ऊर्जा मला मिळत आहे का? 

३. मी दुसऱ्याला प्रेरणा देतो का? 
असेही लोक असतात, जे तुम्हाला कमकुवत बनवितात. तुमच्यामध्ये काहीच चांगले नाही, असे जाणवून देतात. अशावेळी दुसऱ्याला आपण काय देणार, हा प्रश्‍न येणे स्वाभाविक आहे. आपण दुसऱ्याला प्रेरणा दिल्यावर आपलीही नकळत प्रगती होत असते व आपल्याला आपल्यामध्ये काय चांगले आहे याची प्रचिती देखील येते. 

४. मला दुसऱ्याच्या आनंदात आनंद मिळतो का? 
ज्यांना दुसऱ्याच्या आनंद सहन होत नाही, त्यांची प्रगती थांबली असे म्हणायला हरकत नाही. प्रगतीची भावनिक गरज पूर्ण झालेली व्यक्ती दुसऱ्याच्या आनंदाचा हेवा करत नाही व ती दुसऱ्याला दोष देत नाही. हे त्याच वेळी होते, जेव्हा आपण आपली प्रगती अनुभवतो. आपल्याला आपल्या उद्देशाची, समाधानाची, आनंदाची स्पष्टता येते. 

वरील कोणत्याही प्रश्‍नाला तुमचे उत्तर ‘नाही’ असल्यास काय? 

१. सर्वप्रथम हे स्वीकारा की, आपल्या प्रगतीची जबाबदारी आपली आहे. ही जबाबदारी तुमचा आत्मविश्‍वास वाढवेल. 
२. आपल्या प्रगतीची व्याख्या ठरवा. मग ती कोणतीही प्रगती असो. 
३. आपल्या आजपर्यंत केलेल्या सत्कर्माची उजळणी करा. 
४. आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल सुरू ठेवा. 

लक्षात ठेवा, जिथे आहोत तिथून पुढे जाणे म्हणजेच प्रगती. मग ती अगदी सूक्ष्म असली तरी चालेल. मागे पाहून स्वतःचा अभिमान वाटतो त्याला ही ‘प्रगती’ म्हणतात, हे लक्षात असू द्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya pujari articles progress

Tags
टॉपिकस
Topic Tags: