थाॅट आॅफ द वीक : दृष्टिकोन स्वजागरुकतेचा पाया

Attitude is the foundation of self-awareness
Attitude is the foundation of self-awareness

एकदा शरद रेल्वेमधून प्रवास करत होता. त्याच्यासमोर एक व्यक्ती आपल्या पाच वर्षांच्या मुलासोबत बसली होती. त्या व्यक्तीकडे पाहताच शरदला जाणवले की, ती व्यक्ती अस्वस्थ आहे. त्याचा मुलगा खूप जोरात ओरडून रडत होता. बराच वेळ तो जास्तच ओरडून रडत होता. शरदला कळेनासे झाले. तो विचार करू लागला ‘त्याचे वडील काहीच का बोलत नाहीत?’, ‘जबाबदारी म्हणून काही आहे की नाही या व्यक्तीला?’, ‘किती निर्दयी वडील आहेत’. शरदला राग येत होता. शेवटी शरदने त्या व्यक्तीला विचारले, ‘‘तुमचा मुलगा फारच ओरडून रडत आहे, त्याला तुम्ही काहीच का बोलत नाही?’’ त्या व्यक्तीने शांतपणे उत्तर दिले, ‘‘त्याची आई देवाघरी गेली हे त्याला समजले आहे, त्यामुळेच तो रडत आहे.’’ अचानक शरदच्या मनात रागाची जागा मायेने घेतली. त्याला खूप वाईट वाटले. ‘खरेच काय करतील आता हे दोघे?’ त्याला चिंता वाटू लागली. शरदचे स्टेशन आले, काहीतरी मदत करावी म्हणून त्याने मुलाला थोडे पैसे दिले व तो जड मनाने उतरला. स्टेशनवर त्याचा मित्र आला होता. शरदला भेटताच त्याने एक बातमी दाखवली, ‘एक चोर त्याच्या मुलासोबत फरार आहे, काहीही खोट्या बातम्या सांगून सर्वांना लुटत आहे. मुलाची आई देवाघरी गेली, असे सांगून तो पैसे घेत आहे.’ ही बातमी व त्याचा फोटो पाहताच शरदला हसावे की रडावे कळेना. त्याच्यातील मायेची जागा उपहासाने घेतली. त्याला आश्चर्य वाटले! गेल्या एका तासात आपण किती भावनिक चढ-उतार अनुभवले? जे दिसले त्यावर तर्क लावला, जे ऐकले त्यावर निर्णय घेत गेलो. जागरूकतेसाठी आपला दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. 

शरदसारखेच आपणही जेवढे दिसते, जे ऐकतो त्यावर तर्क लावतो. प्रत्येक वेळी शहानिशा करतोच असे नाही. मात्र, आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर परिणाम नक्कीच होत असतो. आपल्या आजूबाजूला घडते त्याला आपण ‘जागरूकता’ म्हणतो. पण, त्यामुळे आपल्यावर होणाऱ्या परिणामांचे काय? यालाच आपण ‘स्व-जागरूकता’ म्हणतो. यामध्ये आपण एखाद्या गोष्टीकडे कसे पाहतो यावर स्व-जागरूकता अवलंबून असते. आता हा दृष्टिकोन कसा परिणाम करतो ते पाहू. 

आपला दृष्टिकोन घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावतो. आपली मानसिक स्थिती आपला दृष्टिकोन व त्याला आपण दिलेला अर्थ ठरवते. उदा. आपण एका प्रसंगाकडे करुणेने पाहतो, तर दुसरी व्यक्ती त्याच प्रसंगाकडे उपहासाने पाहते. याच दृष्टिकोनामुळे मानसिक स्थिती वेगळी होते. 

आपण स्वतःकडे पाहतो तसे जग तुम्हाला पाहते. आपण स्वतःकडे ‘कमकुवत’ असे पाहिले, तर जगही तसेच पाहते. आपणच जगाला स्वतःकडे कसे पाहायचे, हे नकळत शिकवत असतो. 

आपला दृष्टिकोन आपली निर्णयक्षमता ठरवते. कोणताही निर्णय असो, तो निर्णय व त्याचे परिणाम दृष्टिकोनच ठरवतात. त्यामुळे यश, अपयश किंवा आपला प्रतिसाददेखील आपला दृष्टिकोन ठरवतात. 

आपली मानसिक स्थिती आनंदी ठेवण्यात दृष्टिकोनाचा महत्त्वाचा वाटा आहे. काही लोक फक्त काय चुकले आहे, हे शोधून सतत तक्रार करत असतात. तर काही काय बरोबर झाले आहे, हे आधी पाहतात. त्याचा आनंद घेतात व सुधारणा करून वाटचाल चालू ठेवतात. 

दृष्टिकोनच आपल्या स्व-जागरूकतेचा मार्ग ठरवतो. जागरूकतेने पाहिले तर सर्वच गोष्टी उलगडतात व दृष्टिकोन आपल्याला मदत करतो. 
ही जागरूकता असते तेव्हा आपण आपले आयुष्य जगतो. जागरूकतेचा अभाव होतो, तेव्हा आयुष्य आपल्याला एका भ्रमात ठेवते व आपण पूर्णपणे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. जे दिसते त्यावर स्वमत बनवतो व आपण त्यानुसार प्रतिसाद देतो. 

स्व-जागरूकता म्हणजेच कोणत्याही प्रसंगाचा आपल्या भावविश्‍वावर होणारा परिणाम ‘जसा आहे तसा’ पाहणे व अनुभवणे; कोणताही ‘अर्थ व निष्कर्ष’ न लावता. हे खूप सोपे वाटते, पण ते तितकेच अवघड आहे. स्व-जागरूकतेचा मार्ग खूप आनंददायी आहे. तो आनंद घेण्यासाठी, आधी त्यातील अडथळे समजून घेणे व त्यावर मात करणे अधिक आवश्यक आहे. हे अडथळे आपल्याला खूप काही शिकवतात. पण आपण त्याकडे जागरूकतेने पाहत नाही. या अडथळ्यांचा परिणाम आपली नाती (वैयक्तिक व व्यावसायिक), पालकत्व, आपले निर्णय व एकूणच आपल्या आयुष्यावर होतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जग आपल्याला काय दाखवते व आपण काय पाहतो यातील फरक म्हणजेच ‘दृष्टिकोन’! आगामी लेखात आपण प्रत्येक अडथळा, त्याचे परिणाम व त्यावरचा उपाय याची माहिती घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com