esakal | थॉट ऑफ द वीक : एक क्षण - स्व-जागरूकतेचा 
sakal

बोलून बातमी शोधा

थॉट ऑफ द वीक : एक क्षण - स्व-जागरूकतेचा 

आयुष्याच्या शिखरावर  पोचण्याचा हा प्रवास, खरेतर, आपला  अंतर्गत प्रवास आहे.  स्वत:ला जागरूक ठेवणे ही मुक्त जगण्याची पहिली पायरी आहे.  स्वतःचा शोध हाच स्व-जागरूकतेचा पाया आहे.  

थॉट ऑफ द वीक : एक क्षण - स्व-जागरूकतेचा 

sakal_logo
By
सुप्रिया पुजारी, लाइफ कोच

यश आणि रोहित हे दोन जिवलग मित्र गिरीप्रेमी होते. त्यांचे अंतिम लक्ष्य सर्वांत उंच शिखर सर करणे हेच होते. प्राथमिक तयारी करून त्यांनी औपचारिक प्रशिक्षण घेतले. सर्व काही योजनेनुसार सुरू होते. दोघेही उत्साही होते आणि या प्रवासाची वाट पाहत होते. शेवटी तो दिवस आला. त्यांचा प्रवास सुरू झाला. पहिले काही तास सर्वकाही सुरळीत चालले होते, परंतु नंतर एक आव्हान आले. त्यांनी आखलेल्या मार्गावर लँड स्लाइड होऊन मार्ग बंद झाला होता. पुढे काय करावे याबद्दल दोघेही संभ्रमात होते. आपण ठरवलेल्या ध्येय प्राप्तीच्या नियोजित मार्गामध्ये अचानक अडथळा निर्माण झाल्याने यश इतर गोष्टींना दोष देऊ लागला. कधी नशीब तर कधी प्रशिक्षकाला दोष देत रोहितशी वाद घालू लागला. यश सर्वांना दोष देत ध्येय बदलण्याचा विचार करू लागला. तो एक निर्णायक क्षण होता. यशचे विचारचक्र सुरू झाले, ‘मला खरोखर काय पाहिजे?’, ‘नक्की मला कशाची भीती वाटते?’, ‘मी इथेसुद्धा अयशस्वी होईन का?’, ‘सर्वजण पुन्हा माझी चेष्टा करतील का?’ या सर्व प्रश्‍नांना टाळण्यासाठी त्याने एक सोपा उपाय शोधला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जवळच एक लहान शिखर आहे व त्याचा मार्ग ही सोपा असल्याने यशने तेथे जाण्याचे ठरविले व तो ही कल्पना रोहितला पटवून देऊ लागला. रोहित ध्येय बदलण्याविषयी साशंक होता. त्याने विचार केला, ‘आपण ध्येय का बदलत आहोत?’, ‘आपले ध्येय न बदलता आपण दुसरा मार्ग शोधू शकत नाही का?’, ‘सर्व आव्हानांचा सामना करत आपण आपले लक्ष्य गाठणे आवश्यक आहे,’ ‘आपण लढायला हवे’. वरील प्रसंगाकडे पाहता आपल्या लक्ष्यात येईल की दोन्ही मित्रांचे प्रशिक्षण, संसाधने व शिखर सर करण्याचे कौशल्य सारखेच असले, तरी अडथळा आल्यावर विचार पूर्णपणे भिन्न होतात व त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. एकजण सोपे ध्येय निवडतो व दुसरा ध्येय न बदलता ते साध्य करण्याचे इतर मार्ग शोधतो. 

थॉट ऑफ द वीक : सहनशीलता-शाप की वरदान?

आपणही अशाप्रकारच्या प्रसंगातून जात असतो. आपल्या मनात काही ध्येय असतात व ते पूर्ण करण्यासाठी आपण काही मार्ग ठरवितो. जेव्हा गोष्टी आपल्या नियोजित मार्गाने घडत असतात तेव्हा आपण सर्वांत भाग्यवान आणि आनंदी व्यक्ती असतो, परंतु जेव्हा आपण योजना केल्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत तेव्हा काय होते, आपण नक्की काय करावे, कोणता मार्ग निवडावा असे प्रश्‍न पडतात. हा क्षण ‘स्वतःच्या शोधाचा’ असतो. वरील गोष्टीप्रमाणे काहीजण भूतकाळावर लक्ष केंद्रित करतात, कधी अपयशाची भीती तर कधी ‘लोक काय म्हणतील’ याची भीती बाळगून ध्येयामध्ये बदल करतात, तर काहीजण आपल्या विचारांबद्दल जागरूक राहतात, आत्मविश्‍वासाने पुढे जातात. कोणतीही भीती त्यांना कमकुवत करत नाही. ही जागरूकता त्यांच्यामध्ये असल्याने, ध्येय निश्‍चित ठेवून ते गाठण्यासाठी वेगळे मार्ग शोधून वाटचाल सुरू ठेवतात. आपल्याला आपल्या संभाव्यतेबद्दल, आपल्या विचारांबद्दल, आपल्या भावनांबद्दल जागरूकता येते त्याक्षणी आपल्या मुक्त जीवनाचा प्रवास सुरू होतो. 

आयुष्याच्या शिखरावर पोचण्याचा हा प्रवास, खरेतर, आपला अंतर्गत प्रवास आहे. स्वत:ला जागरूक ठेवणे ही मुक्त जगण्याची पहिली पायरी आहे. स्वतःचा शोध हाच स्व-जागरूकतेचा पाया आहे. पुढील लेखमाला आपल्याला स्वतःचा शोध व स्व-जागरूकतेकडे वाटचाल कशी सुरू ठेवायची याचा अनुभव करून देईल. 

लक्षात ठेवा, आयुष्यात अडथळा आला की स्वतःच्या शोध घेण्याची वेळ आली असे समजा. 

loading image
go to top